You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : 'स्विस बँकेतला पैसा वाढला : कारण भारतीय बँकांवर भरवसा नाही'
स्विस बँकेतील भारतीयांच्या पैशामध्ये 50 टक्के वाढ झाल्याचं वृत्त आहे. त्यावर बीबीसी मराठीच्या वाचकांनी व्यक्त केलेल्या काही प्रतिक्रिया
2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं होतं. पण या वर्षी स्विस बँकेतील भारतीयांच्या पैशामध्ये 50 टक्के वाढ झाली आहे, अशी बातमी समोर आली आहे.
बीबीसी मराठीच्या आजच्या 'होऊ द्या चर्चा' या सदरात याच मुद्द्यावर प्रश्न विचारला होता. त्यावर वाचकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारतीय बँकांवर भरोसा राहिला नाही त्यामुळे लोक स्विस बँकेत पैसा ठेवत आहेत, असा कयास संकेत साबळे यांनी बांधला आहे. ते लिहितात, "बरोबर आहे. आपल्याकडील मोठ्या बँकाचा भरवसाच नाही राहिला. कधी घोटाळा करुन कंगाल होतील सांगताच येत नाही. त्यापेक्षा स्विस बँक परवडली..."
भारतीय बँकेवरचा विश्वास उडाला आहे, असं श्रीकांत जुनानकर यांनाही वाटतं.
भरत माने यांना हा प्रकार म्हणजे लोकांची जुनी बुरसटलेली अर्थनीती आहे असं वाटतं. त्यांच्या मते, "पुन्हा हाच पैसा (स्विस बँकेतला पैसा) पांढरा करण्यासाठी परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून तो आपल्याच देशात गुंतवला जाईल आणि थेट परकीय गुंतवणूक आमच्या सरकारच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात झाली याचा दिंडोरा पिटला जाईल. हा देश मात्र सामान्य माणसांच्या रक्तावर चालेल. यात वेगळं असं नवल काही नाही!"
स्विस बँकेत पैसे ठेवणाऱ्या भारतीयांची नावं जाहीर करावी, असं प्रमोद बोभाटे यांनी मागणी केली.
"भारत गरीब देश नाही हे नक्की," असा टोमणा प्रसाद चव्हाण यांनी मारला आहे.
2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्विस बँकेतला काळा पैसा भारतात आल्यावर प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील असं वक्तव्य केलं होतं. त्याचीच आठवण करून देत काही वाचक 15 लाख रुपयांचं काय झालं? असे प्रश्न विचारत आहेत.
रमेश सकपाळे यांनीही असाच प्रश्न विचारला आहे. "म्हणजे मोदींच्या आश्वासनापैकी 15 लाखांची सर्वसामान्यांनी अपेक्षा करायला हरकत नाही," असं ते लिहितात.
तर 'कुठे ठेवलेत माझे 15 लाख', असा खोचक सवाल कैलास बाबर यांनी केला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)