You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नवे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?
- Author, अमृता शर्मा
- Role, बीबीसी मॉनिटरिंग
डोकलाम प्रश्नावर तोडगा काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे मुत्सद्दी अशी ओळख असलेल्या विजय केशव गोखले यांनी आज परराष्ट्र खात्याच्या सचिव पदाची सूत्रं हाती घेतली.
28 जानेवारी रोजी सुब्रह्मण्यम जयशंकर यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर, गोखले यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला.
1981मध्ये ते परराष्ट्र सेवेत दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
गोखले यांचा जन्म 1959 साली झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहासाची पदव्युत्तर पदवी घेतली. ते मँडरीन (चिनी) आणि संस्कृत अस्खलितपणे बोलू शकतात. 1981मध्ये ते परराष्ट्र खात्यात दाखल झाले. सुरुवातीच्या काळात हाँगकाँग, हनोई, बिजिंग, न्यूयॉर्क या ठिकाणी असलेल्या भारतीय दूतावासातलं कामकाज त्यांनी पाहिलं.
दांडगा अनुभव
गोखले यांना परराष्ट्र खात्यातील विविध विभागांचा अनुभव आहे. "द्विपक्षीय संबंध असो वा अर्थविषयक धोरण असो, गोखले हे प्रत्येक प्रश्न हाताळू शकतात," असं मत माजी राजदूत अनिल वाधवा यांनी व्यक्त केलं आहे.
जानेवारी 2010 ते ऑक्टोबर 2013 या काळात ते मलेशियात भारताचे उच्चायुक्त होते. ऑक्टोबर 2013 ते जानेवारी 2016 या काळात ते जर्मनीमध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं. परराष्ट्र खात्याच्या चीन आणि पूर्व आशिया विभागाचे ते काही काळ संचालक होते.
वाधवा आणि गोखले या दोघांनी मँडनरीचं शिक्षण एकत्रच घेतलं आहे. "गोखले यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा अनेक क्लिष्ट प्रश्न सोडवताना होईल," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं आहे.
कुशल प्रशासक
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू नुकताच भारताच्या भेटीवर येऊन गेले. या भेटीच्या नियोजनाची जबाबदारी गोखले यांच्याकडेच होती. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या परेडला ASEANच्या प्रमुख हजर होते. त्यांच्या भेटीच्या नियोजनाची जबाबदारी देखील गोखलेंकडेच होती.
पाकिस्तानमधल्या पॅलेस्टाइनच्या राजदूतांनी मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावर भारताने नाराजी व्यक्त केली होती. गोखले यांनीच भारतातल्या पॅलेस्टाइनच्या राजदूतांना बोलावून स्पष्टीकरण मागितलं होतं.
डोकलाम प्रश्नावर तोडगा
डोकलाम येथे भारत आणि चीनचं सैन्य 73 दिवस एकमेकांसमोर उभं होतं. ही परिस्थिती तणावपूर्ण होती. हा प्रश्न विकोपाला जाईल असं वाटत होतं. चीन आणि भारत दोन्ही देश आपलं सैन्य मागे घेण्यास तयार नव्हते. पण त्याच वेळी दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू होत्या. या वाटाघाटींमध्ये गोखले यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आणि तणाव निवळला.
20 जानेवारी 2016 ते 21 ऑक्टोबर 2017 या काळात ते चीनचे राजदूत होते. विजय गोखले हे चीनविषयक मुद्द्यांचे तज्ज्ञ समजले जातात. या अनुभवामुळेच ते डोकलामवर तोडगा काढू शकले, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
"डोकलाम प्रश्न त्यांनी ज्या प्रकारे हाताळला, ते पाहता अशा तणावपूर्ण परिस्थितीला सामोरं जाण्याची त्यांची क्षमता आणि कौशल्य वाखाणण्याजोगं आहे असंच म्हणावं लागेल," अशी प्रतिक्रिया भाजप परराष्ट्र धोरण विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी दिली.
मोठी आव्हानं
पाकिस्तान आणि चीनबरोबर आपले संबंध अधिक दृढ करणे हे त्यांच्यासमोरील मोठं आव्हान असेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.
"चीनशी असलेले काही मतभेद दूर करणं आणि संबंध अधिक सौहार्दपूर्ण करणं हे त्यांच्यासमोरील आव्हान आहे," असं मत जयंत जॅकब यांनी हिंदुस्तान टाइम्समध्ये आपल्या लेखात व्यक्त केलं होतं.
"वेगवेगळ्या कारणांमुळे आपला इतर शेजारी राष्ट्रांसोबत संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हे दूर करण्याकडेही त्यांना लक्ष द्यावं लागणार आहे," असं जॅकब यांनी म्हटलं आहे.
भविष्याबद्दल गोखले आशावादी आहेत हे त्यांच्या वक्तव्यांवरून आपल्याला जाणवतं. "इंटरनेटच्या काळात भौगोलिक सीमा धूसर होत आहेत. भारत आणि चीनसारख्या वेगवान गतीनं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांना भरपूर प्रमाणात संधी आहेत," असं विजय गोखले यांनी रायसाना डायलॉग्ज 2018 या परिषदेत म्हटलं होतं.
भारताच्या परराष्ट्र खात्यासमोर अनेक आव्हानं आहेत. पाकिस्तानच्या संबंधांमध्ये तणाव आहे. तर, चीन आपली भूमिका आपल्या शेजाऱ्यांसमोर अधिक ठळकपणे मांडताना दिसत आहे. "अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सचिवपदाची सूत्रं हाती घेतली आहे. गोखले यांचा पूर्वानुभव पाहता ते ही नवी जबाबदारी समर्थपणे हाताळू शकतील," असा विश्वास माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केला आहे.
(बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)