पेट्रोल दरवाढीने तरुणाई हैराण : 'आता आउटिंगला जाताना शंभर वेळा विचार करावा लागतो'

    • Author, प्रशांत ननावरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

पेट्रोल-डिझेलच्या किंमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. ज्याचा तरुणाईला सुद्धा फटका सहन करावा लागत आहे.

सतत सुरू असेलल्या इंधनदरवाढीमुळे सामान्यांचं बजेट पुरतं कोलमडलं आहेत. यामुळे जनमानसात सरकारविरोधात संताप उमटतोय. कमावत्यांना तर इंधनदरवाढीचा फटका बसलाच आहे. पण कधी पॉकेट मनीच्या तर कधी अनियमित इनकमच्या आधारावर असणाऱ्या तरुणाईच्या बजेटवरही किती परिणाम झाला आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केलाय.

20 वर्षांच्या केतकी कडुस्करने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "तीन वर्षांपूर्वी जेव्हा मी स्कूटर घेतली होती तेव्हा पेट्रोलची किंमत 69 रुपये प्रतिलीटर होती. पण गेले काही महिने या किमतीत दररोज वाढ होत आहे आणि त्यामुळे महिन्याचं बजेट पार कोलमडलंय."

"मी सोमय्या महाविद्यालयात शिकते. सोबतच भरतनाट्यमच्या क्लासमध्येही शिकवते. त्यासाठी मला मुलुंड, पवई, ऐरोलीला जावं लागतं. सार्वजनिक वाहतुकीपेक्षा स्कूटरने जाणं अधिक सोयीचं असल्याने त्याचा वापर करते," असं केतकी सांगते.

"आठवड्यातून एकदा स्कूटरची पेट्रोल टाकी फुल करते. त्यामुळे माझं महिन्याचं पेट्रोलचं बजेट 2000च्या आसपास आहे. पूर्वी मी पेट्रोलसाठी वेगळे पैसे ठेवत नव्हती. पण आता रोज वाढणाऱ्या किमतीमुळे तसं करावं लागतंय. गेल्या दोन महिन्यांपासून क्लासला जाताना माझी मैत्रीण आणि मी आळीपाळीने आपली बाईक काढायला सुरुवात केली आहे. शेअरींग केल्याने तेवढाच आपल्या पॉकेटवरचा भार हलका होतो," केतकी पुढे सांगते.

दरम्यान पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकी आधी 'बहुत हुई मेहंगाई की मार, अब की बार मोदी सरकार', असं म्हणत केलेल्या जाहिराती आता सत्ताधारी पक्षाच्याच विरोधात वापरल्या जात आहेत.

मोदी सरकारच्याच एका केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केलेलया #FitnessChallenge ला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी #FuelChallenge पंतप्रधान मोदींना सांगितलं आहे. बीबीसीच्या वाचकांनीही पंतप्रधानांना इंधनाचे दर कमी करण्याचं आव्हान दिलं आहे.

'बाईक घेऊन जाताना आधी शंभर वेळा विचार करावा लागतो'

मुंबईत एका नावाजलेल्या फूड डिलिव्हरी अॅप कंपनीत नितेश शेलटकर हा पंचवीस वर्षीय तरुण काम करतो. "फूड डिलिव्हरी करण्यासाठी आम्हाला बाईकच्या पेट्रोलसाठी वेगळे पैसे दिले जात नाहीत. ते आमच्या पगारातूनच खर्च करावे लागतात," असं त्याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

"या नोकरीच्या आधी मी एका ऑनलाइन कंपनीत वेगवेगळया वस्तू डिलिव्हरीचं काम करायचो. पण फिरतीचा खर्च परवड नसल्याने मी तो जॉब सोडला आणि आता तर दररोज पेट्रोलचे दर वाढत आहेत. सध्याच्या कंपनीत साधारण 4 ते 7 किलोमीटरच्या परिसरात आम्हाला फूड डिलिव्हरी करावी लागते. पण मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या आणि रस्त्यांच्या कामामुळे अनेकदा ट्रॅफिकमध्ये अडकून बसतो. तसंच काही रस्ते वन-वे झाल्यामुळे वळसा घालून जावं लागतं. या सगळ्यांत गाडी खूप पेट्रोल पिते," नितेश सांगतो.

"आमचं काम फिरतीचं असल्याने टाकी कायम फुल्ल ठेवावी लागते. मी दररोज 100 ते 150 रुपयांचं पेट्रोल भरतो. ते कामासाठीच खर्च होतं. त्यामुळे इतर वेळी बाईक घेऊन फिरायला जाताना आधी शंभर वेळा विचार करावा लागतो. नाहीतर महिन्याचं बजेट बारगळतं," असं नितेश दिवसाच्या पेट्रोल वापराबाबत सांगतात.

'पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे बाईकचा वापर कमी'

एका PR एजन्सीमध्ये काम करणारी मृणाल पाटील म्हणाली, "पूर्वी स्कूटरची टाकी 300 रुपयांमध्ये फुल्ल व्हायची, त्यासाठी आता 480 रुपये लागतात. पेट्रोलचा खर्च वाढल्याने आउटींगला जाताना बजेटचा दोनदा विचार करावा लागतो."

"दररोज वाढणाऱ्या किमतीमुळे मी ऑफिसला बाईक नेणं कमी केलं आहे. पण मग आई-बाबाच मुलीच्या काळजीने महिन्याच्या शेवटी पैसे देतात आणि सांगतात, 'स्कूटरच्या पेट्रोलची टाकी फुल्ल ठेवत जा. कुठे पेट्रोल संपलं आणि भरता नाही आलं तर काय करशील?'"

"पेट्रोलच्या वाढत्या दरापेक्षा त्यांना त्यांच्या मुलीची जास्त काळजी आहे," मृणाल हसून सांगते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)