You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तामिळनाडू : 'स्टरलाइट' विरोधातील आंदोलन पेटलं, 9 जणांचा मृत्यू
तामिळनाडूच्या विविध भागात स्टरलाइट लिमिटेड कंपनीविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात नऊ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. अनेकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
तामिळनाडूच्या तुतीकोरीन भागातल्या स्टरलाइट लिमिटेड कंपनीच्या विस्ताराला नागरिकांचा विरोध आहे. त्यांच्या विरोध आंदोलनाचा आज शंभरावा दिवस आहे.
आज निदर्शकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसच्या दिशेने मोर्चा काढला. सुरुवातीला पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात राखली पण निदर्शकांची संख्या वाढू लागताच पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. थोड्या वेळानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार करत निदर्शकांवर काबू ठेवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती बीबीसी तामिळ प्रतिनिधी प्रमिला कृष्णन यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
स्टील आणि खाण क्षेत्रातील 'वेदांता' ही अग्रगण्य कंपनी आहे. अनिल अगरवाल या कंपनीचे प्रमुख आहेत.
मूळच्या बिहारमधील पाटण्याचे असलेल्या अनिल यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडिलांसोबत काम करायला सुरुवात केली. ते पाटण्याहून मुंबईला आले आणि 'वेदांता' नावाची कंपनी स्थापन केली.
लंडन शेअर मार्केटमध्ये लिस्टेड वेदांत ही पहिली भारतीय कंपनी आहे.
स्टरलाइट ही 'वेदांता' कंपनीची उपकंपनी. गुजरातनजीकच्या सिल्व्हासा आणि तामिळनाडूतील तुतीकोरिन या दोन ठिकाणांहून या कंपनीचं कामकाज चालतं. तुतीकोरीन फॅक्टरीच्या माध्यमातून दर वर्षी चार लाख मेट्रिक टन तांब्याची निर्मिती केली जाते. कंपनीचा टर्नओव्हर 11.5 बिलिअन डॉलर्स एवढा आहे.
1992 मध्ये महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं (MIDC) या कंपनीला रत्नागिरी येथे 500 एकर जागा दिली. पण स्थानिकांनी विरोध केल्यानंतर राज्य सरकारने प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन समितीची स्थापना केली. समितीने दिलेल्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला कामकाज थांबवण्याचे आदेश दिले होते. यानंतर ही कंपनी तामिळनाडूला हलवण्यात आली.
"1994 मध्ये तामिळनाडू पोल्युशन कंट्रोल बोर्डाने (TNPCB) कंपनीला ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिलं. कंपनीच्या कामाचा पर्यावरणावर काय परिणाम होईल यासाठी चाचणी करण्याचं बोर्डानं सुचवलं. मन्नारच्या आखातापासून कंपनी 25 किलोमीटर अंतरावर असावी असं बोर्डाला वाटत होतं. त्यासाठी पर्यावरणावर परिणामांच्या चाचण्या हाती घेणं आवश्यक होतं. मात्र प्रत्यक्षात वेदांता कंपनी मन्नारच्या आखातापासून केवळ 14 किलोमीटर अंतरावर होती," असं पर्यावरण अभ्यासक नित्यानंद जयरामन यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)