कठुआ बलात्कार : सैन्याला मदत करणाऱ्या बकरवालांबद्दल हे माहीत आहे?

बकरवाल

फोटो स्रोत, Mohit kandhari

    • Author, मोहित कंधारी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, जम्मूहून

कठुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. ती ज्या मुस्लीम बकरवाल या समुदायातली होती तो समाज अत्यंत मागास असून अजूनही पारंपरिक पद्धतीनं जीवन जगणारा आहे. यातील अनेकांची स्वतःची घरंसुद्धा नाहीत.

कठुआमध्ये बकरवाल समुदायातील आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि त्यानंतर तिची हत्या झाल्यानंतर जम्मू काश्मीरच्या मैदानी भागात राहणारे बकरवाल समुदायातील लोक भयग्रस्त आहेत, तसेच या भागात आपण सुरक्षित नाही अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे, असं सांगितलं जातं आहे.

तणावग्रस्त स्थिती आणि तापमानात वाढ झाल्यामुळं यावर्षी त्यांनी नियोजित वेळेआधीच जम्मू सोडून थंड भागात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांच्या जवळ असलेल्या मेंढ्या आणि बकऱ्यांसाठी पाणी मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळंही ते लवकर आपलं स्थान सोडून जात आहेत.

पीडितेच्या कुटुंबीयांनी रसाना गावातील आपल्या घराला कुलूप ठोकलं आहे आणि ते आपल्या मेंढ्या घेऊन बाहेर पडले आहेत. त्यांच्या बरोबरच बकरवाल समाजातील इतर अनेक कुटुंबांनी जम्मूतील मैदानी भाग सोडून काश्मीरमध्ये आश्रय घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बकरवाल समाज

फोटो स्रोत, MOhit kandhari

उन्हाळ्यात हा समुदाय बर्फाळ प्रदेशात राहतो आणि नोव्हेंबर महिन्यात हे लोक मैदानी भागात राहतात. जेव्हा बर्फवृष्टी सुरू होते तेव्हा ते आपला मुक्काम हलवतात.

जम्मू-श्रीनगर महामार्गावर हे लोक आपल्या गुरांसोबत चालताना नेहमी दिसतात. काही लोक रस्त्याने न चालता जंगलातूनच प्रवास करतात.

जिथं सुरक्षित वाटेल त्या ठिकाणी ते थांबतात आणि आपल्या जनावरांना पाणी पाजून ते पुढचा प्रवास करतात. त्यांचं जीवनचक्र असंच चालू राहतं.

तत्त्वतः गुर्जर समाजातील एका मोठ्या समुदायाला बकरवाल म्हटलं जातं. काश्मिरी विद्वानांनी गुर्जर समाजातील लोकांना बकरवाल नाव दिलं आहे.

बकरवाल समाज

फोटो स्रोत, Mohit kandhari

बकरवाल लोकांचा प्रमुख व्यवसाय मेंढ्या किंवा बकऱ्यांचं पालन करणं हा आहे. असे अनेक नेते आहेत जे या समुदायातील आहेत पण ते स्वतःची ओळख गुर्जर अशीच सांगतात.

त्यांच्यातील शिकलेल्या सवरलेल्या लोकांना वाटतं की आपल्या समाजातील लोकांनी देखील शिकावं आणि जगाच्या बरोबरीने चालावं.

पण स्वातंत्र्यानंतरही अजून या लोकांच्या जीवनशैलीत काही बदल घडला नसून अद्यापही ते परंपरागत पद्धतीनं आपलं आयुष्य जगत आहेत.

गुर्जर आणि बकरवाल समाजाची वर्गवारी तीन गटांमध्ये होते असं बकरवाल समाजावर संशोधन करणारे अभ्यासक जावेद राही सांगतात. ट्रायबल रिसर्च अॅंड कल्चरल फाउंडेशन या संस्थेमध्ये ते सचिव म्हणून काम देखील पाहतात.

बकरवाल समाज

फोटो स्रोत, MOhit kandhari

त्यांचे मते, काही गुर्जर आणि बकरवाल हे पूर्णतः भटके (Fully Nomadic) आहेत. हे लोक फक्त जंगलात राहतात आणि त्यांना घर नसतं.

दुसरा गट अंशतः भटक्या (semi nomad) समाजाचा आहे. त्यांच्याकडे राहायला जागा असते पण ते आजूबाजूच्या जंगलात काही काळासाठी जातात आणि परत आपल्या मुक्कामी येतात.

तिसरा गट आश्रय घेऊन राहणाऱ्या बकरवालांचा आहे. त्यांच्याकडे डोंगराळ आणि मैदानी भागात मुक्काम करण्याची जागा असते त्यांना मायग्रेटरी नोमाड म्हणतात असं राही यांनी सांगितलं.

गुर्जर आणि बकरवाल हे लोक देशातील 12 राज्यांमध्ये आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये हा समाज विखुरला आहे.

