'पोळी 20 सेमीपेक्षा मोठी किंवा लहान असली तर मला शिक्षा मिळायची'

घरगुती हिंसाचार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ब्रजेश मिश्रा
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

पुण्यातील एका महिलेनं पतीविरोधात शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप लावत न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दिला आहे. महिलेनं आरोप केलेत की, 'मी केलेल्या पोळ्या नवरा फुटपट्टीने मोजत असे आणि पोळीचा आकार कमी जास्त झाल्यास मला शिक्षाही मिळत होती. इतकंच काय दररोज एक्सेल शीटमध्ये सगळ्या कामांची नोंद करावी लागत होती.'

पतीनं मात्र या सगळ्या आरोपांचा इन्कार केला आहे.

बीबीसीशी बोलताना पायल (नाव बदललं आहे) यांनी पती अमित (नाव बदललं आहे) यांच्यावर मारहाण करण्याचा आरोप केला.

त्या म्हणाल्या, "जेवताना तो फुटपट्टी घेऊन बसायचा. पोळी 20 सेंटिमीटरपेक्षा थोडी जरी मोठी किंवा लहान असली तर मला शिक्षा मिळत होती."

एक्सेल शीटमध्ये त्यांना दररोज कोणतं काम झालं, कोणतं झालं नाही, कोणतं प्रगतीपथावर आहे या साऱ्याची माहिती भरावी लागत होती, असं त्या म्हणाल्या. काम पूर्ण झालं नाही तर त्याचं कारणही लिहावं लागत होतं. त्यासाठी एक स्वतंत्र कॉलम तयार करण्यात आला होता. चर्चा करायची असेल तर इ-मेल करून वेळ घ्यावा लागत होता.

लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच त्रास

पायल आणि अमित यांचं लग्न जानेवारी 2008मध्ये झालं होतं. त्यांना एक मुलगी आहे. पायल यांनी घरगुती हिंसाचाराचं कारण देत घटस्फोट मागितला आहे.

पायल म्हणाल्या, "लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून पुढची दहा वर्षं तो माझ्याशी वाईट वागला. हे सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर मी वेगळं व्हायचा निर्णय घेतला."

त्या म्हणतात, "लग्नानंतर तो म्हणायचा तू तुझ्या घरात राहा मी माझ्या घरात राहीन. जेव्हा भेटायचं असेल तेव्हा येत जा. तो कधी कधी रात्री भेटायला बोलवत होता बस. कारण आम्ही एकाच शहरात राहात होतो. तो सांगायचा की काही काळानं त्याला परदेशात जायचं आहे. त्यामुळे त्याला माझ्याबरोबर राहणं परवडत नाही."

घरगुती हिंसाचार

फोटो स्रोत, Science Photo Library

पायल यांनी एका घटनेचा उल्लेख करत माहिती दिली, "एका दिवशी रागात त्यानं त्याचा डंबेल कॉम्प्युटरवर आदळला. त्याचे तुकडे झाले. मला इतकं जोरात मारलं की मी बेशुद्ध पडले. त्यानं मला उचलून बाथरूममध्ये नेलं आणि नळाखाली बसवलं. मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा आणखी मारहाण सुरू केली. माझ्याकडे कपडे पण नव्हते. त्यानं मला त्याच अवस्थेत घराबाहेर काढलं. मी ओल्या कपड्यांनिशी घरी आली. त्यापूर्वी माझ्या आईवडिलांना थोडाफार संशय होताच. त्यादिवशी त्यांना सत्य कळलं."

सोशल मीडियावर पोस्ट

पायल म्हणाल्या,"दरवेळेस सूड उगवण्याच्या नवनवीन पद्धती शोधून काढायचा. त्यानं माझं ऑरकुट अकाउंट हॅक केलं आणि त्यावर अश्लील पोस्ट टाकल्या. मी वाईट महिला आहे. नवऱ्याला त्रास देत असते, असं काहीही. मला याची काहीच कल्पना नव्हती. माझ्या मैत्रिणींनी आईला फोन करून याची माहिती दिल्यावर मला कळलं."

