#BudgetWithBBC : महाराष्ट्राला काय मिळालं?

रोजगार, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलेलं बजेट आज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केला. यात महाराष्ट्राच्या पदरी काय पडलं यावर एक नजर टाकू या.

प्रत्येक बजेटपूर्वी राज्यांचे अर्थमंत्री आपल्या मागण्या किंवा अपेक्षा अर्थमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत मांडत असतात. त्याप्रमाणे यंदा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी आपली अपेक्षांची एक फाईलच अर्थविषयक समितीसमोर नेली होती.

महाराष्ट्रासमोरची मुख्य समस्या आहे ती पत पुरवठ्याची. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि सातव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार देता देता महाराष्ट्र सरकार मेटाकुटीला आलं आहे.

पायाभूत सुविधा उभारणी

2017-18मध्ये देशभरात पायाभूत सुविधा उभारणीचे जे प्रकल्प सुरू आहेत त्यातले पन्नास टक्के प्रकल्प राज्यातले आहेत असा दावा राज्यसरकारने केला आहे.

अशावेळी हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारला निधीची कमतरता जाणवते आहे. त्यामुळे मुनगुंटीवार यांनी केंद्र सरकारकडे कर्ज मर्यादा वाढवण्याची मागणी केली आहे.

विदर्भ, मराठवाड्यातले 90 सिंचन प्रकल्प, ग्रामीण भागात रस्ते बांधणी, नवी मुंबईत विमानतळ बांधणी हे सगळे प्रकल्प निधीअभावी रखडू शकतात.

त्यामुळे यंदाच्या बजेटकडे सगळ्या देशाबरोबरच राज्य सरकारचं विशेष लक्ष होतं. अशावेळी राज्याच्या पदरात काय पडलं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

बजेटचे सगळे तपशील अजून आपल्याकडे आलेले नाहीत. पण, कोणते निर्णय राज्यासाठी लाभदायी ठरु शकतील ते पाहू या.

  • कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या पुढे जाऊन शेतमालासाठी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी 2 हजार कोटींची तरतूद झाली आहे.
  • 2022 पर्यंत सर्वांना घरं देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. खाजगी-सार्वजनिक भागिदारीतून हे साध्य करण्यात येणार आहे.
  • सिंचन प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारची 3500 कोटींची मागणी. त्यावर विचार सुरू.

या व्यतिरिक्त रेल्वे आणि हवाई मार्गांसाठी थेट तरतूद करण्यात आली आहे.

  • मुंबईतल्या उपनगरी रेल्वे : 90 किमी मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 11 हजार कोटींची तरतूद
  • मुंबई रेल्वे आणि उपनगरी सेवेसाठी 50 हजार कोटींची तरतूद
  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चालवण्यासाठी विशेष कौशल्य असलेले कर्मचारी लागणार आहेत. त्यांच्या प्रशिक्षणासाठी बडोद्यात प्रशिक्षण केंद्र
  • सर्व रेल्वे स्थानकांवर वाय-फायची सोय
  • विमानतळं नवीन शहरांना जोडणार. राज्यात तीन विमानतळांच्या उभारणीचं काम सुरू.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)