#5मोठ्याबातम्या : डी. एस. कुलकर्णी यांना अटक

डी. एस. कुलकर्णी

फोटो स्रोत, dskgroup.co.in

आजच्या दैनिकांतील 5 मोठ्या बातम्या पुढीलप्रमाणे;

1. डी. एस. कुलकर्णी यांना अटक

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास डी. एस. कुलकर्णींना (डी. एस. के.) दिल्लीतील त्यांच्या घरातून अटक केली. त्यांना पुण्यातील कोर्टात हजर करण्यात येईल. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

सुमारे अडीच हजारहून अधिक गुंतवणूकदारांची किमान २३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय डी. एस. के. यांच्यावर आहे.

डी. एस. के. यांनी न्यायालयाचीही दिशाभूल केली असल्यानं आता ते विश्वासपात्र राहिलेले नाहीत, असे गंभीर निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांचे अटकेपासूनचे संरक्षण काढून घेतले होते, असं या बातमीमध्ये म्हटलं आहे.

2. अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांना अखेर अटक

एबीपी माझामधल्या वृत्तानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी भाजपचे अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांना अटक करण्यात आली आहे. अहमदनगर पोलिसांनी ही कारवाई केली.

श्रीपाद छिंदम कारमधून जात असताना, नागरिकांनी पाठलाग केला. त्यानंतर कारमधून पळून छिंदम सोलापूर रोड परिसरातील शिराडोण शिवारातील अंधारात लपले. त्यावेळी गुन्हे अन्वेषण विभागानं छिंदमना अटक केली.

महापालिकेतील बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याशी कामासंदर्भात फोनवरुन बोलताना, छिंदमनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

श्रीपाद छिंदम यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपमधून बडतर्फ करण्यात आले असून उपमहापौरपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

3. ३२ हजार अंगणवाडी सेविकांच्या नोकरीवर गदा!

लोकसत्तामधल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातल्या दोन लाख अंगणवाडी सेविकांपैकी पंधरा टक्के म्हणजे सुमारे ३२ हजार अंगणवाडी सेविकांची कपात करण्याचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागानं मांडला आहे.

त्याचप्रमाणे सध्या ६५ वयापर्यंत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या सेवेचे वय ६० करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फटका राज्यातील अंगणवाडी सेविकांना बसणार आहे.

३२ हजार अंगणवाडी सेविकांना काढून टाकल्यास राज्यातील कुपोषणाचा प्रश्न आणखी पेटेल व बालमृत्यूंची संख्याही वाढेल अशी भीती व्यक्त राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती'च्या शुभा शमीम यांनी व्यक्त केली असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

4. कावेरीचा वाटा आता कर्नाटकाच्या पारड्यात

हिंदुस्तान टाइम्समधल्या वृत्तानुसार, सुप्रीम कोर्टानं कावेरी नदीच्या पाणी वाटपात कर्नाटकचा हिस्सा वाढवण्याचा निर्णय दिला आहे. तसंच, तामिळनाडूच्या हिश्श्यात घट करण्याचे आदेश दिले. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठानं हा निर्णय दिला.

सुप्रीम कोर्ट

फोटो स्रोत, Getty Images

या निर्णयामुळे आता कर्नाटक राज्याला वर्षाला अधिकचे 14.75 TMC फूट पाणी मिळणार आहे. त्यामुळे कर्नाटकचा मूळ वाटा वाढून आता 284.75 TMC फूट होणार आहे. तर तामिळनाडूला वर्षाला 404 TMC फूट पाणी मिळणार आहे.

हा पाणी वाटपाचा करार पुढची 15 वर्षं अस्तित्वात राहील, असंही कोर्टानं स्पष्ट केलं.

5. नीरव मोदी, मेहुल चोकसी यांचे पासपोर्ट निलंबित

टाइम्स ऑफ इंडियामधल्या वृत्तानुसार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी देशाबाहेर असलेले उद्योगपती नीरव मोदी आणि त्यांचे सहकारी मेहुल चोकसी यांचे पासपोर्ट निलंबित केले.

नीरव मोदी

फोटो स्रोत, JAMIE MCCARTHY/GETTY IMAGES

पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 11 हजार 360 कोटींच्या घोटाळ्यात हे दोघे प्रमुख संशयीत असल्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं ही कारवाई केली.

येत्या 7 दिवसांत त्यांच्याकडून याबाबत विचारणा न झाल्यास त्यांचे पासपोर्ट रद्द करण्यात येतील असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)