सोशल मीडिया

फोटो स्रोत, Getty Images

माझ्या नवऱ्यानं माझ्या फेसबुक अकाऊंटवरून दुसऱ्यांना मेसेज केले आणि माझ्या चारित्र्याविषयी प्रश्न उपस्थित केले. माझ्याकडे माझ्या सोशल अकाऊंटचे पासवर्ड कधीच नव्हते.

पैसे कमावण्याचा दबाव

अमितने पैसे कमवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही पायल करतात. त्या म्हणतात, "मला प्लेसमेंट मिळाली होती. पण मंदीच्या कारणांमुळे कंपनीने कुणालाच कामावर रूजू करुन घेतलं नव्हतं. मोठ्या मुश्किलीने मी दहा हजार रुपयांची नोकरी शोधली. काही दिवसांनी त्याने मला नोकरी मिळवून दिली. मला दुसऱ्यांच्या घरी फेशियल करण्यासाठी जावं लागायचं. मी कॉम्प्युटर सायन्समध्ये एमएस्सी एवढ्यासाठीच केलं होतं का?"

पायल सांगतात, "जानेवारी 2009मध्ये मला नोकरी लागली. पण त्यावेळीही मंदी सुरू असल्याने अमितची नोकरी गेली. तो दिवसभर घरीच बसून असायचा आणि मी दिवसभर ऑफिसमध्ये. यावरून आमच्यात आणखी भांडणं वाढली. तो मला माझ्या घरच्यांशी बोलू देत नव्हता. एप्रिलमध्ये त्याला दुसरी नोकरी मिळाल्यानं तो दिल्लीला निघून गेला. मी पुण्यातच राहिले."

पायल सांगतात की, "एप्रिल 2010मध्ये अमितनं त्यांना दिल्लीला बोलवून घेतलं पण काही अटींवर. ऑगस्ट 2010मध्ये पुन्हा त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली. त्याआधी त्यानं मला बळजबरीनं अॅबॉर्शन करायला लावलं."

पायल म्हणाल्या, "काही महिन्यांनी मी गरोदर होते. त्यानं पुन्हा अॅबॉर्शन करण्याचा तगादा लावला. पण मी त्याच्यापुढे झुकले नाही. कसं तरी तो एकदाचा तयार झाला. पण एका अटीवर. ती अट म्हणजे, होणाऱ्या बाळाचा सांभाळ मलाच करावा लागेल. डिलिव्हरीच्या पंधरा दिवस आधीपर्यंत मी ऑफिसला जात होते. त्याला माझी काहीच काळजी नव्हती."

घरगुती हिंसाचार

फोटो स्रोत, Press Association

त्या म्हणाल्या, "2013 मध्ये एक दिवस ऑफिसमधून यायला उशीर झाला, तेव्हा त्यांची मुलगी 10 वाजेपर्यंत पाळणाघरात होती पण त्यांच्या पतीनं मुलीला घरी आणलं नाही. त्यानंतर मी नोकरी सोडली."

पायल म्हणाल्या, "जेव्हा मी नोकरी सोडली तेव्हापासून अडचणी वाढल्या आहेत. मला रोज अपडेट द्यावे लागत. कारवर ओरखडे तर आले नाहीत ना, हवा कधी भरली, किती ऑईल टाकलं, मुलीला कारमध्येच घेऊन जावं असा नियम होता. खूप मारहाण झाली पण कामाची यादी बंद झाली नाही."

"मी कमवत नव्हते त्यामुळे नियमात वाढ झाली. जेवण बनवण्यापासून ते मुलीला खेळवण्यापर्यंत. मी त्याच्या मनासारखं केलं नाही तर तो मुलीच्या मागे लागायचा. तिला त्रास द्यायचा. चाकू घेऊन तिच्या मागे पळायचा."

