Delhi Gang Rape 2012 : निर्भयाने झुंज दिलेले ते अखेरचे 14 दिवस...

फोटो स्रोत, Getty Images
निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीबाबत दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांचं मत नोंदवलं आहे.
"दोषींपैकी एकाची दयायाचिका प्रलंबित आहे याचा अर्थ असा नाही की इतरांना फाशी देण्यात यावी, सर्वांची फाशीची शिक्षा एकत्रच अंमलात आणता येऊ शकते," असं निरिक्षण दिल्ली उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
त्यामुळे कोर्टानं चारही दोषींना त्यांच्या कायदेशीर शंकांचं निरसन करण्यासाठी एक आठवड्यांचा अवधी दिला आहे. त्यानंतर मात्र त्यांच्या डेथ वॉरंटची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत.
निर्भयाच्या आईनं मात्र कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ज्या एका दोषीची दयायाचिका प्रलंबित आहे ती सरकारनं फेटाळून लावावी आणि दोषींना लवकर फाशी व्हावी असं त्यांनी म्हटलं आहे.
आधी टळली होती फाशी
'निर्भया' बलात्कार प्रकरणातल्या दोषींची फशीची शिक्षा 31 जानेवारीला पुन्हा एकदा टळली होती.
त्यानंतर निर्भयाच्या आईने मात्र अतिव दुःख व्यक्त केलं. दोषींची फाशी सतत टाळून आम्हाला त्रास दिला जात असल्याचं निर्भयाच्या आईनं म्हटलं.
दोषींच्या वकिलांकडून आम्हाला आव्हान दिलं जात असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला.
एकतर दोषींना फाशी द्या, नाही तर संविधान जाळा, असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला.
दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये सहा जणांनी या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणानंतर संपूर्ण देशात जनक्षोभ उसळला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
यातील एक दोषी अल्पवयीन असल्याने त्याला शिक्षा झाली नाही. तर, एका आरोपीनं तिहार जेलमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली. तर 4 आरोपींना देण्यात आलेली फाशी सुप्रीम कोर्टानं कायम ठेवली होती. यातल्याच तिघांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली.
16 डिसेंबर 2012 च्या रात्री दिल्लीमधल्या रस्त्यावर एका बसमध्ये ही घटना घडली. या भीषण घटनेनंतर देशभरात नागरिक रस्त्यावर उतरले. दोषींना तत्काळ फासावर लटकवलं जावं अशी मागणी त्यावेळी जनतेकडून होत होती.
बलात्काराच्या घटनेनंतर 13 दिवसांनी उपचार सुरू असताना निर्भयाचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, AFP
या 13 दिवसांत देशांत अनेक घटनांची मालिका घडली. जाणून घ्या काय घडलं बलात्काराच्यावेळी आणि बलात्कारानंतर...
दिवस पहिला : 16 डिसेंबर
16 डिसेंबरच्या रात्री 9 वाजताची घटना. पॅरामेडीकल शाखेची 23 वर्षीय विद्यार्थिनी (निर्भया) आणि तिचा मित्र यांनी दक्षिण दिल्लीतल्या साकेतमधल्या सिलेक्ट सिटी वॉल मॉलमध्ये एकत्र लाईफ ऑफ पाय हा चित्रपट पाहिला. घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट बघत असतानाच त्यांच्यासमोर एक खाजगी बस येऊन उभी राहिली. रिक्षा मिळत नसल्यानं आणि बस कंडक्टरनंही विचारल्यानंतर दोघांनी बसने जायचं ठरवलं. बसमध्ये ड्रायव्हरजवळ 4 जण बसले होते. तर दोन जण मागे बसले होते.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी प्रथम 20 रुपयांचं तिकीट काढलं. पण, त्यानंतर ड्रायव्हर केबिनमधले तीन जण मागे आले आणि ड्रायव्हरनंही बस भलत्याच मार्गाकडे वळवली. निर्भयासोबतच्या मुलानं याला विरोध करण्यासाठी सुरुवात केली. त्या तिघांनीही त्या मुलाला लोखंडी रॉडनं मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत मुलगा बेशुद्ध झाल्यावर त्यांनी आपला मोर्चा निर्भयाकडे वळवला. तिनं विरोध करण्यास सुरुवात केल्यावर एकानं निर्दयीपणे लोखंडी रॉड तिच्या गुप्तांगामध्ये सरकवून तिच्या आतड्यासह तो बाहेर काढला. यानंतर, महिपालपूरजवळ या दोघांनाही रस्त्यावर फेकून देण्यात आलं. रात्री 11 च्या दरम्यान त्यांना दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
दिवस दुसरा : 17 डिसेंबर
घटनेची माहिती देशात वाऱ्यासारखी पसरली. लोक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत दिल्ली पोलिसांनीही बलात्कार करणाऱ्या चौघांना शोधून ताब्यात घेतलं. बस चालक राम सिंग, त्याचा भाऊ मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्ता या चौघांचा यात समावेश होता.
