You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मी खूश आहे' म्हणत 104 वर्षांच्या वैज्ञानिकानं इच्छामरण पत्करलं
वैज्ञानिक डेव्हिड गुडऑल यांचं स्वित्झर्लंडमधल्या एका हॉस्पिटलमध्ये निधन झालं आहे. त्यांनी इच्छामरण पत्करल्याचं मरणाच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेने सांगितलं आहे.
गुडऑल 104 वर्षांचे होते.
पर्यावरणशास्त्राचे प्रख्यात वैज्ञानिक राहिलेले डेव्हिड यांचा जन्म लंडनमध्ये झाला होता.
आपली जीवनयात्रा संपुष्टात आणण्यासाठी जगातल्या दुसऱ्या एका भागात प्रवास करण्याचा डेव्हिड यांनी निश्चय केला होता. त्यासाठी 3 मेला त्यांनी ऑस्ट्रेलियातल्या आपल्या राहत्या घरातून निरोप घेतला होता.
त्यांच्या या निर्णयामुळे जगभरातल्या लोकांचं लक्ष त्यांच्याकडे आकर्षित झालं होतं.
त्यांना कुठलाही दुर्धर आजार नव्हता, पण आपल्या जीवनाचा सन्मानजनक शेवट व्हावा, असं त्यांना वाटत होतं.
"माझं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटत आहे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला," असं ते म्हटले होते. मृत्यूच्या काही क्षणांपूर्णी, "मी माझ्या जीवनाचा शेवट करत आहे आणि मी खूश आहे," असं त्यांनी म्हटलं होतं.
"गेल्या एका वर्षापासून माझ्या जीवनातला आनंद बराच कमी झाला आहे आणि मी माझ्या जीवनाचा शेवट करून खूश आहे," असं नातेवाईकांच्या गराड्यात असलेल्या डेव्हिड यांनी म्हटलं होतं.
"माझ्या मृत्यूला जी काही प्रसिद्धी मिळत आहे त्यामुळे वयोवृद्धांच्या इच्छामरणाच्या मागणीला बळ मिळेल, असं मला वाटतं. आणि माझीची अशीच इच्छा आहे," असं ते पुढे म्हणाले.
एक्झिट इंटरनॅशनल नावाच्या एका संस्थेने गुडऑल यांना त्यांच्या इच्छामरणात मदत केली. या संस्थेचे संस्थापक फिलीप नित्जे यांनी सांगितलं की, "बाझल इथल्या लाईफ सायकल क्लिनिकमध्ये डेव्हिड यांचं शांततेत निधन झालं."
मरणाच्या काही दिवसांपूर्वी डेव्हिड कागदपत्रांच्या कारवाईत गुंतले होते. "यात जरा जास्तच वेळ लागत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं," नित्जे सांगतात.
डेव्हिड यांच्या अंतिम जेवणात फिश आणि चिप्ससोबत चीजकेक यांचा समावेश होता. त्यानंतर त्यांनी बीथोवन यांचं 'ओड टू जॉय' हे संगीत ऐकलं.
सक्रिय जीवन
लंडनमध्ये जन्मास आलेले डेव्हिड मागील काही आठवड्यांपर्यंत ऑस्ट्रेलियातल्या पर्थ शहरात एकटे राहत होते. 1979साली त्यांनी नोकरी सोडली. पण त्यानंतर ते सतत काही न काही कामासाठी फिरत होते. नुकतंच त्यांनी 'इकॉलॉजी ऑफ द वर्ल्ड' नावाच्या 30 खंडांच्या बुक सीरिजचं संपादन केलं होतं.
वयाच्या 102व्या वर्षी त्यांनी पर्थच्या एडविन कोवान विश्वविद्यालयातल्या परिसरात काम करण्याशी संबंधित कायद्याची लढाई जिंकली होती. इथे ते रिसर्च असोसिएट म्हणून काम करत होते. मात्र यासाठी त्यांना वेतन वैगेरे मिळत नव्हतं.
जीवनाचा शेवट
गेल्या महिन्यात घडलेल्या एका घटनेमुळे डेव्हिड यांनी जीवनाचा शेवट करण्याचा निर्णय घेतला. एका दिवशी ते राहत्या घरात पडले आणि दोन दिवस त्याचा कुणालाही पत्ता लागला नाही. त्यानंतर त्यांना 24 तास उपचाराची आवश्यकता असल्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं.
एक्झिट इंटरनॅशनल संस्थेशी संबंधित कॅरल ओ-नील सांगतात, "डेव्हिड स्वतंत्र बाण्याचे व्यक्ती होते. प्रत्येक वेळी आपल्या आसपास कुणीतरी असावं, असं त्यांना वाटत नव्हतं. तसंच कुणी अनोळखी व्यक्तीनं काळजी घ्यावी, असंही त्यांना वाटत नव्हतं."
स्वित्झर्लंडची निवड का?
1942सालापासून स्वित्झर्लंडमध्ये 'असिस्टेड डेथ'ला मान्यता आहे. इतरही काही देशांनी इच्छामरणाला परवानगी देणारे कायदे बनवले आहेत. पण त्यासाठी व्यक्तीला गंभीर आजार असावा, अशी अट घालण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियन मेडिकल असोसिएशनचा 'असिस्टेड डाइंग'ला प्रखर विरोध आहे आणि हा प्रकार अनैतिक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मायकल गेनन सांगतात, "लोकांचा जीव कसा घ्यायचा हे डॉक्टरांना शिकवलं जात नाही. असं करणं चुकीचं आहे. हा विचार आमची ट्रेनिंग आणि नैतिकतेशी गंभीरपणे जोडलेला आहे."
हेही पाहा-
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)