You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा व्हीडिओ : 'लोकांनी मला भीक मागायचा सल्ला दिला, पण...'
- Author, रोहन टिल्लू
- Role, बीबीसी मराठी
"मुंबईतील कोणतीही शाळा मला वयाच्या 14व्या वर्षापर्यंत प्रवेश द्यायला तयार नव्हती. 'तुझे हात हे असे आहेत, तुझ्यामुळे इतर मुलांना भीती वाटेल, त्यांचं लक्ष लागणार नाही,' असं मला सांगितलं जात होतं. अनेकांनी तर मला मंदिराबाहेर किंवा मशिदीबाहेर बसून भीक मागायचा सल्ला दिला. पण मला तसं जगायचं नव्हतं," जन्मापासूनच दोन्ही हातांनी अपंग असलेले बंदेनवाझ सांगतात.
31 वर्षांचे बंदेनवाझ नदाफ आज एक प्रथितयश चित्रकार आहेत. आपल्या कलेच्या माध्यमातून दरमहा 25 ते 30 हजार रुपये कमावणाऱ्या बंदेनवाझ यांच्या चित्रांची प्रदर्शनं जहांगीर आर्ट गॅलरीतही झाली आहेत. आता ते Indian Mouth and Foot Painter's Association (IMFPA) चे कलाकार म्हणून काम करतात.
पण यशाची ही पायरी गाठण्यासाठी त्यांना आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागला. हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नक्कीच नव्हता.
बाळाला बघायला पाच पैशांचं तिकीट!
सोलापूर जिल्ह्यातल्या हत्तूर बस्ती नावाच्या छोट्याश्या गावात 1987मध्ये फेब्रुवारी महिन्यात बंदेनवाझ यांचा जन्म झाला. जन्मजात व्यंग असलेल्या या मुलाला पाहण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येऊ लागले.
"माझ्या आजीला ते खटकलं. लोकांची नजर लागेल, म्हणून ती काळजी करायची. शेवटी तिने मला बघायला पाच पैशांचं तिकीट लावलं. त्या काळात पाच पैसेही खूप जास्त होते. मग लोक मला बघायला यायचे बंद झाले," बंदेनवाझ आठवणीत रमतात.
बंदेनवाझ तीन महिन्यांचे झाल्यावर त्यांचे आईवडील त्यांना घेऊन मुंबईला आले.
मुंबईतही होलपटच
असं म्हणतात की, मुंबई सगळ्यांना संधी देते. पण बंदेनवाझ यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात मुंबईने त्यांना खूप क्रूरपणे वागवलं, असं ते सांगतात.
"मुंबईत आल्यानंतर काही वर्षांनी आईवडील मला वेगवेगळ्या शाळांमध्ये घेऊन जायला लागले. पण सगळ्याच शाळांनी मला प्रवेश नाकारला. त्यांचं म्हणणं होतं की, माझ्यामुळे इतरांना धक्का बसेल आणि त्यांचा अभ्यास होणार नाही," बंदेनवाझ सांगतात.
ते पुढे म्हणतात, "वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मी असाच भटकत होतो. शेवटी मग मला अपंगांसाठीच्या विशेष शाळेत प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. या शाळेत गेलो आणि माझं शिक्षण सुरू झालं."
सातवीपर्यंत बंदेनवाझ या शाळेत शिकले. त्यांना या शाळेत स्विमिंग, चित्रकला आदींची गोडी लागली. चित्रकलेच्या शिक्षिका वनिता जाधव यांच्यामुळे बंदेनवाझ यांना चित्रकलेतले बारकावे कळले, असं ते सांगतात.
हातांनी अपंग केलं, पायांनी जगायला शिकवलं
एक दिवस पायांनी चित्र काढणाऱ्या बंदेनवाझ यांना शाळेच्या ट्रस्टी आणि देणगीदार झरिन चौथिया यांनी बघितलं. बंदेनवाझ यांच्या पायांमधील कलेची जादू त्यांनी हेरली.
"झरिन मॅडमनीच मला भालचंद्र धनू या खासगी शिक्षकांकडे चित्रकलेतील प्राविण्य संपादन करण्यासाठी पाठवलं. माझ्या चित्रकलेच्या शिकवणीची फी त्यांनीच भरली. एवढंच नाही, तर त्यांच्या प्रयत्नांनीच माझ्या चित्रांची प्रदर्शनं जहांगीर आर्ट गॅलरीतही झाली," बंदेनवाझ कृतज्ञपणे सांगतात.
त्या वेळी मला पहिल्यांदा खूप समाधान वाटलं होतं. मीसुद्धा काहीतरी करू शकतो, माझ्या कुटुंबासाठी रोजगार मी कमावू शकतो, हा विश्वास मला मिळाला. मला माझ्या पायांनी आणि चित्रकलेने जगायला शिकवलं, हे सांगताना बंदेनवाझ यांच्या डोळ्यात पाणी येतं.
IMFPAमधले दिवस
लवकरच बंदेनवाझ यांना Indian Mouth and Foot Painter's Association या संस्थेबद्दल माहिती मिळाली. त्यांनी या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी अर्ज दाखल केला. निवड प्रक्रियेतून त्यांची निवड झाली.
"यापूर्वी मला वर्षभर चित्र काढावी लागत होती आणि तरच माझ्या चित्रांचं प्रदर्शन लागण्याची शक्यता होती. मग रोजगार कमावण्यासाठी मला मोबाइल रिपेअरिंगचं दुकान उघडावं लागलं. पण या संस्थेत प्रवेश मिळाल्यावर जगणं अधिक सोपं झालं," बंदेनवाझ सांगतात.
