You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गुलाबी बोंड अळीमुळे आता शेतकऱ्यांना त्वचाविकार?
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी अमरावतीहून
विदर्भात कापसावरील गुलाबी बोंड अळीमुळे त्वचाविकाराच्या तक्रारी काही शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. शेतात आणि घरामध्ये साठवलेल्या कापसामुळे त्वचाविकाराची लागण होत असल्याची माहिती मिळत आहे.
याच गुलाबी बोंड अळीचा नायनाट करण्यासाठी करण्यात आलेल्या फवारणीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान 30 पेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजुरांचा मृत्यू झाला होता.
यवतमाळमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 41 त्वचाविकार रुग्णांची नोंद झाली आहे. तर ग्रामीण भागातल्या आरोग्य केंद्रात दररोज 100 पेक्षा जास्त त्वचारोगाचे रुग्ण उपचाराकरिता दवाखाना गाठत आहेत.
संपूर्ण कुटुंबाला अॅलर्जी
अनंत लुटे या शेतकऱ्याचं संपूर्ण कुटुंब शरीराला सुटलेल्या खाजेमुळे बेजार झालं आहे. अनेकदा दवाखान्यात जाऊनही त्यांना बरं वाटत नाहीये. घरात साठवून ठेवलेल्या कापसामुळे त्यांना अॅलर्जी झाली आहे.
"बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे तीन एकरात फक्त चार क्विंटल कापसाचं उत्पादन झालं. त्यावेळी कापसाला 5100 इतका हमीभाव होता. चांगला भाव येईल म्हणून कापूस घरातच साठवून ठेवला. भाव तर मिळालाच नाही, पण हा कापूस आमच्या जीवावर उठला आहे," असं लुटे सांगतात.
लुटे दरवर्षी तीन एकरमध्ये किमान 25 क्विंटल कापसाचं उत्पादन घ्यायचे. यावर्षी उत्पादन तर कमी झालंच, पण आरोग्यावरही परिणाम होण्याच्या मार्गावर आहे.
त्यामुळे त्यांनी पराटीला (कापसाचं शेत) समूळ उपटून टाकण्याचा निर्णय घेतला. आता घरात साठवलेल्या कापसाचं काय करायचा हा मोठा प्रश्न त्यांना पडला आहे.
त्यांच्यासह घरातल्या इतर सदस्यांनाही त्रास व्हायला सुरुवात झाली आहे. ते म्हणतात, "त्वचाविकारामुळे कापूस वेचण्यासाठी गावामध्ये मजूरही मिळणं कठीण झालं आहे. या पिकांवर गुरं-ढोरंही चरायला जात नाहीत," अशा परिस्थितीत त्यांनी स्वत:च पराटीवर ट्रॅक्टर चालवला.
दररोज 20 ते 25 त्वचारोगाचे रुग्ण
अमरावती जिल्ह्यातल्या मार्डीमधल्या आरोग्य केंद्रात दररोज 20 ते 25 त्वचारोगाचे रुग्ण येत असल्याचं स्थानिक मेडिकल ऑफिसर डॉ. गौरव शेगेकर यांनी सांगितलं.
"कमी जास्त प्रमाणात शरीरावर खाज सुटल्याने रुग्ण उपचाराकरिता आमच्याकडे येतात. काही सामान्य असतात, पण काहींना शरीरावर पुरळ आणि गंभीर स्वरूपाचे संसर्ग झाल्याचं दिसून येतं," असं डॉ. शेगेकर सांगतात.
"घरात कापूस ठेवलेल्या कुटुंबातल्या सदस्यांनी कापसाच्या संपर्कात येणं टाळावं, कापसाच्या गंजीवर कापड ठेऊ नये. तसंच मुलांना या परिसरात खेळण्यास मनाई करावी," असा सल्ला डॉ. शेगेकर त्वचाविकार टाळण्याकरता देतात.
यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्यात मोठ्या संख्येत रुग्ण आढळल्यानं तिथं तपासणी शिबिर घेण्यात आलं. त्याठिकाणी डॉक्टरांनी 51 रुग्णांची तपासणी केली. बहुतांश शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवल्याची माहिती दिली. मात्र तपासणीत रुग्णांच्या शरीरावर कीटक आढळले नाहीत.
डॉक्टरांच्या चमूनं घरातल्या कापसाची तपासणी केल्यानंतर कापसावर काही कीटक आढळून आले. तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. तसंच एक नमुना कृषी विज्ञान केंद्राच्या संशोधकाकडे पाठवण्यात आला आहे.
'त्वचाविकाराला सरकारनं गांभीर्यानं घ्यायला हवं'
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांना विदर्भासह नांदेड जिल्ह्यात त्वचाविकाराचे शेकडो रुग्ण आढळल्याचं त्यांनी सांगितलं.
