You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिमांशू रॉय कॅन्सरमुळे 'खचले होते, शॉकमध्ये गेले होते'
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"काल सकाळी हिमांशू रॉय आणि माझी जिममध्ये भेट झाली होती. त्यावेळी कॅन्सरबाबत त्यांच्याशी चर्चा झाली. 'केमोथेरपीला सुद्धा काही मर्यादा असतात' असं ते म्हणाले." माजी गृहमंत्री जयंत पाटील म्हणतात की काल झालेली भेट अखेरची ठरेल असं त्यांना वाटलं नव्हतं.
"ते (हिमांशू रॉय) थोडेसे दुःखी वाटत होते. उपचारांमुळे किती वेदना होतात, हे ते सांगत होते. त्यांचा चेहरा काळवंडला होता. डॉक्टर म्हणतात प्रोग्रेस चांगली आहे, पण ते गॅरेंटी देत नाहीत असंही ते सांगत होते."
"पण ते असं काही पाऊल उचलतील असं मात्र मला वाटलं नाही. सात आठ महिन्यांपूर्वी जेव्हा बोललो होतो, तेव्हा ते पॉझिटिव्ह होते. आजाराशी लढा देईन असं ते बोलले होते." हिमांशू रॉय यांनी केलेल्या आत्महत्येनंतर जयंत पाटील यांनी बीबीसी मराठीला दिलेली ही पहिली प्रतिक्रिया.
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (आस्थापना) आणि माजी ATS प्रमुख हिमांशू रॉय यांनी आपल्या राहत्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केल्याच्या बातम्या झळकल्या आणि सर्वांनाच धक्का बसला.
रॉय हाडांच्या कॅन्सरने ग्रस्त होते. गोळी झाडल्यानंतर त्यांना तातडीने बाँबे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. पण तोवर उशीर झाला होता. मुंबई पोलिसांनी म्हटलंय -
'आज दि. 11/05/2018 रोजी 13.00 वाजताचे दरम्यान श्री. हिमांशू रॉय (अतिरिक्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य) वय 54 वर्षे रा.ठी. सुनीती अपार्टमेंट, नरिमन पॉईंट, मुंबई यांनी त्यांचे राहते घरी रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या जबड्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली, त्यांना बाँबे हॉस्पिटल येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी 13.47 वा. दाखलपूर्व मयत घोषित केले. अधिक तपास चालू आहे.'
रॉय यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटलंय की आजारपणामुळे झालेल्या त्रासाला वैतागून त्यांनी हा निर्णय घेतला.
रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ATS प्रमुख म्हणून त्यांनी अनेक मोठी प्रकरणं हाताळली. त्यात जे डे हत्याप्रकरण, आयपीएल सट्टेबाजी अशा प्रकरणांचा समावेश होता.
'कॅन्सरनंतर शॉकमध्ये गेले'
माजी पोलीस महासंचालक पी. एस. पसरिचा सांगतात, "ते पोलीस सेवेत आले नव्हते तेव्हापासून मी त्यांना ओळख होतो, मी मुंबईचा वाहतूक पोलीस प्रमुख होतो तेव्हा ते मला भेटायला यायचे. चांगलं काम केलं. शांत आणि चांगला स्वभाव होता. संयमी राहून काम करण्याचं कसब त्यांच्याकडे होतं.
"कॅन्सर झाल्यानंतर ते शॉकमध्ये होते. त्यांना दुःखं होतं. गेल्या महिन्यात जेव्हा बोलणं झालं तेव्हा खूप वेदना होत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पोलीस खात्यात खूप त्रास सहन केला आहे, तर या वेदनासुद्धा सहन करेल असं ते बोलले होते.
"ते आयपीएस म्हणून जेव्हा सिलेक्ट झाले तेव्हा ते माझ्यासाठी शर्ट आणि नेकटाय घेऊन आले होते. त्यांच्या होणाऱ्या पत्नीबरोबर ते आले होते. तो क्षण आजही माझ्या लक्षात आहे. मसुरीला ट्रेनिंगला जाण्याआधी ते मला भेटायला आले होते."
'हिमांशू खचला होता'
माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांना ही बातमी आल्यावर धक्का बसला. ते म्हणतात, " एक चांगला ऑफिसर पोलीस दलानं गमावला आहे. आजारपणामुळे तो कोणाच्याही संपर्कात नव्हते. सायबर सेलची आम्ही मुंबईत स्थापना केली, त्यात तो माझ्या सोबतच होता. पूर्णपणे मुंबईकर असलेल्या हिमांशूनं मुंबई पोलीसात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. नाशिकमध्येही त्यानं काम केलं. वैद्यकीय कारणांमुळेच तो खचला होता आणि त्यातून हे पाऊल उचललं असावं."
