You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मोदींच्या मंत्र्यांची कथित गुन्हेगारांशी एवढी जवळीक का?'
- Author, राजेश जोशी
- Role, रेडिओ एडिटर, बीबीसी हिंदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी कथित गुन्हेगारांशी जवळीक का साधतात? त्यांना असं का करावं लागतं? राजेश जोशी यांचा दृष्टिकोन...
जमावाने हत्या करण्याच्या प्रकरणातील आरोपींना मिठाई खाऊ घालताना केंद्रीय मंत्र्यांचा फोटो भारतासाठी सगळ्यांत नामुष्की ओढवणारा क्षण असायला हवा. पण हे वागणं म्हणजे देशाच्या कायद्याशी असलेली कटिबद्धता असल्याचं केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा सांगतात.
हत्येचा आरोप असलेल्या लोकांचं सार्वजनिकरीत्या अभिनंदन करणारे जयंत सिन्हा एकटेच नाही. त्याआधी अशाच प्रकरणात आरोपी असलेल्या एकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यानंतर देशाचे सांस्कृतिक मंत्री त्याच्या मृतदेहासमोर नमन करताना दिसले. त्याच वेळी मोहम्मद अखलाकच्या घटनेला 'मामूली घटना' असं त्यांनी संबोधलं.
राजस्थानचे ज्येष्ठ भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी गेल्या वर्षी गोरक्षक जमावाने भररस्त्यात मारल्या गेलेल्या पहलू खानच्या हत्येवर दोन्ही बाजूच्या जमावाला जबाबदार ठरवलं आणि या हत्येला सामान्य ठरवण्याचा प्रयत्न केला.
आणि आता केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना रडू कोसळलं. दंगल पसरवण्याचा आरोप असणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची विचारपूस करायला ते बिहारच्या नवादा तुरुंगात गेले होते. आपले अश्रू पुसत नितीश सरकारवर हिंदूंना दाबण्याचा आरोप केला.
या मंत्र्यांच्या 'साधेपणा'वर जीव ओवाळून टाकावा का? ते लढतात पण त्यांच्या हाती तलवारही नसते.
आता जिथे केंद्र सरकार आणि राज्यांचे मंत्री जमावाकडून झालेल्या हत्यांसंदर्भात सारवासारव करताना दिसतात, तिथे लहानसहान भागात तयार झालेल्या गोरक्षा समितीच्या लोकांची छाती किती फुलत असेल विचार करा.
हत्येचे मारेकऱ्यांचीभगत सिंहाशी तुलना
मागच्या वर्षी 29 जूनला झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात एका जमावाने 55 वर्षीय अलीमुद्दीन अन्सारींचा पाठलाग केला आणि बाजारटांड भागात आधी त्यांच्या व्हॅनला आग लावली आणि नंतर सगळ्यांसमोर भररस्त्यात त्यांची मारहाण करत हत्या केली. जमावाला शंका होती की अलीमुद्दीन आपल्या गाडीतून गोमांसाचा पुरवठा करतात. अशीच शंका दादरीजवळ मोहम्मद अखलाक यांच्यावर हल्ला करणाऱ्या जमावाला आली होती.
मात्र यावेळी ही गर्दी त्या लोकांची नव्हती ज्यांच्याविषयी एका परिषदेत पंतप्रधान म्हणाले होते, "गोरक्षणाच्या नावावर लोक दुकान उघडून बसले आहेत." त्यांच्याच पक्षाच्या लोकांवर या जमावात सामील असल्याचा आरोप होता.
अलीमुद्दीन अन्सारीच्या खुनाच्या आरोपाखाली फास्ट ट्रॅक कोर्टाने ज्या 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, त्यात भाजपचे स्थानिक नेते नित्यानंद महतो, गोरक्षण समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बजरंग दलाचे कार्यकर्ते सामील होते.
हत्येच्या आरोपाखाली शिक्षा झालेल्या लोकांना जामीन मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी आपल्या घरी असं आदरातिथ्य केलं जणू ते खुनाचे आरोपी नाहीत, तर भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांच्यासारखे राष्ट्रीय हिरो आहेत. जेव्हा हत्येच्या आरोपींबरोबर सरकार नावाची सशक्त संस्था उभी राहते तेव्हा मोहम्मद अखलाक किंवा अलीमुद्दीन अन्सारी यांना न्याय मिळण्याची शक्यता किती उरते?
हार्वर्ड विद्यापीठातून शिकून आलेल्यांना राजकारण कळतं
महेश शर्मा आणि जयंत सिन्हा यांना जाणीव आहे की, घटनेशी निष्ठा ठेवण्याची शपथ घेतल्यावर आणि केंद्रात जबाबदारीचं पद भूषवताना कोणत्याही आरोपींचं समर्थन ते करू शकत नाही. म्हणूनच कदाचित ते फुलं माळा घालतानाच एक निवेदन जारी करतात, "या नाट्यातील सर्व पात्रं काल्पनिक आहेत आणि त्याचा कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही.
