#5मोठ्याबातम्या : खलिस्तान मुद्द्यावर जस्टिन ट्रुडोंचं अमरिंदर सिंग यांना आश्वासन

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'कॅनडा फुटीरवादी चळवळींना थारा देणार नाही'

फुटीरतावादी चळवळींना कॅनडा थारा देणार नाही, असं कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी झालेल्या भेटीत सांगितल्याचं वृत्त 'द हिंदू' नं दिलं आहे.

अमरिंदर सिंग यांनी ट्रुडो यांची बुधवारी भेट घेत विविध विषयांवर 40 मिनिटं चर्चा केली. तेव्हा सिंग यांनी खलिस्तानचा मुद्दा ट्रुडो यांच्यासमोर मांडला. त्यावर ट्रुडो यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

"आपण कुठल्याही फुटीतावादी शक्तीला पाठबळ देणार नाही, या ट्रुडोंनी दिलेल्या आश्वासनानं आपण समाधानी आहोत," असं सिंग यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.

2. PNB घोटाळ्यात गरज पडली तरच सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप

नीरव मोदी यांनी केलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या 11,000 कोटीच्या घोटाळ्यासंबंधी स्वतंत्र तपास व्हावा, अशा आशयाच्या एका जनहित याचिकेला केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात विरोध केला आहे.

"या प्रकरणी FIR दाखल झाला असून चौकशी सुरू झाली आहे," असं सरकारतर्फे महाधिवक्ता के के वेणुगोपाल यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर म्हटलं आहे.

'NDTV' ने दिलेल्या बातमीनुसार, सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणी सरकारला मुक्तहस्ते चौकशी करू दिली पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे. जर तपास संस्थांनी व्यवस्थित चौकशी केली नाही तरच आम्ही हस्तक्षेप करू, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रकरणावर नरेंद्र मोदी का काही बोलत नाही आहेत, अशी विचारणा करणारी टीका केली आहे.

तुम्ही आपल्या 'मन की बात' कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी लोकांकडून विषय मागवता. यंदा तुम्ही नीरव मोदी आणि राफेल घोटाळ्याबाबत 'मन की बात'मध्ये भाष्य करावं, अशी मागणी गांधींना ट्विटरवरून केली आहे.

3. संपामुळे नागपुरात शहर बससेवा ठप्प

नागपुरातील आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपावर महाराष्ट्र शासनाने, अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम 2011 (Essential Services Maintenance Act किंवा ESMA) च्या तरतुदीनुसार मंगळवारी बंदी घातली, असं वृत्त 'लोकमत'ने दिलं आहे.

त्यानंतर शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेनेने संप अखेर मागे घेण्यात आल्याची घोषणा केली होती. सकाळी 10 पर्यंत शहरात बस वाहतूक बंदच होती. त्यानंतर काही बसेस सुरू झाल्या.

या वृत्तानुसार दुपारी 3 वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर जेमतेम 50 बसेस सुरू होत्या तर तब्बल 325 बसेस डेपोतच उभ्या असल्याने शहर बससेवा ठप्पच होती. यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला.

ESMA नंतरही कामावर रुजू न झाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाने १८ चालक आणि वाहकांना सेवेतून बडतर्फ केलं आहे.

4. 'मिलिंद एकबोटेच्या अटकेसाठी पोलीस आग्रही'

भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक का केली नाही, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारला होता.

त्यावर पुण्यात बोलताना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, एकबोटेंना पोलिस कोठडी घेऊन चौकशी करायची आहे, केवळ अटक करायची नाही.

'सकाळ'ने दिलेल्या बातमीनुसार विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, "एकबोटेंना अटकपूर्व जामीन मिळून दिलासा मिळाला होता. त्या अनुषंगाने आम्हाला पोलीस कोठडी घेऊन त्यांची चौकशी करायची आहे. फक्त अटक करून जामीन मिळू द्यायचा नाही."

"त्यामुळे आमची कोठडीची मागणी आहे. त्यानुसार 14 मार्चला सुनावणीवेळी ताकदीनिशी न्यायालयात बाजू मांडू."

5. सातवीतल्या विद्यार्थ्याची शिक्षिकेला 'बलात्काराची धमकी'

गुरुग्राममध्ये सातव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शिक्षिकेला बलात्काराची धमकी दिल्याचं वृत्त 'द टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलं आहे.

एका ऑनलाईन पोस्टद्वारे त्या विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षिकेला आणि तिच्या मुलीला बलात्काराची धमकी दिल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

तर, याच शाळेत आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने आणखी एका शिक्षिकेला ईमेल पाठवत तिला हॉटेलमध्ये जेवणाचं आमंत्रण देत लैंगिक संबंधांची मागणी केली.

या प्रकरणी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक समितीतर्फे चौकशी करण्यात येणार असल्याचं शाळेच्या व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आलं आहे. या घटनेबद्दल सर्व स्तरांतून चिंता व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)