एवढ्या कठीण गोष्टी हाताळणारा अधिकारी कॅन्सरने खचतो, या गोष्टीवरही अनेकांनी धक्का व्यक्त केला. याविषयी आम्ही मुंबईतल्या कामा हॉस्पिटलचे कॅन्सर विभाग प्रमुख डॉ दिलिप निकम यांच्याशी बोललो.
"एवढा मेंटली स्ट्राँग माणूस असं करतो तेव्हा एक कॅन्सर तज्ज्ञ म्हणून मलाही प्रश्न पडला आहे. पेशंटला समजून घेतांना आम्ही कॅन्सर तज्ज्ञ कमी पडत आहोत का? बोन कॅन्सरमध्ये वेदना खूप होतात, तसंच ट्रीटमेंटमुळे सुद्धा त्रास होतो.
"पण आम्ही डॉक्टर म्हणून विचार करताना वेदना कमी होणार असतील आणि शरीराला कमी त्रास होणार असेल तरंच ट्रीटमेंट करतो. नाही तर कधीकधी ट्रीटमेंट न देणं सुद्धा एक प्रकारची ट्रीटमेंट असते.
"अशावेळी पेशंटला मानसिक आधार देणं सर्वांत मोठं काम असतं. त्यांना समजावून सांगावं लागतं. कॅन्सरसाठी समुपदेशन आणि मनोविकार तज्ज्ञांची मदत तितकीच महत्त्वाची आहे जेवढी केमोथेरपी आणि इतर उपचार."
'आता पत्रकारांना भेटणे नाही'
"त्यांना कॅन्सर झाल्याचं कळल्यानंतर त्यांनी ATSमधून हाउसिंगला बदली घेतली. त्यानंतर काही पत्रकारांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. पण ते कुठल्याही पत्रकाराला भेटले नाहीत. आता पत्रकारांना भेटायचं नाही असं मेसेज करून त्यांनी काही क्राईम रिपोर्टर्सना कळवलं होतं," असं पत्रकार मयांक भागवत सांगतात.
"सर्व क्राईम रिपोर्टर त्यांना त्यांच्या फिटनेसविषयी विचारायचे. आम्ही कायम यांना भेटल्यावर त्यांना त्यांच्या दिनचर्येबाबत विचायराचो. सकाळ असो किंवा संध्याकाळ त्यांचा चेहऱ्यावर कायम तेज असायचं, त्यांचा उत्साह कायम असायचा. फिटनेसमुळेच मी एवढं काम करु शकतो असं ते सांगत होते.
"बातम्यांच्याबाबत गुप्तता बाळगण्यात त्यांचा हातखंडा होता. कुठल्याही प्रेस कॉन्फरन्सआधी मोठी बातमी बाहेर येणार नाही याची कायम त्यांनी काळजी घेतली. मीडिया ते उत्तम हाताळायचे," असंही मयांक सांगतात.
बीबीसी प्रतिनिधी जुगल पुरोहित यांनी हिमांशू रॉय यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते सांगतात, "जे डे हत्याप्रकरण आणि CST समोर झालेली एक मोठी दंगल या प्रकरणांत माझा त्यांच्याशी अनेकदा संपर्क आला. ते अतिशय नम्र अधिकारी होते. एखादा खटला प्रसारमाध्यमांना नीट समजावून सांगण्याची त्यांना हातोटी होती. प्रसारमाध्यमांसाठी ते कायम उपलब्ध असायचे. ATS प्रमुख आणि सहपोलीस आयुक्त (गुन्हे) म्हणून काम करताना ते अधिक प्रकाशझोतात आले."
जुगल पुढे सांगतात, "रॉय हे आपल्या कामाशी अत्यंत प्रामाणिक होते. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदावरून मुंबईत त्यांची बदली झाली. तेव्हा अनेक जण त्यांना ओळखतसुद्धा नव्हते. त्यांच्या कामामुळे ते भविष्यात मुंबई पोलीस आयुक्त झाले असते असं अनेकांना वाटत होतं. पण दुर्दैवाने आता ते शक्य नाही."
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनीही रॉय यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, हिमांशू रॉय यांच्या जाण्यानं एक कर्तबगार अधिकारी गमावल्याचं म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, रॉय यांच्या अकाली 'एक्झिट'नं माझी मोठी वैयक्तिक हानी झाली, असं म्हटलं आहे.
(रविंद्र मांजरेकर आणि रोहन नामजोशी यांच्या माहितीसह)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)