जयंत सिन्हा यांनी शनिवारी ट्विटरवर एक निवेदन जारी केलं, "मी सर्व प्रकारच्या हिंसेचा निषेध करतो."
मात्र जयंत सिन्हांनी ज्या लोकांना हार घातले त्यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत एका माणसाला मारल्याचा आरोप आहे हेही तितकंच खरं आहे. हायकोर्टानेसुद्धा त्यांची निर्दोष मुक्तता केली नाही, फक्त जामीन दिला आहे.
आपल्या कोणत्या कामाचा काय संदेश जनतेपर्यंत जातो आणि त्याचा काय फायदा होतो याची राजकारण्यांना पुरेपूर जाणीव असते. देशाची घटना आणि कायद्यामुळे राजकारण्यांचे हात अनेकदा बांधले जातात. मात्र तरीही डिस्क्लेमर लावून ते आपलं म्हणणं मांडतात. यामुळे कायद्याच्या कलमांचं उल्लंघनही होत नाही आणि ज्यांच्यापर्यंत हे म्हणणं पोहोचवायचं आहे तो लक्ष्यभेदही होतो.
जयंत सिन्हा कडवे हिंदुत्ववादी नाहीत. त्यांनी बजरंग दलाच्या शाखेत राजकारणाचे धडे गिरवलेले नाहीत. ते अर्थशास्त्राचे जाणकार आहेत. जागतिक स्तरावर प्रतिष्ठेच्या हॉर्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं आहे. मात्र ज्या पद्धतीचं राजकारण ते करत आहेत, त्यानुसार आपल्याला बजरंग दल आणि गोरक्षकांची गरज लागेल. म्हणूनच लिंचिंग अर्थात जमावाने हत्या करण्याच्या आरोपींची सुटका होण्याआधीच ते स्वत:च त्यांना मुक्त करतात.
पंतप्रधानांचा ओरडा आणि मंत्र्यांचं गोंजारणं
याचं कारण साधं-सोपं आहे. देशात हिंदुत्वाचं राजकारण खेळतं राहण्यासाठी लाठ्याकाठ्यांनिशी वावरणारे गोरक्षक रस्त्यावर फिरत राहणं आवश्यक आहे. त्यांची प्रत्येक कृती, कारवाई बरोबर ठरवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पकडण्यात आल्यावर त्यांना निर्दोष ठरवण्याचा त्यांचा पुरेपूर अट्टाहास असतो. गोरक्षक म्हणून काम करताना एखाद्या अपराधामुळे त्यांचं मनोधैर्य खचू नये यासाठीही काळजी घेतली जाते.
गोरक्षकांचं खच्चीकरण झालं तर किंवा त्यांच्या कायदेशीर-बेकायदेशीर कामांना सत्ताधाऱ्यांकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समर्थन मिळालं नाही तर मग ही मंडळी सत्ताधाऱ्यांची सत्ता टिकून राहण्याकरता स्वत:चा जीव का पणाला लावतील? गोरक्षकांच्या कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा अराजक माजलेला देश म्हणून होऊ नये तसंच पंतप्रधान मोदी यांची शिस्तबद्ध प्रशासक या प्रतिमेला तडा जाऊ नये याची काळजी घेण्यात येते.
म्हणूनच कथित गोरक्षकांमुळे होणाऱ्या बदनामीचं प्रमाण हाताबाहेर गेलंय असं वाटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरक्षकांना एखाद्या सेमिनारमध्ये दोन-चार गोष्टी सुनावतात. जेणेकरून फिट्मफाट होते.
लाठ्याकाठ्यांनिशी काम करणाऱ्या गोरक्षकांना ही कानउघाडणी म्हणजे पंतप्रधानांसाठी कायदेशीर नाईलाज असल्याचं ठाऊक आहे. म्हणूनच जयंत सिन्हा आणि महेश शर्मा किंवा गुलाबचंद कटारिया यांच्याकडून होणाऱ्या कौतुकाने हुरळून जात नाहीत आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडून होणारी कानउघडणी फारशा गांभीर्याने घेत नाहीत.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून मिळालेला ओरडा आणि मंत्र्यांकडून होणारी भलामण एकाच राजकारणाचा भाग आहेत. गोरक्षकांसंदर्भात खूप बभ्रा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी कानउघाडणी करावी, मात्र त्याचवेळी गोरक्षकांच्या भल्या-बुऱ्या कृत्याला योग्य ठरवण्यात यावं आणि त्यांच्यावर मंत्र्यांचा वरदहस्त कायम राहावा. गोरक्षक हायवेवरून येण्या- जाणाऱ्या ट्रकची झडती घेतात. या ट्रकमध्ये गाई-म्हशींना घेऊन जाणारा एकटा दुर्बळ मुसलमान आढळला तर रस्त्यावर त्याला बेदम मारहाणीची तयारी केली जाते.
अशा पद्धतीने मुसलमानांच्या मनात हिंदूंच्या ताकदीबाबतचं भय कायम राखलं जातं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)