पायल सांगतात की, "मुलीला शाळेत सोडायच्या वेळीही कामाची यादी असायची. ती दरवाजावर लावलेली असायची. आठ वाजून दहा मिनिटांनी त्याला सगळी यादी वाचून दाखवायची. 8 वाजून अकरा मिनिटांनीच तो मुलीला शाळेत सोडायला घेऊन जायचा. एक मिनिट आधी नाही आणि एक मिनिट नंतर नाही.

FIR दाखल केला पण...

अमित यांना कंटाळून 2009 साली पायल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण त्यानं काहीही झालं नाही. नंतर पुन्हा एकदा FIR नोंदवली.

त्या सांगत होत्या, "सकाळी नाश्ता करत होता तेव्हा समोर नोटबुक घेऊन बसत होता. ते जो बोलत होता ते सगळं नोंदवून ठेवावं लागायचं. त्याची अंतर्वस्त्र एका विशिष्ट जागेवर ठेवावे लागत असत. कधी ते ठेवायला विसरले तर त्यावरून भांडायचा."

"तो मला खर्चालाही पैसै द्यायचा नाही. मी पैसे कमावण्यासाठी कथकचा क्लास सुरू केला. त्याचा सगळा हिशोब मला द्यावा लागायचा. नातेवाईकांच्या सांगण्यावरून तो मला पाचशे रुपये द्यायचा पण त्याचा हिशोबसुद्धा एक्सेल शिटमध्ये ठेवायचा. एक चूक झाली की पाचशे रुपये कापून घ्यायचा. अनेकदा असं झालं की मला काहीही मिळालं नाही."

प्रत्येक रात्री होता तो नियम

पायल सांगतात की, दररोज जेवण झाल्यावर सगळं काम संपवून मुलीला नवऱ्याच्या हातात सोपवावं लागायचं. त्याचा हँडओव्हर द्यावा लागत असे. हा नियम होता.

घरगुती हिंसाचार

फोटो स्रोत, PRESS ASSOCIATION

त्या म्हणाल्या, "एक दिवस मी हे करायला विसरले तर तो माझ्याशी भांडायला लागला. तो म्हणाला की हिच्यामुळे भांडणं होतात तर मी हिला फेकून देतो. आम्ही पाचव्या मजल्यावर राहायचो. तो मुलीला उचलून बाल्कनीत घेऊन गेला आणि म्हणाला की हिला मी फेकून देतो. मी सॉरी म्हटल्यावर त्यानं ऐकलं."

नवऱ्यानं केला आरोपाचा इन्कार

पायल यांच्या आरोपाचा पती अमित यांनी इन्कार केला आहे. व्यवसायानं इंजिनिअर असलेल्या अमितनं आरोप लावला की, त्यांची बायको खोटं बोलून पैसे लुबाडण्याचा प्रयत्न करत आहे.

बीबीसीशी बोलताना अमित म्हणाले, "मी एका चांगल्या कंपनीत काम करतो. मी तिनं केलेल्या पोळ्यांचं माप घ्यायचो या आरोपाचा इन्कार करतो. मी कोणतीही गोष्ट करण्यासाठी तिला भाग पाडलं नाही."

ते म्हणाले की, "पायल स्वत:च्या करिअरविषयी गंभीर होती. तिला घरी बसणं आवडायचं नाही. आता ती सगळ्या गोष्टी फिरवून फिरवून सांगतेय. आम्हाला मुलगी झाली तेव्हा मी तिला सांगितलं की घरीच राहा आणि नोकरीचं टेन्शन घेऊ नको. मुलीसाठी कोणीतरी घरात हवं ना!"

प्रत्येक कामाचा हिशोब ठेवण्याबाबत ते म्हणाले की, हे सगळं बजेट व्यवस्थित ठेवण्यासाठी करत होते.

अमित म्हणतात, "मी कधीही हिशोब मागितला नाही. घराचं बजेट नीट रहावं म्हणून आम्ही सगळं लिहून ठेवायचो. आधी वहीत लिहायचो मग एक्सेल शिटमध्ये तो हिशोब ठेवायला सुरुवात केली. इतकाच फरक आहे. जेव्हा तिनं सांगितलं की हे योग्य नाही तेव्हापासून आम्ही ते बंद केलं. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही असं काहीही करत नाही."

