घाटकोपर विमान अपघात : नागरिकांना 'आता विमान दिसलं तरी चिंता वाटते'

फोटो स्रोत, Janhavee Moole/BBC
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
28 जून 2018. मुंबईतच्या पावसाळ्यातली एक नेहमीसारखीच आळसावलेली दुपार. घाटकोपर पश्चिम परिसरातल्या शंकर सागर इमारतीत राहणाऱ्या तरुणा पटेल आपल्या कुटुंबीयांसोबत गप्पा मारत बसल्या होत्या.
"आमच्याकडे पाहुणे आले होते. माझा मुलगा शाळेतून आल्यावर जेवू या म्हणून आम्ही वाट पाहात होतो."
पण तेव्हाच बाहेर मोठा आवाज झाला. "तो कसलातरी स्फोट होता, आम्ही क्षणभर दचकलोच. खिडक्या उघडून बाहेर पाहिलं, तेव्हा आगीचा मोठा लोळ उठलेला दिसला. रस्त्यावरही आग पसरली होती," तरुणा पटेल सांगतात.
नेमकं काय घडलंय, हे त्यांना समजेपर्यंत काही काळ जावा लागला. त्यांच्या इमारतीच्या कोपऱ्यावर, रस्त्याच्या पलीकडेच विमान कोसळलं होतं.

फोटो स्रोत, BBC/Amit Shah
यूवाय एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीचं ते विमान, जुहू इथून टेस्ट फ्लाईटसाठी उडवण्यात आलं होतं. पण परतताना घाटकोपरमध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात ते कोसळलं. विमानातील चारही कर्मचारी आणि रस्त्यावरील एका नागरिकाचा मृत्यू झाला तर आणखी दोन जण जखमी झाले. या दुर्घटनेमागचं कारण काय होतं याचा तपास सुरू आहे आणि वेगवेगळे कयासही लावले जात आहेत.
पण घाटकोपरमध्ये, नेहमीसारखं जनजीवन पुन्हा सुरळीत झाल्यावरही लोकांच्या मनात एक चिंता डोकावते आहे.
'भीती नाही, पण चिंता वाटते'
"विमान थोडं मागे कोसळलं असतं, तर काय झालं असतं, याचा मी विचारही नाही करू शकत. ते मोकळ्या जागी पडलं, म्हणून मोठी जीवीतहानी झाली नाही. कुठल्या बिल्डिंगवर पडलं असतं, खूप नुकसान झालं असतं." तरुणा यांची नणंद कुसुम पटेल सांगतात.
"मी याच परिसरात लहानाची मोठी झाले, इथेच राहतेय. त्यामुळं आम्हाला डोक्यावरून उडत जाणाऱ्या विमानांची सवय आहे. पण असा अपघात कधीच झाला नव्हता. आताही आम्हाला भीती वाटत नाही, पण चिंता जरूर वाटते." कुसुम सांगतात.

"यापुढे असं काही होणार नाही, याची काळजी घेतली जावी. हा फारच गजबजलेला भाग आहे," तरुणा आपली अपेक्षा व्यक्त करतात.
घाटकोपर स्टेशनपासून ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील कुंपणापर्यंतच्या भागातील इमारती आणि झोपडपट्ट्यांमध्ये हजारो लोक राहतात.
याच परिसरात असल्फा मेट्रो स्टेशनजवळच्या भागात प्रथमेश लोखंडे यांचं वास्तव्य आहे. विमानतळावर उतरण्यासाठी जाणाऱ्या विमानांच्या मार्गाच्या अगदी थेट खालीच त्यांचं आहे. गुरुवारी विमान कोसळलं, तेव्हा प्रथमेश तिथं लगेच धावत गेले आणि त्यांनी बचावकार्यात मदतही केली.
दुसऱ्या दिवशी आमच्याशी बोलताना प्रथमेशनं आसपासच्या लोकांसोबत झालेल्या चर्चेविषयी सांगितलं. "आम्ही हेच बोलत होतो की आपल्या इथे असं काही झालं, तर केवढं मोठं नुकसान होईल. अगदी अरुंद गल्ली बोळ आहेत, फायर ब्रिगेडवालेही पोहचू शकणार नाहीत वेळेत. आम्हाला काळजी तर वाटणारच."
जाणकारांचं म्हणणं काय आहे?
भर वस्तीत एखादं विमान कोसळतं, तेव्हा लोकांना अशी अस्वस्थता वाटणं स्वाभाविक आहे. पण त्यांनी घाबरून जाऊ नये, असं कॅप्टन निलेश बापट सांगतात. ते गो-एअर या खासगी एअरलाईनसोबत पायलट म्हणून काम करतात.
"मुंबईचा समावेश 'critical airfields'मध्ये (धोकादायक विमानतळ) नाही. म्हणजे हे उड्डाणांसाठी सामान्य क्षेत्र आहे. विमानांचा लँडिंगसाठी येण्याचा विशिष्ट हवाई मार्ग आखून दिलेला आहे, पायलट्सना तो अचूकपणे पाळावा लागतो. अशा दुर्घटना सातत्यानं होत नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवं", असं कॅप्टन बापट सांगतात.

