पाहा फोटो : मुंबईत विद्यार्थ्यांचा रेलरोको, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईत माटुंगा-दादर स्थानकादरम्यान मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून रेल्वेमध्ये अॅप्रेंटीसशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागणीसाठी रेलरोको आंदोलन केलं.

या आंदोलनामुळे मध्यरेल्वेची लोकल सेवा ऐन गर्दीच्या काळात ठप्प झाली आणि मध्यरेल्वेच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा खोळंबा झाला.

या रेलरोको आंदोलनात अॅप्रेंटीसशिप करणाऱ्या तरुणांसह तरुणीही सहभागी झाल्या. त्यांच्या आंदोलनामुळे ठाण्याहून CST कडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली.

मध्य रेल्वेची वाहतूक कल्याण ते कुर्ला याच मार्गांवर सुरू होती. तर प्रवाशांनी मध्ये रेल्वेऐवजी हार्बर किंवा पश्चिम रेल्वेचा वापर करावा, अशी उद्घोषणा रेल्वे स्थानकांवर करण्यात येत होती.

रेल्वे अॅप्रेंटीस अॅक्ट अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रेल्वे सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करण्यात यावं आणि रेल्वे अॅप्रेंटीसशिपच्या विद्यार्थ्यांसाठी ठरवण्यात आलेला 20 टक्के कोटा कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या केल्या होत्या.

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी रेल्वे मार्ग रोखून धरल्याने मोठ्या प्रमाणात रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना हटवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही केला.

याच्या प्रत्युत्तरात काही तरुणांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात 5 पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या 6 सैनिक जखमी झाले.

मध्ये रेल्वेने ही परिस्थिती लक्षात घेता याप्रश्नी तत्काळ निवेदन पत्रकार परिषदेमार्फत जाहीर केलं. अॅप्रेंटीसशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी 31 मार्च ही अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेण्यात येईल.

नोकरीच्या मागणीसाठी रेलरोको आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं की, आम्ही अनेक वर्षांपासून रेल्वेत अॅप्रेंटीसशिप करत आहोत. तरीही आम्हाला रेल्वेने नोकरीत घेतलेलं नाही.

मध्य रेल्वेने काही मागण्या मान्य केल्यानंतर अखेर 10.45 च्या सुमारास विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं. त्यानंतर वाहतूक सेवा पुन्हा सुरू झाली, असं बीबीसी मराठीचे प्रतिनिधी शरद बढे यांनी सांगितलं.

दुपारून आंदोलन करणाऱ्या अॅप्रेंटीसशिप करणाऱ्या तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. "तुमच्या मागण्या रास्त आहेत. आमच्या पक्षाचा तुमच्या मागण्यांना पाठिंबा आहे. आता आमच्या पक्षाची बैठक होत आहे. त्यात मी तुमचे प्रश्न मांडेन. तुमच्यापैकी महत्त्वाच्या काही विद्यार्थ्यांसह आमच्या पक्षाचे नेते दिल्लीमध्ये जातील आणि त्यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा करतील," असं राज ठाकरे यांनी या तरुणांना सांगितलं.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)