...तर शहीद म्हणून घरी येऊ : शेतकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा

    • Author, प्रविण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, जर सरकारनं वेगळा मार्ग अवलंबला तर शहीद म्हणून घरी येऊ पण मागण्या मान्य झाल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा भारतीय किसान सभेनं नाशिकमध्ये दिला आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान सभेनं विधान भवनला घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकरी लाँग मार्चनं मुंबईत येणार आहेत. मंगळवारी दुपारी नाशिकमधून हा लाँग मार्च सुरू झाला.

यात राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले आहेत.

नाशिकच्या सीबीएस चौकातून या लाँग मार्चला सुरुवात झाली. 12 मार्चला हा लाँग मार्च मुंबईत पोहोचेल.

भारतीय किसान सभेचे पदाधिकारी जे. पी. गावीत म्हणाले, "शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विधान भवनाला घेराव घालण्यात येईल. सरकारनं वेगळा मार्ग अवलंबला तर शहीद म्हणून घरी येऊ. मागण्या मान्य झाल्या शिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही."

भारतीय किसान सभेनं केलेल्या विविध मागण्या अशा :

1. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी

2. वन जमिनींचा संपूर्ण ताबा शेतकऱ्यांना मिळावा.

3. शेतकऱ्यांसाठी पेंशनची तरतूद केली जावी.

4. उत्तर महाराष्ट्रातल्या नदीजोड प्रकल्पांतलं पाणी स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना मिळावं.

5. बोंड अळीग्रस्त आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना विनाशर्त तातडीनं मदत मिळावी.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)