डॉक्टरांनी निर्भयाला गंभीर जखमा दुखापत असल्याने तिची प्रकृती गंभीर असल्याचं जाहीर केलं.
दिवस तिसरा : 18 डिसेंबर
पोलिसांनी ताब्यात घेतलेला बस ड्रायव्हर राम सिंग यासह तिघांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली. दरम्यान, सर्व माध्यमांनी या बातमीचं वृत्ताकंन केल्यानं 18 तारखेच्या सकाळी हीच बातमी सगळीकडे दिसत होती. याच्या परिणामस्वरूप रस्त्यावर सुरू झालेल्या आंदोलनाने जनआंदोलनाचं रूप घेतलं.
दिवस चौथा : 19 डिसेंबर
निर्भयावर एकूण पाच शस्त्रक्रिया करण्यात झाल्या. यावेळी डॉक्टरांनी तिच्या आतड्यांचा बराचसा भाग काढून टाकला. निर्भयाची प्रकृती गंभीर झाली होती. आंदोलकही रस्त्यावरून हटण्यास तयार नसल्यानं पोलिसांना सुरक्षा वाढवावी लागली.
दिवस पाचवा : 20 डिसेंबर
दिल्ली पोलिसांनी निर्भयासोबत असलेल्या तिच्या मित्राचा जबाब नोंदवून घेतला. घटनेदरम्यान, त्याला जबर मारहाण झाल्यानं आणि मानसिक धक्का बसल्यानं तो चार दिवस बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता.

फोटो स्रोत, Getty Images
दिवस सहावा : 21 डिसेंबर
या आरोपींपैकी एका अल्पवयीन आरोपीला आनंद विहार बस टर्मिनलवरुन अटक करण्यात आली. निर्भयाच्या मित्रानं या आधीच अटक करण्यात आलेल्या मुकेश या आरोपीला ओळखलं. तसंच, या आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून दिल्ली पोलिसांनी हरीयाणा आणि बिहारमध्ये छापे टाकले आणि साहावा आरोपी अक्षय ठाकूर याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, निर्भयाची तब्येत खालावत चालल्यानं सरकारनं डॉक्टरांचं एक पथक तिच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी नेमलं. तिला उत्तम उपचार मिळावेत यासाठी या पथकाला काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले.
दिवस सातवा : 22 डिसेंबर
अक्षय ठाकूर याला बिहारमधून अटक करण्यात आली. त्याला तत्काळ बिहारहून दिल्लीला आणण्यात आलं.
दिवस आठवा : 23 डिसेंबर
निर्भयाला न्याय मिळावा यासाठी दिल्लीतील रस्त्यावर उतरलेला जमाव आक्रमक झाला. जमावावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल याचे आदेश देण्यात आले असूनही जमाव हिंसक झाला. दिल्ली पोलिसांचे हवालदार सुभाष तोमर हे यात जबर जखमी झाल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
दिवस नववा : 24 डिसेंबर
हवालदार सुभाष तोमर यांना गंभीर जखमा झाल्या असल्यानं त्यांची प्रकृती गंभीर जखमी असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. आंदोलनकर्त्यांचं उग्र रूप बघून देशाचे तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी स्वतः टीव्हीवर येऊन आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, "महिलांची सुरक्षा व्यवस्था आम्ही मजबूत करणार आहोत. त्यामुळे सध्या आंदोलनकर्त्यांनी घरी परत जावं."