या संस्थेत प्रवेश मिळाल्यावर बंदेनवाझना दरमहा ठरावीक रक्कम मिळणं सुरू झालं. त्याच बरोबर त्यांची चित्रं परदेशातही विकण्यासाठी जाऊ लागली. आता वर्षातून पाच चांगली चित्रं काढली, तरीही त्यांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाते, असं बंदेनवाझ नमूद करतात.
काय आहे IMFPA?
Indian Mouth and Foot Painter's Association ही संस्था Mouth and Foot Painter's Association जागतिक संस्थेची भारतातील शाखा आहे. स्वित्झर्लंडमध्ये 1956मध्ये या संस्थेची स्थापना झाली.
"एरिक स्टाइगमन या जर्मन माणसाला पोलियो होता. त्यांनी आपल्या तोंडाने आणि पायाने चित्रं काढायला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रांना चांगलीच मागणी वाढू लागली. त्यातूनच त्यांनी त्यांच्यासारख्याच इतर अपंगांसाठीही या संस्थेची सुरुवात केली," या संस्थेच्या मार्केटिंग आणि डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख बॉबी थॉमस यांनी सांगितलं.
युरोपभरातल्या 18 कलाकारांसह स्थापन झालेल्या या संस्थेत सध्या जगभरातील 800हून अधिक कलाकार आहेत. या संस्थेची स्थापना भारतात 1980मध्ये झाली. सध्या भारतभरात तोंडाने किंवा पायाने चित्र काढणारे 24 कलाकार संस्थेशी जोडलेले आहेत.
कलाकारांची निवड कशी होते?
या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी कलाकारांना हातात काहीतरी व्यंग असणं आवश्यक आहे. तसंच त्यांनी चित्रकलेत काहीतरी प्रावीण्य मिळवणं आवश्यक आहे. त्यानंतरच कलाकारांना या संस्थेत प्रवेश दिला जातो.
"आम्हाला या चित्रकारांची चित्रं विकून त्यांच्यासाठी पैसे कमवायचे आहेत. ती चित्रं विकली जाण्यासाठी त्यांचा दर्जा चांगला असणं गरेजचं आहे. त्यामुळेच आम्ही पात्रतेचे निकष एवढे कठोर ठेवले आहेत," बॉबी थॉमस सांगतात.
कलाकारांना फायदा काय?
या कलाकारांचा संस्थेत प्रवेश झाला की, लगेचच त्यांना विद्यावेतन मिळायला सुरुवात होते. कलाकारांचा दर्जा लक्षात घेऊन हे विद्यावेतन 10 ते 30 हजार यांदरम्यान दिलं जातं. पहिल्या महिन्यापासूनच त्यांना विद्यावेतन दिलं जातं.
या कलाकारांना मग त्यांची चित्रं संस्थेला द्यावी लागतात. या चित्रांची ग्रिटिंग कार्ड्स किंवा इतर गोष्टी बनवून विकली जातात. त्यातून त्यांना पैसे देणं शक्य होतं. दरवर्षी त्यांच्या विद्यावेतनाच्या रकमेत वाढ केली जाते.
त्याचबरोबर या चित्रकारांना बोनसही मिळतो. त्यासाठी त्यांना वर्षभरातून पाच चित्रं संस्थेला द्यावी लागतात. या चित्रांपैकी उत्तम चित्रांची निवड संस्थेचे स्वित्झर्लंडमधील पदाधिकारी करतात आणि त्यापैकी काही चित्रांची निवड कॅलेंडरसाठी करतात. त्यावर कलाकारांना बोनस दिला जातो.
"आमचा सर्वांत ज्येष्ठ कलाकार दरमहा तब्बल एक लाख रुपये कमावतो. केरळमधला हा कलाकार त्याच्या कुटुंबीयांची काळजी तर घेतोच, त्याशिवाय त्याच्यासारख्या इतर कलाकारांनाही मदत करतो," बॉबी सांगतात.
"प्रत्येक कलाकाराला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र बनवणं, हे आमच्या संस्थेचं उद्दीष्ट आहे. त्यांना कोणाच्याही दयेवर जगावं लागू नये. लोकांनी त्यांच्याकडे विकलांग म्हणून न बघता त्यांनी एखाद्या धडधाकट माणसाप्रमाणेच आपलं आयुष्य जगायला हवं. त्यासाठी लागेल ती ऊर्जा आमची संस्था देते," बॉबी आपल्या संस्थेचा उद्देश उलगडून सांगतात.
हार मानू नका, लढत राहा
बंदेनवाझही त्यांच्या उदाहरणातून इतरांना हेच सांगतात. ते म्हणतात, "लोकांनी मला मंदिराबाहेर किंवा मशिदीबाहेर बसून भीक मागण्याचा सल्ला दिला होता. पण मला तसं आयुष्य जगायचं नव्हतं. चित्रकलेची गोडी लागली, IMFPA सारख्या संस्थेचं पाठबळ मिळालं आणि मी उभा राहिलो."
ते अशीही पुष्टी जोडतात की, मी दोन्ही हातांनी अपंग असून माझं भविष्य माझ्या पायांनी लिहू शकतो, तर मग इतरांनी हार मानण्याचं कारणच काय? मी माझ्या मुलाची आणि बायकोची काळजी अगदी समर्थपणे घेतो.
बंदेनवाझ सांगतात, "मी चित्रं काढण्याबरोबरच उत्तम पोहतो, गाडी चालवतो, मोबाइल रिपेअर करत होतो. तुमची तयारी असेल, तर कोणतीही गोष्ट तुम्हाला यशस्वी होण्यापासून अडवू शकत नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)