'वृद्ध आईवडिलांना त्रास देणाऱ्या मुलांना शिक्षा असावी. पण...'

'पालक आणि ज्येष्ठ नागरिक कल्याण कायद्यात' बदल करून वृद्ध आईवडिलांना त्रास देणाऱ्या किंवा त्यांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना कठोर शिक्षा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.

तसंच, वृध्द आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते. याबाबतच वाचकांना काय वाटतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला.

यावर बऱ्याच जणांनी हा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आहे.

रोहित ओव्हळ यांनी निर्णय योग्य असल्याचं सांगत, निवृत्तीनंतरचं नियोजन आधीच करायला पाहिजे म्हणजे कुणावरही अवलंबून राहावं लागणार नाही, अशी भूमिका मांडली आहे.

'कसं झालंय ना... आज काल मृत्यूदंडाची मागणी करणं एकदम फॉर्मात आहे. कोणत्याही गोष्टीसाठी मृत्यूदंड दिला जाऊ लागला तर 'असा कसा दिला' यावरूनही आंदोलनं होतील,' असं मत सुर्वणा दामले यांनी व्यक्त केलं आहे. तसंच, फक्त पैसे पुरवणं म्हणजे काळजी घेणं होतं का हा प्रश्न आपण आपल्याला विचारण्याचा आहे, असं त्यांनी पुढे म्हटलं आहे.

तर प्रवीण वाडलेकर म्हणतात, "आई-वडिलांना सोडणाऱ्या मुलांकडून दर महिन्याला लागणारा खर्च वसूल करून पीडित आईवडिलांना तत्काळ मदत मिळावी असा कायदा करणं आवश्यक आहे.

केदार अनमोले लिहितात, "वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या शिक्षा असावी, पण त्यांना न सांभाळण्याची सक्ती केल्यास ते कितपत ती जबाबदारी पार पाडतील यात शंकाच आहे."

आत्मीयता ही कायद्यानं प्रस्थापित करता येत नाही. त्याला आईवडिलांबद्दल प्रेम असावं लागत. आज ही आईवडिलांची सेवा करणारे आहेत पण संख्या कमी आहे. हिंदू कायद्या अंतर्गत नांदायला घेऊन जाण्याचा दावा मंजूर झाला तरी कोर्ट पत्नीला जबरदस्तीनं पतीच्या घरी पाठवू शकत नाही. परंतु कायद्यामुळे वचक निर्माण होण्यास मदत होईल एवढे निश्चित, अशी प्रतिक्रिया दादाराव तायडे यांनी दिली आहे.

गजानन पाचंकर यांनी फक्त 6 महिने नाही तर आयुष्य बरबाद झालं पाहिजे, असं म्हटलं आहे. ज्यांनी जग दाखवलं त्यांनाच त्रास देताय म्हटल्यावर अशा लोकांचा जगून तरी उपयोग काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तर अनेकांनी हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे.

मयूर एम. नंदेश्वर यांनीही सहा महिन्यापेक्षा जास्त शिक्षा झाली पाहिजे असं म्हटलं आहे. तर अशा मुलांना 6 महिनेच नाही, आशा मुलांना जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी, असं मत अनिल रावसाहेब आनंदकर यांनी म्हटलं आहे. मयूर आणि अनिल यांच्यासारखचं मत तुषार कचारे, श्रीकांत आंबेकर आणि सतीश दिवटे यांचंही आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)