#5मोठ्याबातम्या : राजू शेट्टी काँग्रेस-राष्ट्रवादीशी समझोत्यास तयार

पाहूयात आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या 5 महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात.

1. काँग्रेस-राष्ट्रवादीशी समझोत्यास तयार

केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी समझोत्यास तयार असल्याचं वक्तव्य खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे.

लोकसत्तामध्ये आलेल्या वृत्तानुसार, भाजपविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांची एकच आघाडी होणार असेल, तर काही अटी व शर्तीवर, खासकरून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यात सहभागी होण्याचा विचार केला जाईल, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार शेट्टी यांनी सांगितलं.

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उग्र आंदोलन करीत राजू शेट्टी यांनी निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली. आता मात्र त्यांनी त्याच पक्षांशी जुळवून घेण्याची तयारी केली आहे.

आपला समझोता हा प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंधित मुद्दयांवर असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. माझा राजकीय पिंड हा विरोधी पक्षाचा आहे, त्यामुळे सरकार कुणाचे जरी आले तरी लोकांच्या प्रश्नांवर मी आवाज उठवत राहणार असं त्यांनी सांगितले.

2. दहावीचं पुस्तक प्रकाशनाआधीच व्हॉटसअ‍ॅपवर

प्रकाशनापूर्वीच दहावीचं पुस्तक व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल झाल्याची बाब महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या निदर्शनास येताच त्यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून दहावीच्या नवीन अभ्यासक्रम पुस्तकांच्या निर्मितीचे काम सुरू आहे. यापैकी विज्ञान आणि तंत्रज्ञान : भाग १ व २ या विषयाची पुस्तकं प्रकाशनापूर्वीच व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल झाली. या प्रकरणाची दखल घेत मंडळानं व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल झालेली प्रत व मंडळाची प्रत याबाबत तपास करून प्रत्यक्ष वस्तुस्थिती तपासण्याबाबत दादर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

3. तनिष्कच्या विक्रमी धावा

नवी मुंबईच्या 14 वर्षीय तनिष्क गवतेने शालेय स्पर्धेत नाबाद 1,045 धावा चोपून क्रिकेटमध्ये गरुडभरारी घेतली आहे.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, तनिष्कने या खेळीत 149 चौकार आणि 67 षटकार लगावले. वैयक्तिक धावसंख्येचा हा विक्रमच आहे. पण या स्पर्धेला एमसीएची परवानगी नसल्यानं या विक्रमाची अधिकृत नोंद होण्याबाबत संभ्रम आहे.

याआधी कल्याणच्या १५ वर्षीय प्रणव धनावडेने भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ३२३ चेंडूत नाबाद १००९ धावांची विक्रमी खेळी केली होती. तो विक्रम तनिष्कने मोडला आहे.

कोपर खैरणेमध्ये नवी मुंबई शिल्ड शालेय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत यशवंतराव चव्हाण इलेव्हन विरुद्ध यशवंतराव चव्हाण इंग्रजी माध्यम शाळा यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात यशवंतराव चव्हाण इलेव्हनकडून खेळणाऱ्या तनिष्कने ५१५ चेंडूंमध्ये नाबाद १,०४५ धावा चोपल्या.

4. गणित आणि भाषेचं कौशल्य कमी होत जातं

शालेय विद्यार्थी जसे वरच्या वर्गात जातात, तसं त्यांच्यातील गणित आणि भाषेचं कौशल्य कमी होत जात असल्याची माहिती समोर आली आहे.

द इंडियन एक्सप्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे. सरकारी शाळांमध्ये निम्न ते उच्च श्रेणी प्रणालीमध्ये गणित आणि भाषा विषय शिकण्याच्या क्षमतेत घट होत असल्याचं दिसून आलं आहे.

केंद्र सरकारने पहिल्यादांच केलेल्या शिक्षणाच्या राष्ट्रीय मूल्यांकनात अनेक बाबी समोर आल्या आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयानं गेल्या महिन्यात नॅशनल अ‍ॅचिव्हमेंट सर्वेक्षणाचा पाहणी अहवाल जाहीर केला. 700 जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये हा सर्वे करण्यात आला होता.

इयत्ता तिसरीतील 67.7 टक्के विद्यार्थ्यांमध्ये भाषेत प्रगती दिसली. पण इयत्ता पाचवीमध्ये यात घट झाल्याचे दिसून आले. पाचवीचे 58.4 टक्के विद्यार्थी तर इयत्ता आठवीचे 56.7 टक्के विद्यार्थ्यांमध्येच भाषा कौशल्यात प्रगती आढळून आली.

गणितात हे प्रमाण तर आणखी गंभीर आहे. इयत्ता तिसरीतील 64.3 टक्के विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाचं कौशल्य दिसले. तिथं इयत्ता आठवीच्या 42 टक्के विद्यार्थ्यांमध्येच प्रगती दिसली.

5. IIT, NIT चे विद्यार्थी अभियांत्रिकीला शिकवणार

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळूरू आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे 1,200 हून अधिक पीएच.डी आणि एम.टेक धारक विद्यार्थी हे पुढील तीन वर्षे ग्रामीण भागातील 53 सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचं काम करणार आहेत.

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी माध्यमांना माहिती दिली की, हे विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये रुजू झालेले आहेत. तीन वर्षाच्या कंत्राटावर ते अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिकवणार असून दर महिना 70 हजार रुपये पगार त्यांना मिळणार आहे.

तीन वर्षांनंतर त्यांना अध्यापनाचं कार्य करायचं की कॉर्पोरेट क्षेत्रात जायचं याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. 5,000 विद्यार्थ्यांनी या कामासाठी अर्ज केले होते. त्यापैकी 1,200 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यात 300 पीएच.डीधारक आणि 900 एम.टेकधारक विद्यार्थी आहेत.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)