मुंबई पाऊस : वसई-विरारमध्ये पाऊस थांबला; रुळांवर पाणी कायम

मुंबईच्या काही भागात पावसानं रात्रभर विश्रांती घेतली आहे. आता ठाणे, वसई-विरार या भागातही पाऊस थांबला आहे.

7.45 वा. पाणी ओसरते आहे

वसई : 'महापारेषण वसई अति उच्चदाब केंद्रा'च्या नियंत्रण कक्षातील पाणी आता ओसरू लागले आहे. आता पाण्याची पातळी सहा इंचावर आली आहे. काही तासांत वीज पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई : जोरदार पावसाचा इशारा

स. 7.00 वा. पश्चिम रेल्वेवरील अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

मुंबईत पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. परंतु वसई-विरार या पट्ट्यात पाऊस सुरूच होता. त्यामुळे रूळांवर पाणी आहे.

भाईंदर ते विरार या पट्ट्यात रेल्वे मार्गावर पाणी असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेनं अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहे.

विरार : पाणी ओसरल्यावरच गाड्या सुरू होणार - पश्चिम रेल्वे

दरम्यान, मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे.

वीज नाहीच

मुंबई व उपनगरीय परिसरात सुरू असलेला पाऊसामुळे, वसई-विरार भागाला वीज पुरवठा करणाऱ्या 'महापारेषण वसई अति उच्चदाब केंद्रा'च्या नियंत्रण कक्षामध्ये पाणी शिरले आहे. मंगळवारी दुपारी तीन फूट इतके असलेले पाणी रात्री 12.30 वाजता दीड फुटावर आले आहे. खबरदारीचा उपाय योजना म्हणून तसेच उपकरणाच्या सुरक्षेच्या हेतूनं उच्चदाब वीज केंद्राचा वीज पुरवठा मंगळवार सकाळी 7.30 पासून आतापर्यंत बंदच आहे. त्याचा फटका सुमारे तीन लाख ग्राहकांना बसला आहे.

आज आढावा

बुधवारी दुपारी १२ वाजता मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई शहर जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्त यांची बैठक होणार आहे. त्यात शहर आणि उपनगरातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.

सकाळपासून पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये धुवांधार पाऊस कोसळत होता. पावसाचा जोर आता थोडा कमी झाला असला तरी रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आलेली नाही.

नालासोपारा, वसई, ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पाऊस झाला. दादर, कुर्ला, सायन भागात पावसाचं पाणी साठून रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं.

ठळक मुद्दे

  • ऑगस्ट क्रांती आणि सुरत-वांद्रे एक्स्प्रेस रद्द
  • मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • मुंबई - पुणेदरम्यानच्या 5 एक्स्प्रेस रद्द
  • वसई-विरारमध्ये वीज पुरवठा बंद
  • ठाणे आणि पालघरमध्ये आज शाळा बंद
  • गरज असेल तरच घराबाहेर पडा - मुंबई महापालिका
  • पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या ठिकठिकाणी रखडल्या
  • जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवल्या.
  • हार्बर लाईनवर वाशीपासून वाहतून सुरू

दुपारी 3.00 - विमान वाहतुकीवर फारसा परिणाम नाही

मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असली तरी विमान वाहतुकीवर फारसा परिणाम झालेला नाही. विमान उड्डाणं 20 मिनिटं उशीराने होत आहेत.

लँडिंगमध्येही विलंब होत आहे. पण अद्याप एकही विमान रद्द झालेलं नाही किंवा डायव्हर्टही करण्यात आलेलं नाही, अशी माहिती एअरपोर्ट अधिकाऱ्यांकडून मिळाली.

दुपारी 2.27 - NDRFला पाचारण

नालासोपारा स्टेशनवर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी NDRC ला पाचारण करण्यात आलं आहे.

दुपारी 1.50 - मुंबई-पुणे दरम्यानच्या एक्स्प्रेस रद्द

पावसामुळे मंदावलेली उपनगरीय वाहतूक आणि रेल्वे रुळांवर साचलेलं पाणी याचा फटका आता मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना बसला आहे. या मार्गावरील 5 एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर, 2 गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

पुण्याहून मुंबईकडे येणारी आणि मुंबईहून पुण्याकडे जाणारी इंद्रायणी एक्स्प्रेस, पुण्याहून मुंबईकडे येणारी आणि मुंबईहून पुण्याकडे जाणारी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

तर, पुण्याहून भुसावळकडे जाणारी आणि भुसावळ हून पुण्याकडे येणाऱ्या दोन्ही एक्स्प्रेस मार्ग वळवण्यात आले आहेत. अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

दुपारी 1.00 - मध्य रेल्वे उशिराने, तर हार्बर मार्ग बंद

पावसामुळे मंदावलेली मध्य रेल्वेची वाहतूक दीड तास उशिराने होत आहे. तर, मानखुर्द स्थानकात पाणी साचल्यानं सीएसटी ते वाशी दरम्यानची वाहतूकही धिम्या गतीने सुरू आहे. त्याचबरोबर परळ स्थानकातील रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यानं इथून होणारी वाहतूकही धिम्या गतीनं सुरू आहे.