अमित यांनी आरोप केला की, "ती कायद्याचा गैरफायदा घेत आहे. तिला माझ्याकडून पैसे उकळायचे आहेत. मला तिचे काही फेसबुकवरचे चॅट सापडले. तो बहुतेक तिचा कॉलेजचा मित्र असावा. ती त्याच्याशी खाजगी बाबींवर गप्पा मारायची. पाच सहा महिन्याआधी मला या सगळ्या गोष्टी कळल्या. ती मला म्हणाली की, याबाबत गुपचूप राहा नाहीतर ती घटस्फोट देईन. मुलीसाठी मी चूप राहिलो. मी अस्वस्थ होतो पण मी तिला काहीही बोललो नाही."

पायल
फोटो कॅप्शन, पत्नीला दिलेली कामाची यादी

अमित म्हणाले की, काही काळानंतर ते पायलला घेऊन ते सायकॉलॉजिस्टकडेसुद्धा गेले. पण या बाबतीत त्या दोघांमध्ये एकवाक्यता नाही. पायलच्या म्हणण्यानुसार त्यांनी अमित यांना सायकॉलॉजिस्टकडे नेलं.

पायल मुलीला भेटू देत नाही असाही आरोप अमित यांनी केला आहे. ते म्हणतात, "माझं माझ्या मुलीवर खूप प्रेम आहे. मी तिला दुखावण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. मी तिला भेटू नये यासाठी ती माझ्या मुलीला भाग पाडते."

लग्नासाठी होता दबाव

प्रत्येक गोष्टीची डेडलाईन देण्याबाबत अमित म्हणाले, "वेळेबाबत काटेकोर असण्यात काय गैर आहे? दोघांनी मिळून एखादं काम करण्याची वेळ ठरवायचो. त्यात काय वाईट आहे? त्यामुळे उलट गोष्टी सोप्या होत असत. एखादी गोष्ट सुटून जाऊ नये म्हणून हे करायचो. समस्या अशी आहे की ती आता असं दाखवतं आहे की मी तिचा छळ करतोय. मी तिला कधी जेवणाचा मेन्यू दिलेला नाही.

अमित म्हणाले, "माझ्याजवळ तिच्या सोशल मीडियाचे पासवर्ड नव्हते. ती माझा लॅपटॉप वापरत होती. एकदा तर तिनं स्वतःच माझ्या अकाऊंटवरून कुणाला तरी मेसेज केले आणि मग आपल्या आईला दाखवून गोंधळ घातला."

अमित म्हणतात की, त्यांनी कधीच पत्नीला मारहाण केली नाही. 2008 आणि 2009मध्ये माझ्याविरोधात FIR नोंदवण्यात आल्याचं मला आता कळतंय.

ते म्हणाले, "विवाहाच्याआधी जवळपास 8 महिने आम्ही सोबत होतो. तिला माझ्याविषयी सगळं काही माहीत होतं. जर मी इतकाच वाईट होतो तर माझ्याची लग्न का केलं? हा प्रेमविवाह होता. पायलनं स्वतः मला फोन करून लग्नाविषयी विचारलं होतं. मी त्यावेळेसच नकार दिला होता. पण त्यावेळी ती म्हणाली होती की, जर मी लग्न नाही केलं तर ती जीव देईल. मी जर लग्न नाही केलं तर मला खोट्या आरोपात अडकवलं जाईल, असं तिची आई त्यावेळी म्हणाली होती."

सध्या पायल आणि अमित यांचं प्रकरण कोर्टात आहे.

घरगुती हिसांचाराची प्रकरणं

देशातील महिलांविरोधात होणाऱ्या घरगुती हिसांचाऱ्याच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) वर्ष 2016च्या अहवालानुसार, वर्षभरात घरगुती हिसांचाराची 1,10,378 प्रकरणं समोर आली आहेत.

ज्यांच्या तक्रारी दाखल झाल्या त्याचा हा आकडा आहे. अशी अनेक प्रकरण तर समोरच येत नाहीत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)