या लोकांचं राहणीमान, पोशाख आणि आहार या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनशैलीचा भाग आहे आणि कित्येक वर्षांपासून त्यामध्ये बदल झाला नाही. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर त्यांना 1991मध्ये आदिवासी म्हणून मान्यता मिळाली आहे.

बकरवाल समाज

फोटो स्रोत, MOhit kandhari

2011च्या जनगणनेनुसार काश्मीरमध्ये गुर्जर बकरवाल लोकांची लोकसंख्या 12 लाख म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या 11 टक्के आहे.

त्यांची लोकसंख्या नेमकी किती आहे हे सांगणं कठीण काम आहे कारण जेव्हा जनगणना सुरू असते तेव्हा बकरवाल लोक फिरतीवर असतात.

सरकारी सोयी सुविधांपासून वंचित

आपल्या मेंढ्या आणि बकऱ्यांची सुरक्षा करण्यासाठी हे लोक कुत्री पाळतात. मेंढ्यांची लोकर आणि मांस विकून ते आपला उदरनिर्वाह करतात. ईद किंवा इतर सणांना लागणारं मांस हे बकरवालचं पुरवतात. राही सांगतात, हा समाज अजूनही बार्टर सिस्टम म्हणजे वस्तूंच्या मोबदल्यात वस्तू देऊन व्यवहार करतो.

या लोकांची अद्याप बॅंकांमध्ये खाती नाहीत. त्या लोकांनी सरकारकडे लक्ष वेधलं होतं पण अद्याप त्यांच्यातील कित्येक जणांकडं बॅंकांची खाती नाहीत.

बकरवाल समाज

फोटो स्रोत, MOhit kandhari

जर सरकारला यांची मदत करावी वाटत असेल तर सरकारनं त्यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रक्रियेत बदल केला पाहिजे.

मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था नाही

समाजातील मुलांना शिक्षण मिळत नाही, अशी खंत बकरवाल समुदायातील बशारत हुसैन यांनी व्यक्त केली. हुसैन त्यांच्या तांड्यासोबत चंदवारी इथं जात असताना बीबीसीनं त्यांच्याशी संवाद साधला.

ते सांगतात, सरकारनं फिरत्या शाळांची व्यवस्था केली आहे पण मुलांना त्याला लाभ होत नाही. आमच्या फिरस्तीमुळं मुलांना अभ्यास करता येत नाही. आम्ही दोन तीन महिने एका ठिकाणी असतो मग आमचा मुक्काम परत बदलतो, अशा परिस्थिती मुलं अभ्यास कशी करतील?

सरकारच्या फिरत्या शाळांमध्ये कोणत्याच सुविधा उपलब्ध नसतात. मुलांना दुपारचं जेवण मिळत नाही, वह्या पुस्तकं मिळत नाही. आमच्या समाजातील तरुण अशिक्षित असतात, ते येणाऱ्या पिढीला काय शिकवतील, असा प्रश्न हुसैन विचारतात.

मुलींच्या आणि महिलांच्या आरोग्याचे प्रश्न

समुदायातील मुलींना किंवा महिलांना आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही सुविधा नसतात. लोक घरातील सदस्यांना आणि जनावरांनाही कसलीच लस देत नाहीत. कारण त्यासाठी त्यांना सरकारी दवाखान्यात जावं लागतं पण आपला तांडा सोडून जाता येत नसल्यामुळं आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, असं राही सांगतात.

बकरवाल

फोटो स्रोत, MOhit kandhari

जंगलात फिरल्यामुळं आणि ताज्या हवेमुळं त्यांना छोटे मोठे आजार होत नाहीत असं ते सांगतात. जंगलात मिळणारी औषधी वनस्पती वापरून ते आजारांवर उपचार करतात.

अॅट्रॉसिटी कायदा लागू नाही

जे कायदे भारतात लागू आहेत त्यांपैकी बरेच कायदे जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू झालेले नाहीत. जसं की वन अधिकार कायदा या ठिकाणी लागू झालेला नाही. तसेच राज्यात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी) लागू करण्यात आला नाही. बकरवाल समाजाला जर आरक्षण मिळालं तर त्यांच्या स्थितीत सुधारणा होऊ शकते, असं राही सांगतात.

लष्कराला सहकार्य

देशाच्या सीमेवर राहणाऱ्या किंवा फिरणाऱ्या बकरवाल समुदायाने भारतीय लष्कराला नेहमी सहकार्य केलं आहे. लष्कराच्या चौकींवर रसद पुरवण्याचं काम ते करतात. त्यांचा कुठलाही त्रास नसतो असं लष्करातील अधिकारी म्हणतात. सध्या या समाजातील काही लोक पोलीस, सरकारी विभागामध्ये काम करताना देखील दिसतात. हा समुदाय शांत असून सामाजिक सलोखा अबाधित राहावा म्हणून त्यांनी आपलं योगदान दिलं आहे, असं राही सांगतात.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)