फोटो स्रोत, AMIT SHAH
अर्थात मुंबई हे पायलट्ससाठी आव्हान असल्याचं ते मान्य करतात. "मुंबईचं हवामान हे मोठं आव्हान आहे, विशेषतः पावसाळ्यात. आकाशात जमणारे ढगांचे थर आणि विजा विमानासाठी धोकादायक ठरू शकतात."
"मुंबईच्या विमानतळाभोवती अतिशय दाटीवाटीनं लोकवस्ती आहे आणि इथं हवाई वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. तुमच्या आसपास अनेक विमानं उडत असतात. त्यामुळं पायलटना अगदी सतर्क राहावं लागतं आणि आसपासच्या परिस्थितीचं भान ठेवावं लागतं", कॅप्टन बापट सांगतात.
एका वेळी एकाच धावपट्टीचा वापर करणाऱ्या विमानतळांमध्ये जगातला सर्वांत व्यग्र विमानतळ अशी मुंबईची ओळख आहे. 2017-18 या कालावधीत इथं दिवसाला सरासरी 874 विमानांनी लँडिंग किंवा टेकऑफ केलं तर 484.9 लक्ष प्रवाशांची इथून ये-जा होते. अगदी अलीकडेच, 6 जून रोजी मुंबई विमानतळावरून एकाच दिवसात 1,003 विमानांनी लँडिंग अथवा टेकऑफ केलं.
पण हवाई वाहतूक वाढली, तरी शहरातील हवाई सुरक्षेच्या मानकांविषयीची जाणीव चिंताजनक आहे, असं मत जाणकारांनी वेळोवेळी व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, BBC/KunalKotak
माजी पायलट-इन्स्ट्रक्टर आणि civil aviation safety advisory council चे सदस्य कॅप्टन मोहन रंगनाथन यांच्या मते शासनानं आणि नागरिकांनीही विमानांच्या मार्गाजवळ वाढती वस्ती आणि या भागातील इमारतींची उंची याकडे गांभीर्यानं पाहायला हवं.
"विमानतळ परिसरात शंभरहून अधिक इमारती आहेत ज्या उभारताना नियम मोडले आहेत आणि त्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. मुंबईत विमान उडवताना ते कधीही धोक्याचं ठरू शकतं," असं कॅप्टन रंगनाथन सांगतात.
"विमान कोसळणं किंवा downdraft (वरून येणाऱ्या हवेच्या झोतामुळं विमान खाली येणं) यासारखी घटना विमानतळाच्या हद्दीबाहेर घडली, तर मोठी जीवीतहानी होणं शक्य आहे. कारण या भागात अग्निशमन दल आणि बचावपथकं वेळेवर पोहोचू शकणार नाहीत इतके इथले रस्ते अरूंद आणि गर्दीनं भरलेले आहेत. आपलं नशीब की दुर्घटना झालेलं विमान लहान होतं आणि काहीशा मोकळ्या भागात ते कोसळलं", ते सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








