You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एअर इंडिया कोळीकोड अपघात : एअर इंडियाच्या विमानाचे दोन तुकडे, पायलटसह 18 जणांचा मृत्यू
केरळच्या कोळीकोडमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात होऊन 18 जणांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसचं हे विमान होतं. घटनास्थळी NDRFची टीम दाखल झाली आहे.
"या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे, जखमी प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच जखमी प्रवाशांना विविध रूग्णालयात दाखल करण्यात आलंय," असं केरळचे पोलीस महासंचालक लोकनाथ बेहरा यांनी बीबीसीला सांगितलं आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत देण्याचे केरळ सरकारने घोषित केले आहे.
विमान लँड करताना ते रन वे सोडून पुढे गेल्याने हा अपघात झाल्याचं केरळचे कॅबिनेट मंत्री के राजू यांनी दिली आहे.
या विमानात 191 प्रवासी होते. यामध्ये दहा लहान मुलांचाही समावेश होता. वंदे भारत योजनेअंतर्गत परदेशातील भारतीयांना मायदेशी आणण्यात येतं. एअर इंडियाचं हे विमान दुबईहून आलं होतं, असं एअर इंडियानं सांगितलं आहे.
बोईंग 737 प्रकारचं हे विमान करीपूर धावपट्टीवर संध्याकाळी 7 वाजून 41 मिनिटांनी लॅंड करत होतं. त्यावेळी हे विमान धावपट्टीवरून घसरलं.
या विमानाच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी दोन समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक समिती एअर इंडियाची असेल तर दुसरी एअरपोर्ट्स ऑथॅरिटी ऑफ इंडिया. दरम्यान दुर्घटनेत अडकलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून बचावकार्य पूर्ण झाल्याचं हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं.
पायलटचा मृत्यू
माजी मंत्री अल्फान्सो के. जे. यांनी आपल्या ट्वीटमध्ये पायलटचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. दीपक साठे या विमानाचे पयलट होते. त्यांनी आधी एअर फोर्समध्येसुद्धा काम केलं होतं.
दीपक साठे बरेच अनुभवी पायलट होते, त्यांचं वय 58 होतं. त्यांना पेसिंडेंट गोल्ड मेडेलसुद्धा मिळलं होतं.
घटनास्थळाकडे किमान 24 रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या काही गाड्या तात्काळ रवाना झाल्याची माहिती आहे.
विमानाचे दोन तुकडे झाल्याचं समजतंय पण विमानाला आग लागलेली नाही. या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी या दुर्घटनेबद्दल बोलताना सांगितलं की, "करीपूर विमातळावर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि फायर ब्रिगेडला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांना बचावकार्य तसंच वैद्यकीय मदत देण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत."
एअर इंडियाने एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार विमानात 174 प्रवासी होते आणि 6 क्रू मेंबर्स होते, ज्यात दोन पायलट्सचाही समावेश होतो.
करीपूर विमानतळावर लँड करताना ही दुर्घटना घडली आहे. DGCA म्हणजेच नागरी उड्डाण संचलनालयाने या घटनेची पूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
DGCA ने दिलेल्या माहितीनुसार करीपूर विमानतळाच्या रनवेवर उतरताना हे विमान घसरलं आणि याचे दोन तुकडे झाले.
त्यावेळेस 2000 मीटरपर्यंत व्हीजिबलीटी होती असंही DGCA ने म्हटलं आहे.
विमान रनवेवर उतरल्यानंतर शेवटपर्यंत गेलं आणि त्यानंतर व्हॅलीतून खाली पडलं. त्यामुळे विमानाचे दोन तुकडे झाले.
दुबईतल्या भारतीय दुतावासाने हेल्पलाईन नंबर्स जारी केले आहेत. तसंच म्हटलं आहे की जसं जसं आम्हाला अधिक माहिती मिळेल तसं तसं आम्ही तुम्हाला कळवू.
हे हेल्पलाईन नंबर्स आहेत - 056 546 3903, 0543090572, 0543090572, 0543090575
"आपण हे लक्षात घ्यायला हवं की कोळीकोडची धावपट्टी ही विस्तीर्ण नाही. त्यामुळे घटनेची तीव्रता अधिक आहे. अनेक प्रवासी जखमी झाले आहेत आणि त्यापैकी काही बेशुद्ध आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारणाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे," असं एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी म्हटलं आहे.
नागरी उड्डाण मंत्रालायाने आपल्या पत्रकात म्हटलं की, "विमान धावपट्टीच्या पुढे गेलं आणि दरीत पडलं. विमानाला आग लागलेली नाही. विमानात 174 प्रवासी, 10 बाळं, 5 क्रू मेंबर्स आणि 2 पायलट होते."
अमिताभ कांत यांनी या दुर्घटनेविषयी व्टिटरवर लिहिलं, "एअर इंडियाच्या जेटला झालेल्या दुर्घटनेबद्दल ऐकून धक्का बसला आहे. मी कोळीकोडेला कलेक्टर होतो आणि मला माहितेय की हा विमानतळ कठीण ठिकाणी वसलेला आहे. हा विमानतळ टेकडीवर आहे आणि याचा रनवे 4500 ते 6000 फुट इतक्या भागात परसलेला आहे. या विमानतळावरून अनेक लोक आखाती देशांमध्ये प्रवास करत असतात. त्यांच्या सुरक्षितेसाठी मी प्रार्थना करतो."
केरळच्या दुर्घटनेमुळे आपण व्यथित झालो आहोत असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाला तात्काळ घटनास्थळी पोहचून राज्य सरकारला मदत करण्याचे आपण आदेश दिले आहेत असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
कोळीकोड येथे झालेल्या विमान दुर्घटनेमुळे मला धक्का बसला आहे. या अपघातात निधन झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी देखील सहभागी आहे. जखमीची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना करत आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"ही दुर्घटना झाल्याचं आम्हाला अतोनात दुःख आहे. या दुर्घटनेमुळे एअर इंडियाच्या नेटवर्कवर निश्चितच परिणाम होईल, पण वंदे भारत मिशन यापुढेही सुरू राहील," असं एअर इंडिया एक्सप्रेसने म्हटलं आहे.
केरळमधील कोळीकोड येथे झालेली विमान दुर्घटना दुःखद आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याशी मी संपर्क साधून स्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेले प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)