You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इरफान खान यांनी 'त्या' पत्रात 2 वर्षांत मृत्यूची शक्यता व्यक्त केली होती
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते इरफान खान यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरलीय. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात इरफान खान यांचं निधन झालं.
दोन वर्षांपूर्वी न्यूरोएंडोक्राइन या आजाराचं निदान झाल्यावर त्यांनी रुग्णालयातून आपल्या चाहत्यांसाठी आणि कुटुंबीयांसाठी एक पत्र लिहिलं होतं त्याचा अनुवाद या ठिकाणी देत आहोत.
काही महिन्यापूर्वी अचानक समजलं की मला न्यूरॉएन्डोक्राइन कॅन्सर झाला आहे. असा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला होता.
मी शोध घ्यायचा प्रयत्न केला तर याबद्दल अजून पुरेसं संशोधन झालं नसल्याचं दिसून आलं. यामध्ये शरीराची विचित्र अवस्था होऊन बसते आणि त्यावर क्वचितच उपचार होऊ शकतो.
आतापर्यंत माझ्या जीवनात अनेक चढ-उतार झाले. माझ्या बरोबर माझ्या आशा, आकांक्षा आणि स्वप्नं होती. मी माझ्या स्वप्नात रमलो होतो पण अचानक असं वाटलं की, TCने पाठीवर थाप मारली आणि म्हटलं- तुमचं स्टेशन आलं आहे, कृपया खाली उतरा आता.
मला समजलंच नाही, मी 'नाही नाही माझं स्टेशन आलं नाही', असं म्हणालो.
मला उत्तर मिळालं, "तुम्हाला पुढच्या कोणत्याही स्टेशनवर उतरावं लागेल, तुमचं स्टेशन मागे गेलं आहे."
मग एखाद्या बाटलीच्या झाकणासारखं अनोळखी समुद्राच्या लाटेवर आपण वाहत आहोत, याचं भान येतं आणि आपण या लाटांवर नियंत्रण मिळवू या भ्रमात राहतो.
अशा स्थितीत घाबरून मी माझ्या मुलाला सांगतो, आज या स्थितीत मला फक्त एकच गोष्ट पाहिजे. मला या निराश, घाबरलेल्या मानसिक स्थितीत नाही जगायचं. कोणत्याही परिस्थितीत मला माझ्या पायावर उभा राहायचं आहे. खंबीरपणे माझ्या अवस्थेकडे बघायचं आहे. असं मला वाटत होतं.
काही आठवड्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.खूप वेदना होत होत्या. इतक्या असह्य वेदना होतील असं कधीही वाटलं नव्हतं.
कोणताही इलाज होत नाही. ना कोणता दिलासा मिळत नाही. अख्खं आभाळ कोसळल्यासारखं वाटत होतं. माझ्याहून मोठ्या आणि भयानक कळा निघत होत्या.
मला भरती केलेल्या हॉस्पिटलला बाल्कनी आहे. तिथून सगळं दिसतं. कोमात गेलेल्या लोकांचा वार्ड माझ्या वरच्या मजल्यावर आहे. रस्त्याच्या एका बाजूला हे हॉस्पिटल आणि दुसऱ्या बाजूला लॉर्ड्स स्टेडियम आहे. त्या ठिकाणी व्हिव्हियन रिचर्ड्स यांचं एक हसरं पोस्टर आहे.
ही माझी लहानपणीची स्वप्नांची दुनिया होती. जणू माझ्या स्वप्नातलं मक्काच. पण आता त्याच्याकडे पाहिल्यावर काहीच कसं होत नाहीये मला. असं वाटतंय की ही दुनिया माझी नव्हतीच कधी.
मी दुःखाच्या गर्तेत अडकलोय.
परत एकदा मला जाणवलं की, माझं अस्तित्वच नाही, ज्यामुळं मला हायसं वाटलं. मी जे काही होतो ती एक निसर्गाची ताकद होती. हॉस्पिटल एक निमित्त होतं. अनिश्चितता हेच अंतिम सत्य आहे, असं मनातल्या मनात वाटलं.
या जाणिवेने मला वेगळाच आत्मविश्वास दिला. आता जे व्हायचं ते होईल. आजपासून 8 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी किंवा दोन वर्षांनी. चिंता कमी होत गेली आणि माझ्या मनातून जगण्या-मरण्याचा विचारच गळून पडला.
पहिल्यांदाच मला 'स्वातंत्र्य' या शब्दाचा खरा अर्थ कळाला. हे माझ्यासाठी मोठं यश होतं.
या निसर्गाच्या वरदानानंतर माझा विश्वासचं एक पूर्ण सत्य झालं. त्यानंतर तो विश्वासच माझ्यात रुजत गेला. तो टिकेल का नाही हे तर येणारा काळचं सांगेल. पण सध्यातरी मी त्याचा अनुभव घेतोय.
या सगळया प्रवासात जगभरातून कित्येक लोक माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यापैकी काहींना मी ओळखतो आणि काहींना नाही. असे सगळे लोक वेगवेगळ्या 'टाइम झोन'मध्ये प्रार्थना करत आहेत. मला वाटतं या सगळ्या प्रार्थना एकजूट झाल्या आहेत आणि त्याची एक मोठी शक्ती झाली आहे. त्याचा एक जीवन स्त्रोत होऊन माझ्या मनक्यातून वर येत कपाळात फुलत आहे.
ते फुलून कधी कळ्या, कधी पानं, कधी फांदी होत आहे. मी आनंदी होऊन त्याच्याकडे बघत असतो. लोकांच्या प्रार्थनेतून उभारेल्या पानातून, फांदीतून आणि फुलातून मला एक नवी दुनिया दिसते.
शेवटी समुद्राच्या लाटेवर बाटलीच्या झाकणाचं नियंत्रण असावं असं वाटत नाही. आपण निसर्गाच्या झोक्यावर बसून झोके घेत आहात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)