मित्राच्या खुनामुळे तुरुंगात गेलेला रोहन असा बनला चित्रकार आणि कवी

रोहन पै घुंगट हा 31 वर्षीय तरुण गेली 12 वर्ष गोव्यातल्या तुरुंगात आहे.

फोटो स्रोत, Manaswini Prabhune-Nayak

फोटो कॅप्शन, रोहन पै घुंगट हा 31 वर्षीय तरुण गेली 12 वर्ष गोव्यातल्या तुरुंगात आहे.
    • Author, मनस्विनी प्रभुणे-नायक
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"तुरुंगातील एक एक दिवस एक वर्षासारखा वाटतो. बाहेरच्या जगात वेळेचं महत्त्व समजत नव्हतं," 31 वर्षांचा रोहन पै घुंगट सांगतो. 12 वर्षांपासून गोव्यातल्या एका तुरुंगात तो आपल्याच मित्राच्या खुनात सहभागी झाल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगतोय.

"तुरुंगातील सुरुवातीचे दिवस खूप अस्वस्थेत गेले. पण असं किती दिवस चालणार? जितका वेळ आपल्या हातात आहे तो सत्कारणी लागला पाहिजे, असं वाटू लागलं. आपल्यालाच यामधून मार्ग काढायचाय हे लक्षात येताच कविता लेखन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वतःला गुंतवलं," तो पुढे सांगतो.

गेल्या 12 वर्षांत रोहनने चार शैक्षणिक पदव्या मिळवल्या आहेत. आता आपल्या कृतीतून आणि बोलण्यातून तो त्याच्यामध्ये घडलेला बदल व्यक्त करतो.

"याच एकटेपणाच्या काळात चित्रकलेनं मला सोबत केली आणि माझं विश्व बदलून गेलं," जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला रोहन मोठ्या उत्साहानं सांगतो.

नुकतंच पणजीमध्ये रोहनने काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. या प्रदर्शनासाठी त्याला तुरुंगातून विशेष परोल मिळाला होता, त्यामुळे त्याच्याशी संवाद साधणं शक्य झालं.

ती चूक

2006 साली घडलेल्या 'त्या' घटनेनं अख्खं गोवा हादरून गेलं होतं. रोहन तेव्हा 19 वर्षांचा होता. पणजीतील एका नामांकित महाविद्यालयात कायद्याचं शिक्षण घेत होता. आईवडील दोघेही डॉक्टर.

आपल्या व्यस्त दिनक्रमातून मुलाला वेळ देता यावा यासाठी आलटूनपालटून दोघेही वेळ काढायचे. रोहन अभ्यासात हुशार होता. मात्र चुकीच्या मित्रांच्या संगतीनं रोहनचा घात केला.

रायन पिंटो, नफियाज, शेख, शंकर तिवारी, सनी बेग आणि मंदार सुर्लकर हे सगळे अगदी घट्ट म्हणता येतील असे रोहनचे मित्र होते. या पाच जणांनी मिळून मंदारचं अपहरण करून त्याच्या घरच्यांकडून खंडणी उकळण्याचा प्लॅन आखला. खंडणीतून मिळणारे पैसे सर्वांनी मिळून वाटून घ्यायचे, असं ठरलं होतं. पण मंदारचा खून झाला!

15 ऑगस्टच्या दिवशी हे प्रकरण घडलं आणि संपूर्ण गोव्यात खळबळ माजली. त्यावेळची काही वृत्तपत्र चाळली असता या संदर्भातील अधिक माहिती त्यातून मिळाली.

गोव्यातील हेरॉल्ड या आघाडीच्या दैनिकात आलेल्या बातमीमध्ये असं लिहिलं आहे की, मंदारचं अपहरण आणि खून प्रकरणात रायन, नफियाज, शंकर, सनी आणि रोहन या पाच जणांना अटक झाली. सनी हा माफीचा साक्षीदार झाला आणि त्यामुळे या प्रकरणातील सर्व धागेदोरे समोर आले.

रोहनला सध्या लेखक आणि चित्रकार म्हणून ओळखलं जातं.

फोटो स्रोत, Manaswini Prabhune-Nayak

फोटो कॅप्शन, रोहनला सध्या लेखक आणि चित्रकार म्हणून ओळखलं जातं.