बीबीसीशी याबाबत बोलतांना त्यांनी सांगितलं, "गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर 50 टक्के कापसाचं उभं पीक नष्ट झालं आहे. 10 हजार कोटींचं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागलं आहे. पण आता बाजारात कापसाला भाव नसल्यामुळे घरात ,शेताच्या बंड्यात ठेवलेल्या बीटी कापसाच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना प्रचंड प्रमाणात त्वचाविकाराची लागण होत आहे."
"गावातील शेतकरी, शेतमजूर, लहान मुलं सर्वंच अॅलर्जी आणि खाजमुळे प्राथमिक आरोग्य केंद्र ,ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात तसंच खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या आरोग्य संकटाला सरकारनं गंभीरपणे घेण्याची गरज निर्माण झाली आहे," असं किशोर तिवारी पुढे सांगतात.
त्वचाविकाराची लागण झालेल्यांना मोफत उपचार आणि बीटी बियाणांच्या कंपन्यांकडून संपूर्ण नुकसान भरपाई देण्याची मागणी सुद्धा तिवारी यांनी केली आहे.
गुलाबी बोंड अळीनं ग्रासलेल्या कापसापासून तयार झालेलं कापड आणि गादीतूनही खाज सुटेल, असं किशोर तिवारी यांचं म्हणणं आहे.
"शेतकऱ्यांनी या विरोधात आवाज उठवायला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या घरात कापूस नेऊन टाकावा," तिवारी पुढे सांगतात.
'कापसातून अॅलर्जी होण्याचं कारणच नाही'
कृषीतज्ज्ञ डॉ. शरद निंबाळकर यांनी यापूर्वी कापसातून अॅलर्जी होण्याचं प्रमाण पाहणीत नसल्याचं सांगितलं.
त्यांच्या मते, "मुळात कापसातून अॅलर्जी होण्याचं कारणंच नाही. परंतु आता घरामध्ये साठवलेल्या कापसाच्या संदर्भात हा प्रकार दिसून येतोय. यंदा बोंड अळीवर प्रतिबंधक म्हणून जास्त तीव्रतेच्या कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली. त्याचा अतिरिक्त वापर करण्यात आला. तसंच ज्या कीटकनाशकावर बंदी आहे ते कीटकनाशक गुजरातमधून महाराष्ट्रात आयात करण्यात आलं. याची तीव्रता सामान्य कीटकनाशकापेक्षा जास्त आहे. बीजी-1 आणि बीजी-2 या वाणांना महाराष्ट्रात केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे."
"पण, शेतकऱ्यांनी छुप्या मार्गानं बीजी-3 हे वाण खासगी व्यापाऱ्यांकडून विकत घेतलं. यासोबतच्या तणनाशकावर पूर्वीपासून सरकरची बंदी होती. पण हे सुद्धा काही व्यापाऱ्यांनी गुजरातवरून आयात केलं. आयात केलेल्या मालावर सरकारनं काही प्रमाणात छापे मारून माल जप्त केला. एकंदरीत अतिरिक्त कीटक आणि तणनाशकांच्या वापरामुळे त्याचा काही अंश कापसामध्ये उतरला असावा. यामुळे शेतकऱ्यांना ही अॅलर्जी होत असावी," असं निंबाळकर पुढे सांगतात.
'त्वचाविकाराबाबत आरोग्यविभागाचा अहवाल नाही'
विभागीय आयुक्त आणि एसआयटी प्रमुख पियुष सिंह यांना याबाबतचा आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
यवतमाळ आणि अमरावतीच्या ग्रामीण भागात आरोग्य विभागाची पथकं पाहणीसाठी गेल्याची माहिती त्यांनी दिली.
"त्वचाविकाराचं नेमकं कारण काय आहे, हे आरोग्य विभागाच्या अहवालानंतरच उघड होईल आणि त्यानंतरच त्यावर उपाययोजना सुचवली जाईल," असं पियुष सिंह यांनी सांगितलं.
गुलाबी बोंड अळीपासून कायमची सुटका व्हावी याकरिता युद्ध पातळीवर प्रयत्न होणं गरजेचं दिसून येत आहे. तसंच शेतकऱ्यांनी पुढील पीक घेण्यापूर्वीच त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज व्यक्त होते आहे.
यावर कृषीतज्ज्ञ जोगेंद्र मोहोड यांनी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. ते सांगतात, "कापसाच्या गुलाबी अळीग्रस्त पीकांना समूळ नष्ट केल्यानं अळीचा सरसकट नाश होईल. तसंच जमिनीमधली गुलाबी अळीची अंडी नष्ट करावी लागती. तसंच मान्सूनपूर्व कापसाची पेरणी करू नये. कापसाचं पीक यावर्षी गुलाबी अळीग्रस्त झाले असल्यास पुढच्या वर्षी डाळीचं किवा तेलबियांचं पीक घ्यायला पाहिजे."
हे वाचलंत का ?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)