ऑफिसमधून सुटी घेऊन त्यानं बदललं लोकांचं जीवन

    • Author, सर्वप्रिया सांगवान
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

समाजाच्या मापदंडानुसार चांगली नोकरी, चांगली लाईफस्टाईल आणि महागड्या वस्तू आपल्याकडे असल्या की आपण फार खूश आहोत, असं आपल्याला वाटतं. पण हे सगळं असणं म्हणजेच सर्वकाही नसतं.

आयआयटी पवईमध्ये शिकलेले 30 वर्षांचे जयदीप बंसल एका मल्टिनॅशनल कंपनीत उत्तम पदावर आणि वेतनावर काम करत होते. पण त्यांना काय हवं होतं हे त्यांनासुद्धा माहीत नव्हतं.

2013 मध्ये त्यांनी ऑफिसमधून सुटी घेतली आणि त्या सुटीत त्यांनी अनेकांचं आयुष्य बदललं.

जयदीप त्यांची कहाणी अशा पद्धतीनं सांगतात...

माझा मित्र पारसनं ग्लोबल हिमालय एक्स्पिडिशन सुरू केलं होतं. हिमालयाच्या दुर्गम भागात शिक्षण आणि वीज पोहोचवणं हा त्यामागे उद्देश होता.

या सुट्टीत मी पण या ग्रुपबरोबर हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला. तिथं मी अनेक लोकांना भेटलो आणि प्रेरित झालो. पृथ्वीवरच्या दोन्ही धृवावर गेलेल्या रॉबर्ट स्वान यांनासुद्धा भेटलो.

अशा लोकांना भेटलो ज्यांनी पाण्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव असा सायकलनं प्रवास केला. मोबाईल आणि इंटरनेटपासून दूर अनेक लोकांमध्ये गेलं की त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळतं.

आजही या परिसरात लोक वीजेशिवाय कसे राहतात याचं मला आश्चर्य वाटतं. तिथून परत आल्यानंतर मला या कार्यक्रमात आणखी रस निर्माण झाल होता.

2014 साली तिथं दुसऱ्यांदा गेलो तेव्हा मी ठरवलं की, कोणत्यातरी गावात नक्की वीज पोहोचवणारच

15 दिवसाची सुटी घेऊन जेव्हा आम्ही हिमालयात पोहोचलो तेव्हा तीन दिवसात लडाखच्या सुमदा चेम्मो या गावात वीज पोहोचली. आम्ही सोलर पॅनल आणि बॅट्रीच्या सहाय्यानं आम्ही ही वीज पोहोचवली.

या कामानंतर मला जे मिळालं ते एका अनुभवापेक्षा खूप जास्त होतं.

त्यानंतर आम्ही 2015 मध्ये पुन्हा तीन महिन्यांची सुट्टी घेतली. मग वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आम्ही सामील झालो आणि जेव्हा दुर्गम भागात वीज पोहोचण्याच्या प्रकल्पाबदद्ल सांगितलं तेव्हा कॉर्पोरेट कंपन्यांनी आम्हाला पाच गावांसाठी निधी दिला.

आम्ही तीन महिन्यात दहा गावांमध्ये वीज पोहोचवली. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील 30 गावांचं आम्ही सर्वेक्षण केलं. आम्ही गावातल्या लोकांना यामध्ये सहभागी करून घेतलं कारण त्यांच्या सहकार्याशिवाय आमचं काम पूर्ण होऊ शकलं नसतं.

आम्ही ट्रेकिंग करत या गावांमध्ये जायचो. एकदोनदा मरतामरता वाचलो. असं नाही की तुम्ही उठलात आणि गेलात म्हणजे सगळं काही झालं. डोंगरांमध्येसुद्धा धोका असतोच. पण असं काही होतं तेव्हा तुम्ही स्वत:लाच विचारता की अशा जोखमीचं महत्त्व आहे की नाही?

जेव्हा तुम्ही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद बघता तेव्हा तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं. तुम्ही त्यांच्यासाठी एवढंसं केलं तरी ते तुम्हाला राजा मानतात. तुम्हाला ते देवासारखं बघतात.

एका गावात एका माणसानं मला 200 वर्षं जुने कपडे दिले. जे ते आपल्याला गुरुंना द्यायचे.

वीज पाहताच लोक नाचू लागायचे. कधी कोणी रडायला लागायचं. कोणी विचारायचं की या बल्बमध्ये केरोसिन कुठून घालतात.

तुम्ही तार लावणं सुरू केलं की स्वयंपाकघरात बसलेली महिला तुमचे आभार मानते. इतकं प्रेम कोणत्या शहरातसुद्धा मिळत नाही.

2016 ला मी माझ्या नोकरीला रामराम ठोकला. यापेक्षा मी जास्त पैसा कमावू शकणार नाही आणि माझं मोटिव्हेशन काय आहे हे मला कळलं होतं.

या तीन महिन्यात खरा आनंद काय आहे हे मला कळलं. एक बल्ब लोकांचं आयुष्य बदलू शकतो. एक बल्ब सुरू झाल्यावर लोक आनंदानं नाचायला लागतात, हसू लागतात आणि आनंदानं रडू लागतात.

मी जमिनीवर राहून लोकांबरोबर काम करायला शिकलो. वेगवेगळ्या परिस्थितीत काय करता येईल, कसा संयम ठेवायचा हे सगळं शिकलो. कारण संयम शिकवण्यासाठी डोंगरासारखा गुरू नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)