मंदारचं अपहरण करून त्याला रायनच्या उकसई मधील घरी घेऊन जात असताना रोहन मध्येच पणजीला उतरला आणि बाकी सारे उकसईला गेले. तिथून काही तासांनी मंदारच्या वडिलांना खंडणीचा फोन गेला. खंडणीचा फोन आल्यावर मंदारच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली.

रोहनला सर्वांत पहिली अटक झाली. दुसऱ्या दिवशी बाकी सर्वांना अटक झाली. या सर्वांवर व्यवस्थित प्लॅनिंगने अपहरण-खंडणी आणि खून करण्याचे गुन्हे दाखल झाले. यात सनी माफीचा साक्षीदार झाला आणि बाकी सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.

मंदारचा बेसबॉल बॅटने मारून खून करण्यात आला होता. आपल्याच मित्राचं अपहरण करून त्याचा खून केला, म्हणून हे प्रकरण सर्वत्र गाजलं.

2006 मध्ये ही घटना घडली तेव्हा मंदारसह बाकीचे सर्वजण अठरा-एकोणीस वर्षाचे होते. प्रत्यक्ष खून प्रसंगी रोहन तिथे हजर नसला तरी या सगळ्या प्रकरणात त्याचाही सहभाग होता. यावर त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

याच मुद्द्याला धरून रोहनच्या पालकांनी त्याला झालेल्या शिक्षेच्या विरोधात हायकोर्टात आव्हान दिलं आहे. अधिक जाणून घेण्याकरता आम्ही रोहनच्या पालकांशी संपर्क साधला, तेव्हा हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं यावर जास्त काही बोलता येणार नाही, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.

पालकांना त्रास

"तुरुंगात गेल्यावर केसचा निकाल लागायला 8 वर्षांचा काळ लागला. ही 8 वर्षं खूप त्रासाची होती. तुरुंगासारखी जागा आपल्यासाठी नाही. इथे मी असायला नको, असं माझंच मन मला सारखं सांगत होतं," असं रोहन सांगतो.

"आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा काळ मी तुरुंगात असाच वाया घालवू शकत नव्हतो. नव्याने काही शिकावंसं वाटू लागलं. तुरुंगातील अधिकाऱ्यांनीही प्रोत्साहन दिलं."

"मला शिक्षा झाल्यानंतर माझ्या आईवडिलांना अनेकांनी जबाबदार धरलं, हे बघून मला खूप दुःख झालं. आजूबाजूचे लोक, समस्त मीडिया यांनी माझ्या आईवडिलांना वेठीस धरलं. ते दोघेही आधीच माझ्यामुळे त्रस्त झाले होते, पण सर्व स्तरातून होणाऱ्या टीकेमुळे ते पुरते कोसळून गेले. त्यांचं सामाजिक जीवन पूर्णपणे बंद झालं. या सगळ्याचा माझ्या मनावर प्रचंड परिणाम झाला. त्यांची काही चूक नसताना त्यांना त्रास सहन करावा लागत होता," रोहनचं संवेदनशील मन बोलत होतं.

तुरुंगात गेल्यावर एका नव्या रोहनचा जन्म झाला. त्याची एक नवी ओळख तयार झाली. सकारात्मक दृष्टिकोन त्याच्या नव्या प्रवासात मदतीला आला.

तुरुगांत असताना घेतल्या 5 पदव्या

रोहननं तुरुंगातल्या वेळेचा सदुपयोग केला. त्याने या काळात एकच नव्हे तर पाच पदव्या संपादन केल्या. इंग्रजी वाड्मयात त्याने पहिल्यांदा बी.ए. केलं. मग Labour and Administrative Law पदवी घेतली, IDCचा Business Management अभ्यासक्रम, Communication and IT Skills हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्याने याच काळात 'Journalism and Mass Communication'चा पदव्युत्तर कोर्स आणि NGO Managementची पदवी देखील मिळवली.

रोहनच्या भावानं तो तुरुंगात असताना त्याला काही रंग-ब्रश आणि चित्रकलेची एक वही दिली होती.

फोटो स्रोत, Manaswini Prabhune-Nayak

फोटो कॅप्शन, रोहनच्या भावानं तो तुरुंगात असताना त्याला काही रंग-ब्रश आणि चित्रकलेची एक वही दिली होती.

आपण काही काळातच सुटणार आहोत, या आशेवर राहून तुरुंगातील बाकीचे कैदी काहीच करायचे नाही. तुरुंगातून बाहेर पडलो की नव्याने सुरुवात करू, असं त्यांना वाटायचं. पण रोहनला तसंच स्वस्थ बसणं पसंत नव्हतं.