दुपारी 12.26 - वसई-विरार भागाचा वीज पुरवठा खंडीत

मुंबई व उपनगरीय परिसरात सुरू असलेला सतंतधार पावसामुळे, वसई-विरार भागाला विजपुरवठा करणाऱ्या 'महापारेषण वसई अति उच्च दाब केंद्रा'च्या नियंत्रण कक्षामध्ये पाणी शिरले आहे.

यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तसंच उपकरणांच्या सुरक्षेच्या हेतूने सदर उच्च दाब वीज केंद्राचा वीज पुरवठा सकाळी ७.३ ०पासून बंद ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे वसई गाव, वसई पश्चिम, नालासोपारा पूर्व आणि पश्चिम, आचोळे ,विरार पश्चिम ,जुचंद्र, नवघर पूर्व, वालिव आगाशे, मनवेलपाडा, अर्नाळा या भागातील विजपुरवठा खंडित आहे. यामुळे महावितरणचे सुमारे ३लाख ग्राहक प्रभावित झाले आहेत.

यातील काही भागाचा वीजपुरवठा हा अप्रिय घटना टाळण्यासाठी, सुरक्षेच्या कारणास्तव खंडित करण्यात आला आहे. महावितरण वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वसई-विरारच्या परिसिथतीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

परिस्थिती पूर्वपदावर येताच सुरक्षेचा आढावा घेऊन वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल. अशी माहिती महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांनी दिली.

सकाळ 12.00 - मुंबईतील शाळांच्या सुट्यांचा निर्णय मुख्याध्यापकांनी घ्यावा - विनोद तावडे

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मुंबई आणि परिसरातील पावसाचा आढावा घेऊन निर्णय घ्या असे निर्देश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिले होते.

यावर, शिक्षणमंत्री तावडे यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधील शाळांना सुटी देण्याचा निर्णय घेतला. तर, मुंबईतील शाळांना सुटी देण्याचे सर्वाधिकार त्यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत.

मुंबईत शाळांना सुटी देण्याची गरज नाही असे तावडे यांनी स्पष्ट केल्यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी सुटी द्यावी अशी मागणी केली होती.

त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद झाल्याचं चित्र विधिमंडळात निर्माण झालं होतं. अखेर यावर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यावर शिक्षणमंत्र्यांनी शाळांच्या सुटीबाबत हा नवा निर्णय दिला.

सकाळी 11.55 विरारमध्ये जनजीवन ठप्प

विरार पश्चिमच्या जुना जकात नाका येथील कामनवाला नगर येथील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरलं आहे आणि गाड्याही पाण्याखाली गेल्या आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या ४८ तासांपासून या परिसरातील वीज बंद करण्यात आली आहे. वॉटर प्युरिफायर चालवण्यासाठी आणि मोबाइल चार्ज करण्यासाठी इनवर्टरचा वापर केला जातोय, अशी माहिती या भागातील रहिवासी अभिषेक सावंत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

सकाळी 11.15 शाळांच्या सुट्यांवरुन सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद

पावसामुळे मुंबईचं जनजिवन विस्कळीत झालं असून सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. मात्र, मुंबईतील शाळांना सुटी देण्यात येणार नसल्याचा निर्वाळा काही वेळापूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिला होता.

मात्र, यावर आताच नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात जोरदार चर्चा झाली. त्यात सत्ताधाऱ्यांमधील मतभेद उघड झाले.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईची परिस्थिती बिकट झाली असून शाळांना तत्काळ सुटी द्यावी अशी मागणी सभागृहात केली.

यावर, अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उत्तर देण्यासाठी उभं राहावं लागलं.

फडणवीस यावर म्हणाले की, "मुंबईत 11 ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे जर मुंबईत सुटी देण्यासारखी परिस्थिती असले तर शिक्षणमंत्र्यांनी याचा तत्काळ आढावा घ्यावा आणि सुटी घेण्याबाबत निर्णय घ्यावा."

तसंच, अकरावी आणि बारावीच्या प्रवेशांसाठी अडचणी येणार असतील तर त्याची मुदत वाढवण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

त्यामुळे शिक्षणमंत्री शाळांना सुट्टी न देण्यावर ठाम असल्याचं दिसलं. तर, भाजपच्या शेलारांनी शाळांना सुट्टी देण्याची मागणी केली. यातून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद असल्याची बाब पुढे आली.

