मुंबई पाऊस : जेव्हा हिंदमाताच्या उघड्या मॅनहोलपाशी ते भर पावसात पाहारा देत होते...

फोटो स्रोत, Prashant Nanaware/BBC
- Author, प्रशांत ननावरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
मुंबई आणि आसपासच्या उपनगरांसह ठाणे, नवी मुंबईत मंगळवारी रात्रभर पाऊस कोसळला. कोलाबा, सांताकृझमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली असून पुढचे काही तास अशीच परिस्थिती राहण्याची चिन्हं आहेत.
दरवर्षी मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेकांनी जीव जातो, इमारती कोसळतात, भिंती पडतात, कुणी पाण्यामुळे अदृश्य झालेल्या मॅनहोलमध्ये पडून जीव गमावतो.
प्रशासन आपल्या गतीने काम करत असल्याचं सांगतंच, पण प्रत्यक्षात असे अपघात टाळण्यासाठी अनेक लोक मुंबईत दिवसरात्र काम करत असतात. त्यांच्यापैकीच एक म्हणजे काशीराम.
मुंबईच्या धुवांधार पावसात मॅनहोलमध्ये पडून कोणताही अपघात होऊ नये म्हणून काशीराम भर पावसात उभे होते. आणि त्यांच्या तत्परतेची ग्वाही देणारा फोटो व्हायरल झाला होता. तेव्हा बीबीसीने त्यांच्याशी बातचीत केली होती.

"पावसाच्या साचलेल्या पाण्यात उभं राहणं ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. अपघात होऊ नये म्हणून आम्ही उघड्या मॅनहोलपाशी उभं राहतो... गुडघाभर साचलेल्या पाण्यात भर पावसात मॅनहोलपासून तीन फूट लांब संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मी उभा होतो", काशीराम तळेकर यांनी अगदी हसतमुखाने बीबीसी मराठीला सांगितलं.
इतर सामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ/दक्षिण वॉर्डमध्ये काम करणारे काशीराम पांडुरंग तळेकर हे 31 जुलै 2017 रोजी सेवानिवृत्त झाले. 37 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर ते निवृत्त झाले.
एका दिवशी काय काय घडलं हे सांगताना तळेकर म्हणाले, "सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता मी हिंदमाता फ्लायओव्हरशेजारी पेट्रोलपंपाच्या समोर असलेल्या मॅनहोलपाशी गेलो, तेव्हा तिथे पाणी तुंबलेलं नव्हतं. पण तासाभरात झालेल्या तुफान पावसामुळे या परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली. साचलेल्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा व्हावा यासाठी आम्ही नेहमीप्रमाणे मॅनहोलचं झाकण उघडलं. त्याच्यासमोर 'डेंजर - मॅनहोल ओपन' असा बोर्ड लावला. पाऊस सतत कोसळत होता त्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली."
पाण्यात पहारा देण्याचे ते 6 तास
"जून महिन्यात ९ तारखेला झालेल्या पहिल्या पावसातही मीच इथे उभा राहिलो होतो. पावसाच्या साचलेल्या पाण्यात उभं राहणं ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. कुठलीही अघटित घटना घडू नये म्हणून लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही उघड्या मॅनहोलपाशी उभं राहतो. मागच्या वर्षी डॉ. दीपक अमरापूकर यांचा साचलेल्या पाण्यातील उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्यानंतर यावर्षी पालिका अधिक खबरदारी घेत आहे", असं काशीराम म्हणाले.
"पायात प्लास्टिकची चप्पल, हाफ पँट आणि रेनकोट घालून मी दिवसभर एकटाच पाण्यात उभा होतो. अशा वेळी पालिका आमच्या जेवणाची सोय करते. सोमवारी तर जेवणसुद्धा उभ्यानेच केलं. नागरिकांपैकी आमच्या मदतीला कुणी येत नाही किंवा आमच्याशी बोलतही नाही. उलट आजूबाजूची मुलं पाण्यात खेळायला बाहेर पडतात त्यांना उघड्या मॅनहोलपासून दूर ठेवण्याचं आव्हान आमच्यासमोर असतं," तळेकर पुढे सांगतात.
काशीराम सांगतात, "आम्ही उभे असल्याने धोक्याच्या सूचनेचा लोकांना अंदाज येतो. त्यामुळे ते लांबूनच परत जातात. परवासुद्धा साचलेल्या पाण्यातून चालणाऱ्या नागरिकांना मी मॅनहोल उघडं असल्यामुळे लांबून जाण्याच्या सूचना देत होतो. टीव्ही चॅनेलवाले साचलेल्या पाण्याचं शूटिंग करतात पण आमच्याशी बोलत नाहीत. वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस मात्र चहा-पाणी आवर्जून विचारतात.

फोटो स्रोत, Prashant Nanaware/BBC
"चांगलं काम केलं म्हणून कोणी बक्षीस देत नाही. आमचे कामगार चांगलं काम करतात असं अधिकारी बोलतात. पण वैयक्तिक स्तुती कुणी नाही करत. आपण आपलं काम करत राहायचं, फळाची अपेक्षा ठेवू नये. असंच आजवर जगत आलोय", काशीराम म्हणतात.
"पावसाच्या दिवसात ज्या ठिकाणी पाणी साचलंय तिथल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मॅनहोलवरचं झाकण काढणं, गटारांवरील जाळ्या बाजूला करणं हा आमच्या कामाचाच भाग आहे. पावसाळा संपला की जानेवारी ते मे महिन्याच्या काळात आम्ही गटांरांमध्ये साचलेली माती आणि घाण साफ करतो", अशी माहिती काशीराम देतात.
हिंदमाता फ्लायओव्हर नव्हता तेव्हा या भागातील पाण्याचा निचरा लवकर होत असे. पण आता फ्लायओव्हरमुळे पाणीसुद्धा लवकर साचतं आणि निचरा व्हायलाही वेळ लागतो, असंही ते म्हणतात.
या परिसरात वर्षानुवर्षे पाणी का साचतं?
याबद्दल सांगताना काशीराम म्हणाले, "बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ/दक्षिण या वॉर्डअंतर्गत येणारा दादर, वडाळा, शिवडी आणि परेल हा मुंबईतील सर्वात सखल भाग आहे. त्यामुळे या भागात दरवर्षी पावसाचं पाणी साचतंच.

फोटो स्रोत, Prashant Nanaware/BBC
"गेल्या काही वर्षांत आजूबाजूच्या परिसरात टोलेजंग इमारती झाल्या, मोकळ्या जागा गायब झाल्या आणि गटारांचा आकार मात्र तेवढाच आहे, त्यामुळेच इथे पाणी साचतं. जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत पाणी साचतंच राहणार.

फोटो स्रोत, Prashant Nanaware/BBC
काशीराम सांगतात, "मुंबईने खूप काही दिलं. पालिकेच्या कामामुळे संसाराची घडी बसली, काश्या म्हणून प्रेमाने हाक मारणारे मित्र दिले. मीसुध्दा आयुष्यभर माझं काम प्रामाणिकपणे केलं. कुणाशी भांडण नाही किंवा कुणाविषयी तक्रार नाही. आणखी काय हवं?"
(ही बातमी प्रथम 11 जुलै 2018 ला प्रसिद्ध झाली होती.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