या काळात तो कवितादेखील लिहू लागला. एकदा त्याच्या भावाने त्याला तुरुंगात भेटायला गेला असताना काही रंग-ब्रश आणि चित्रकलेची एक वही दिली. रोहननं शाळेत असताना फार मोठ्या आवडीनं तशी कधी चित्रं काढली नव्हती. हातात भरपूर वेळ उरायचा म्हणून त्यानं त्या वहीत चित्र काढायला सुरुवात केली आणि त्यात एकप्रकारचं समाधान सापडत गेलं.

तुरुंगातल्या अन्य कैद्यांच्या बरोबरीने 2011 मध्ये रोहननं पहिल्यांदा चित्र प्रदर्शनात सहभाग घेतला. त्यावेळी त्यानं 17 चित्रं ठेवली होती. त्याची सगळी चित्र विकली गेली. या प्रतिसादाने त्याला आणखी चित्र काढायचा हुरूप आला.

याच प्रदर्शनात रोहननं लिहिलेल्या काही कवितादेखील लावण्यात आल्या होत्या. रोहनने लिहिलेल्या कवितांचे दोन संग्रह प्रकाशित झाले आहेत.

चित्रकार आणि लेखक म्हणून नव्याने ओळख

आज रोहनची चित्रकार म्हणून नव्याने ओळख होऊ लागलीय. त्याची आजवर चार चित्र प्रदर्शनं झाली असून त्यापैकी सत्तरहून जास्त चित्रं विकली गेली आहेत.

चित्रकला आणि कविता या दोन गोष्टी त्याला काहीशा अनाहूतपणे गवसल्या. त्याबद्दल रोहन भरभरून बोलतो.

रोहनच्या चित्रांमध्ये बुद्धाच्या प्रतिमेला सर्वांत जास्त महत्त्व आहे.

फोटो स्रोत, Manaswini Prabhune-Nayak

फोटो कॅप्शन, रोहनच्या चित्रांमध्ये बुद्धाच्या प्रतिमेला सर्वांत जास्त महत्त्व आहे.

"एकटेपणा सतत घेरून टाकायचा. त्यातून मनात अनेक विचारांचे कल्लोळ माजायचे. त्याला मोकळं करण्यासाठी मी जसं जमेल तसं लिहू लागलो. जे लिहीत होतो ते पद्य प्रकारातलं होतं. त्यापूर्वी मी असं कधी लिहिलं नव्हतं," रोहन सांगतो.

"स्व. सिस्टर मेरी जेन या तुरुंगात भेटायला यायच्या. त्यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. ज्योकिम नावाचा तुरुंग अधिकारी होता त्याने त्याच्या घरात लावायला मी काढलेली चित्र घेतली. मी काढलेली चित्र कोणी घरातदेखील लावू शकतं, असा विचारही मी केला नव्हता. ज्योकिमनं मला नवा आत्मविश्वास दिला. माझ्या मनातला न्यूनगंड काढून टाकला."

"सिस्टर मेरी जेन यांनी रोहनच्या काही कविता 'प्रिझन व्हॉईस' या तुरुंगाच्या मासिकात पाठवल्या. त्यापैकी काही छापूनही आल्या.

2011 साली भरलेल्या पहिल्या प्रदर्शनात त्याच्या काही कविता वाचून डॉ. योगिनी आचार्य नावाच्या एका व्यक्तीचं त्याला तुरुंगात पत्र आलं. "त्यांना माझ्या कविता आवडल्या आणि मग त्यांनीच माझ्या कवितांचा संग्रह प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतला," रोहन सांगतो.

रोहनच्या अनेक चित्रांमध्ये बुद्धाची प्रतिमा दिसते. त्याबद्दल तो सांगतो, "बुद्ध मला सर्वांत जवळचा वाटतो. त्याचं तत्त्वज्ञान मला माहित नाही, बुद्धाबद्दल मी काही वाचलं देखील नाही. बुद्धाच्या काही गोष्टी ऐकल्या होत्या त्यावरून जेवढा समजला तेवढा बुद्ध माझ्या चित्रांमधून मी रंगवायचा प्रयत्न करतो."

