काश्मीर : नव्या 'जीप'प्रकरणानं पुन्हा तणाव

फोटो स्रोत, BILAL BAHADUR/BBC
सुरक्षा दलांच्या एका जीपने धडक दिलेल्या युवकाचा मृत्यू झाल्या नंतर श्रीनगरमध्ये तणाव निर्माण झाला असून तिथं सरकारविरोधातल्या आंदोलनांला पुन्हा जोर आला आहे.
शुक्रवारी श्रीनगरच्या डाउनटाऊन परिसरात सीआरपीएफच्या गाडीनं एका युवकाला धडक दिली. या अपघातामध्ये त्या युवकाचा मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव कैसर अहमद बट (21) आहे.
डाउनटाऊनमधीलच फतेह कदलमध्ये शनिवारी सायंकाळी सीआरपीएफच्या 82 बटालियनवर हातबाँब फेकण्यात आला. त्यात सीआरपीएफचे 3 जवान आणि 2 नागरिक जखमी झाले. या भागातली, गेल्या काही दिवसांत हातबाँब हल्ल्यांची ही पाचवी घटना आहे. शुक्रवारी सकाळी अनंतनाग इथं ही हातबाँब फेकण्यात आला होता.
त्यात सीआरपीएफचे 3 जवान आणि 2 नागरिक जखमी झाले होते. तर शनिवारी रात्री पीडीपीच्या एका आमदाराच्या घरावरही हातबाँब फेकण्यात आला.
शुक्रवारी नेमक काय घडलं?
शुक्रवारी दुपारच्या नमाजनंतर जामा मशिदीच्या बाहेर युवकांचा एक गट निदर्शने करण्यासाठी एकत्र आला होता. पोलिस अत्याचार करत असल्याचे आरोप करत या निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते.

फोटो स्रोत, BILAL BAHADUR/BBC
मशिदींमध्ये जहालवादी लपले असल्याच्या संशयावरून पोलिसांनी रमजानच्या महिन्यात मशिदींवर छापे टाकल्याचा आरोप निदर्शकांनी केला आहे.
गर्दीत जीप घुसली
याच वेळी सीआरपीएफची एक जीप आंदोलकांच्या दिशेने येताना दिसली. त्यामुळे तिथे जमलेले युवक जास्तच संतप्त झाले. ही गाडी जेव्हा गर्दीमध्ये आली तेव्हा बाचाबाची सुरू झाली. ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांच्या मते सीआरपीएफची ही गाडी गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती.
या गाडीने दोघांना धडक दिली. यात ते दोन युवक गंभीर जखमी झाले. जखमींतील कैसर अहमदचे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. कैसरच्या दफनविधीनंतर परत येणारे युवक आणि पोलीस यांच्यात बाचाबाचीच्या घटना घडल्या.
त्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. शनिवारी कैसरच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. यावेळी स्वतंत्र काश्मीरच्या घोषणा देण्यात आल्या.
या घटनेनंतर डाउनटाऊन परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
सीआरपीएफचा इन्कार
सीआरपीएफचे प्रवक्ते संजय शर्मा यांनी बीबीसीशी बोलताना, जमावाने गाडी उलटवण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती दिली. ते म्हणाले, "आमची गाडी या गर्दीच्या जवळ गेली. त्यावेळी 500 युवकांनी गाडीला घेरलं होतं. काही जण या गाडीवर चढले आणि गाडीतील पाच जवानांना बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. त्यात युवकाने गाडी खाली झोपून गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. आमच्या जवानांनी अत्यंत संयम बाळगत एकही गोळी चालवली नाही."

फोटो स्रोत, BILAL BAHADUR/BBC
या प्रकरणात पोलिसांत 2 तक्रारी नोंद झाल्या आहेत. पोलीस अधिकारी इम्तियाज परे म्हणाले, एक तक्रार सीआरपीएफच्या विरोधात आहे, तर दुसरी तक्रार दंगलीच्या संदर्भात आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना विचारलं आहे की "शस्त्रसंधीचा अर्थ बंदूक वापरायची नाही, पण जीप वापरायची असा आहे का?"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
काश्मीर बंदची हाक
फुटीरतावाद्यांनी रविवारी काश्मीर बंदची हाक दिली आहे. सामान्य लोकांच्या होत असलेल्या हत्येच्या निषेधार्थ हा बंद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने अनेक भागात संचारबंदी लागू केली आहे शिवाय इंटरनेट सेवा बंद केली आहे.
दरम्यान जीपवर उभा राहिलेल्या एका युवकाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. शनिवारी बहुतेक दुकानं बंदच होती.
गृहमंत्री राजनाथ सिंह काश्मीर भेटीवर येण्याची शक्यता असतानाच ही घटना घडली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








