#5मोठ्याबातम्या : शेतकरी संप - रवीना टंडनचे घुमजाव तर पवार टीकेचे धनी

1. शेतकरी संप : रवीना टंडनने डिलिट केलं 'ते' ट्वीट

विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबद्दल अभिनेत्री रवीना टंडनने शनिवारी एका ट्वीटमधून "ही आंदोलन करण्याची काय पद्धत झाली? सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना तत्काळ अटक व्हावी," असं मत व्यक्त केलं होतं. पण त्याविरुद्ध लोकांनी रोष व्यक्त केल्यानंतर तिने ते लगेच डिलिट केलं.

"मी आंदोलकांना अन्न फेकून न देता गरिबांना वाटावं, अशी विनंती केली होती. मी नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने असून त्यांच्या सर्व समस्या सुटाव्यात अशी प्रार्थना करते," असं स्पष्टीकरण रवीनाने रविवारी दिलं आहे. सकाळने ही बातमी दिली आहे.

दरम्यान, सरकार दिलेली आश्वासनानं पाळत नसल्याने शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिला होता.

यावर भारिपचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी पवारांवर निशाणा साधत ,पवार हे शेतकऱ्यांचे नव्हे तर शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग समूहांचे नेते आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

तर पवारांचं वक्तव्य चिथावणीखोर असल्याची टीका भाजप नेते पाशा पटेल यांनी केल्याचं वृत्त लोकसत्ताने दिली आहे.

2. अमित शाह उद्या मातोश्रीवर?

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह बुधवारी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

शाह यांनी कर्नाटक निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती करण्याचा मानस व्यक्त केला होता, असं या बातमीत म्हटलं आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते दीपक सावंत यांनी महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीनुसार, सावंत यांनी त्यांचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे पाठवला आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत शिवसेनेने सावंत यांना पुन्हा उमेदवारी न देता विलास पोतनीस यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं बातमीत म्हटलं आहे.

3. अमृत फार्माचे शैलेश जोशी यांची आत्महत्या

अमृत फार्माचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश जोशी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. बेळगाव येथील त्यांच्या घरी त्यांनी आत्महत्या केली.

यकृताचा आजाराने ग्रस्त जोशी यांनी नैराश्येतून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्याचं लोकमतने आपल्या बातमीत म्हटलं आहे.

4. मॉन्सून उद्या राज्यात

मॉन्सून 6 जूनला राज्यात दाखल होण्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे. सकाळने ही बातमी दिली आहे.

मॉन्सूनने रविवारी बंगालच्या उपसागराचा नैऋत्य, ईशान्य आणि पूर्व-मध्य भाग व्यापला आहे. तसेच त्रिपुराच्या बहुतांश भागांत मॉन्सूनचे आगमन झाले असल्याचे केंद्रीय वेधशाळेने म्हटलं आहे.

5. NEETमध्ये बिहारची कल्पना कुमारी पहिली

देशातील MBBS आणि BDS प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या National Eligiblity-cum-Entrance Test (NEET UG 2018) या परीक्षेत बिहारच्या कल्पना कुमारीने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. कल्पनाला 720 पैकी 691 गुण मिळाले.

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसर या वर्षी 7,14,298 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पास केली. दिल्लीतील आठ विद्यार्थी पहिल्या 50मध्ये चमकले आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)