सकाळी 10.40 - मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

जोरदार पावसाचा फटका पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेलाही बसला आहे. सायन-माटुंगादरम्यान, रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटे उशिराने सुरू असल्याचं मध्य रेल्वेनं ट्वीट करुन स्पष्ट केलं.

मध्य रेल्वेची वाहतूक सर्व ती काळजी घेऊनच सुरू ठेवल्याचं मध्य रेल्वेनं ट्वीटद्वारे सांगितलं. त्यामुळे पश्चिम रेल्वे बरोबरीनेच मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

सकाळी 10.30 - ठाण्यात 6 वाहनांवर भिंत कोसळली

पावसामुळे ठाण्यातील राबोडी भागातील राबोडी कोकणी कब्रस्तानाच्या कंपाऊंडची जवळपास 30 फूट लांब भिंत कोसळली आहे. ही भिंत 5 बाईक आणि एका ऑटो रिक्षेवर कोसळली आहे.

भींतीचा उर्वरित भाग धोकादायक अवस्थेत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. यात कोणीही जखमी झालेलं नसून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्याची माहिती ठाणे महापालिकेकडून देण्यात आली.

सकाळी 10.25 - मध्य रेल्वे सुरळीत असल्याचा दावा

मध्य रेल्वे सुरळीत असल्याचा दावा मध्य रेल्वेनं ट्वीट करुन केला आहे.

सायन-माटुंगा दरम्यान जोरदार पावसामुळे वाहतूक काहीशी धिम्या गतीनं सुरू असली तरी रेल्वे सेवा सुरळीत असल्याचं त्यांनी ट्वीटद्वारे सांगितलं आहे.

सकाळी 10.15 - 'मुंबईकरांनो काळजी घ्या'

गेल्या २४ तासात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस पडल्याने मुंबईच्या सखल भागात पाणी तुंबलं आहे.

याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले, "मुंबईकरांनी पावसात स्वत:ची काळजी घ्यावी आणि आवश्यकता असेल तरंच घराबाहेर पडावं. मुंबईच्या सखल भागात पाणी तुंबलं असून महानगरपालिकेतर्फे एकूण २९८ पंप ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. महापालिकेच्या सर्व शाळा सध्यातरी नियमितपणे सुरू आहेत. पण पावसाचा जोर आणखी वाढला तर सुट्टी द्यावी लागेल."

सकाळी 10 - लांबपल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा

पश्चिम रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबवण्यात आलं आहे.

1) राजकोट-मुंबई दुरंतो - केळवे

2) सुवर्ण मंदिर एक्स्प्रेस - वैतरणा

3) गुजरात मेल - केळवे आणि सफाळेच्या मध्ये

4) अवंतिका एक्स्प्रेस - सफाळे

5) गंगौर एक्स्प्रेस - डहाणू

6) सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस - डहाणू

7) लखनौ - वांद्रे एक्स्प्रेस - बोईसर

8) पनवेल मेमू - बोईसर

9) मुंबई राजधानी एक्स्प्रेस - वापी

10)ऑगस्ट क्रांती राजधानी - अमलसाड

11) अवध एक्स्प्रेस - भिलाड

12) रानकपूर एक्स्प्रेस - संजाण

13)गाझीपूर - बांद्रा एक्स्प्रेस - अमलसाड

सकाळी 9.57 - मध्य रेल्वे मंदावली

पावसामुळे मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि सायन रेल्वे स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली आहे.

सकाळी 9.45 - डबेवाल्यांची सेवा बंद

डबेवाले संघटनेनं आज मुंबईत डबे पोहचवण्याचा व्यवसाय बंद ठेवला आहे. डबेवाल्यांना सकाळी ७ वाजताच घरातून डबे न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी ही माहिती दिली आहे.

सकाळी 9.42 - हिंदमाता आणि चेंबुरमध्ये पाणी भरले

सोमवार सकाळी आठ ते मंगळवार सकाळी ८ वाजेपर्यंत मुंबई शहरात १६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पूर्व उपनगर १२३ मिमी आणि पश्चिम उपनगर १६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हिंदमाता परिसर आणि चेंबुरच्या पोस्टल कॉलनीमध्ये पाणी साचल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नालासोपाऱ्यात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यामुळे वसई ते विरार रेल्वे वाहतून बंद करण्यात आली आहे. तर चर्चगेट ते वसई रेल्वे वाहतून धीम्या गतीनं सुरू आहे.

मुसळधार पावसाचा परिणाम मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर रेल्वे मार्गावरही झाला असून या मार्गांवरील वाहतूक १५-२० मिनिटं उशिरानं सुरू आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)