दिवस दहावा : 25 डिसेंबर
दिल्ली पोलिसांचे हवालदार सुभाष तोमर यांची प्रकृती खालवल्यानं त्यांचा मृत्यू झाला. तर, याच दिवशी निर्भयाचा पोलिसांनी जबाब नोंदवला. यापूर्वीही तिचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, त्यावरून खूप मोठा वाद उसळला. जबाब नोंदवताना पोलीस अधिकाऱ्यांनी नीट वागणूक दिली नसल्याचा दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी आरोप केला. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांना लिहीलेल्या पत्रात दिक्षित यांनी लिहीलं की, "उपविभागीय अधिकारी उषा चतुर्वेदी या जेव्हा निर्भयाचा जबाब नोंदवून घेत होत्या, तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत योग्य व्यवहार केला नाही. दिल्ली पोलीस आयुक्तांनी मात्र या आरोपांचा तेव्हा इन्कार केला.
दिवस अकरावा : 26 डिसेंबर
निर्भयाला पुढील उपचारांसाठी सिंगापूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. तिला सिंगापूर इथल्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. याचवेळी तिला ह्रदयविकाराचा झटकाही आला.
यावेळी सिंगापूरमधल्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, "रुग्णाची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. तिची तपासणी सुरू असून भारतीय उच्चायोगातील अधिकारी आमच्यासोबत आहेत. आम्ही सर्व ते प्रयत्न करत आहोत."

फोटो स्रोत, Thinkstock
दिवस बारावा : 27 डिसेंबर
निर्भयाचे पालक आणि तिची आई निर्भयासोबत यावेळी सिंगापूरला होते. सिंगापूरला असताना निर्भयाच्या आईनं तिच्याशी संवादही साधला होता. निर्भयाचं आतडं काढावं लागल्यानं तिच्यावर भविष्यात आतडं प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करावी लागणार होती. मात्र, तिचे सगळे अवयव साथ देत नसल्यानं तिची प्रकृती स्थिर ठेवणं आवश्यक होतं.
दिल्लीतल्या गंगाराम हॉस्पीटलमधले आतड्यांच्या सर्जरीचे प्रमुख डॉ. समीरन नंदी यांनी बीबीसीला ही माहिती दिली.
नंदी सांगतात, "हवाई प्रवास करून सिंगापूरला नेण्यात असलेल्या अडचणी वेळीच ओळखायला हव्या होत्या. माझ्या मते सिंगापूरमधल्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये आतड्यांच्या प्रत्यारोपणाची एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. उलट आम्ही दिल्लीत आजवर दोनदा आतड्यांचं प्रत्यारोपण केलं आहे. पण, निर्भयाची तब्येत पाहता तिची तब्येत स्थिर ठेवणंच महत्त्वाचं होतं. त्यानंतर काही महिन्यांनीच हे प्रत्यारोपण करणं शक्य होतं."
दिवस तेरावा : 28 डिसेंबर
देशभरात निर्भयाची प्रकृती सुधारावी यासाठी एकत्र प्रार्थना झाल्या. मात्र, सिंगापूरमध्ये हॉस्पीटलमध्ये कोणत्याही उपचारास निर्भयाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. तिची अवस्था खूप नाजूक झाली होती.
दिवस चौदावा : 29 डिसेंबर
अखेर शरीरातील बहुतांश अवयवांचं काम थांबल्यानं याच दिवशी रात्री 2 वाजून 15 मिनिटांनी निर्भयाचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे आरोपींवर खुनाचे आरोपही ठेवण्यात आले.
निर्भयाच्या मृत्युमुळे व्यथित झालेल्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्राला उद्देशून शोकसंदेश या दिवशी दिला. या शोकसंदेशात ते म्हणाले होते की, "सिंगापूरमध्ये 23 वर्षीय तरुणीचा दुःखद मृत्यू झाला. ती एक लढवय्यी मुलगी होती. तिनं शेवटच्या क्षणापर्यंत सन्मानानं लढली. ती यामुळे भारतीय युवांमधल्या महिलांचं प्रतीक बनली आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)