"बुद्ध घरदार, धनधान्य-संपत्ती सोडून आत्मशोधाच्या प्रवासाला गेला. पूर्णपणे एकटा पडला असेल त्यावेळी त्याच्या मनात काय विचार आले असतील? याबद्दल मी विचार करू लागतो. माझं एकटेपण आणि त्याचे वेगवेगळे अर्थ लावायचा मी प्रयत्न करतो. बुद्धाचं चित्र काढताना मला समाधान, आत्मिक शांतता मिळते. मी स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. बुद्धाचं चित्र काढण्यात हेच मोठं सामर्थ्य आहे, असं मला वाटतं."

'तुरुंगातल्या वास्तव्यानं मला पुरतं बदलून टाकलं'

रोहनला नऊ वर्षांनंतर पहिल्यांदा परोल मिळाला. नऊ वर्षांनी तो पहिल्यांदाच काही दिवसांसाठी घरी परतत होता. रोहन थोडा भावूक होऊन बोलू लागला, "पहिल्यांदा परोल मिळाला तेव्हा मनातून मी खूप आनंदी झालो. खूप वर्षांनी मला घरी जाता येणार, मोकळ्या हवेत श्वास घेता येणार, याचा जास्त आनंद होता."

"तुरुंगात रात्री दिवे मालवत नाहीत. त्या दिव्यांच्या लख्ख प्रकाशातच झोपावं लागतं. घरी जाऊन काळोखात शांतपणे झोपायचं सुख मिळणार या विचारानेच मला छान वाटत होतं. पण प्रत्यक्षात रात्री दिवे मालवल्यानंतर मला झोपच येईना. झोपायला प्रयत्न करत होतो पण झोप येत नव्हती. शेवटी आई-बाबांच्या रूममध्ये जाऊन तिथे जमिनीवर झोपलो तेव्हा शांत झोप लागली. तुरुंगातील वास्तव्याने मला पुरतं बदलून टाकलं," तो भावूक होऊन सांगतो.

आता गुगलवर चित्रकार-कवी म्हणून जेव्हा माझी माहिती समोर येते तेव्हा खूप बरं वाटतं, रोहन सांगतो.

फोटो स्रोत, Manaswini Prabhune-Nayak

फोटो कॅप्शन, आता गुगलवर चित्रकार-कवी म्हणून जेव्हा माझी माहिती समोर येते तेव्हा खूप बरं वाटतं, रोहन सांगतो.

पॅरा ऑलिंपिक विजेती खेळाडू दीपा मलिकच्या आयुष्याबद्दल रोहनला कुठेतरी वाचायला मिळालं. त्या प्रेरणेतून त्याने दीपा मलिकवर एक कविता लिहिली. डॉ. योगिनी आचार्य यांच्या वाचनात ती कविता आल्यावर त्यांनी ती दीपा मलिकला इमेलवर पाठवली.

कविता वाचून दीपा दिल्लीहून गोव्यात रोहनला भेटायला आल्या. त्याला त्या तुरुंगात जाऊन भेटल्या. त्याच्या कवितांचं आणि चित्रांचं भरभरून कौतुक केलं. तुरुंगातील सर्वांनाच खूप आश्चर्य वाटलं.

आपण चुका केल्या तेव्हा समाजाने आपल्याला अनेक दूषणं दिली, पण आता जेव्हा आपण एका चांगल्या मार्गावर आहोत, अनेक चांगल्या गोष्टी करत आहोत तर त्याचंही कौतुक केलं जातंय, हे बघून रोहनला छान वाटतं.

"एक काळ असा होता की गुगलवर माझं नाव टाकलं की फक्त माझ्या केसबद्दलच्या, माझ्याबद्दलच्या नकारात्मक बातम्या यायच्या. पण आता ती ओळख पुसली जाऊन चित्रकार-कवी म्हणून जेव्हा माझी माहिती समोर येते तेव्हा खूप बरं वाटतं. हे सगळं माझ्या आई-बाबांना देखील थोडंफार का होईना समाधान देणारं आहे. त्यांनी माझ्याकडून केलेल्या अपेक्षांना मी पूर्णपणे उतरू शकलो नाही. पण आज मी ज्या वाटेवर आहे त्यात त्यांना माझ्याकडून कसं समाधान मिळेल याचा मी विचार करत असतो. माझं कवितांचं पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा आई-बाबांचा चेहरा बघण्यासारखा होता," तो सांगतो.

रोहन आता कोकणामध्ये कविता लिहीत आहे. या कवितादेखील पुस्तक रूपात प्रसिद्ध होतील. आयुष्यात खूप काही करण्यासारखं आहे त्यासाठी हातात असलेला वेळ देखील कमी आहे, याची त्याला जाणीव आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)