#5मोठ्याबातम्या : गडचिरोलीत मटणाची पार्टी घेऊन बलात्काऱ्याला सोडलं मोकाट

पाहूयात आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या 5 महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात.

1. गावाला मटणाचे भोजन, बलात्कारी मोकाट

गडचिरोली जिल्ह्यातल्या मोहलीमध्ये पाचवीत शिकत असलेल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जात पंचायतीनं १२ हजार रुपये दंड आणि गावाला बकऱ्याच्या मटणाचं भोजन देण्याची शिक्षा ठोठावली.

लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, मुलीच्या अब्रूचे धिंडवडे काढणाऱ्या आरोपीकडून मटण पार्टी घेणाऱ्या या जात पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भूमकाल संघटनेने केली आहे.

मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार पालकांनी केल्यानंतर जात पंचायतीनं आरोपीला दंड ठोठावला. त्यानुसार आरोपीनं गावजेवण दिलं. पण पीडितेच्या कुटुंबीयांना दंडाची रक्कम दिली नाही. त्यानंतर पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला.

2. तिहेरी तलाक विधेयकाला राष्ट्रवादीचा विरोध

तलाक हा कुराण आणि पैगंबरांनी दिलेला मार्ग, संदेश आहे. त्यात हस्तक्षेपाचा कोणालाही अधिकार नाही. धर्मगुरूंना विश्वासात घेऊन पुढील पाऊल टाकता येईल, त्यात जर कुणी हस्तक्षेप करत असेल तर त्याला आम्ही पाठिंबा देणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

दिव्य मराठीनं याबाबतच वृत्त दिलं आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचा समारोप झाला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते.

तसंच उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची केंद्राची घोषणा हा खोटा डाव आहे. दीडपट हमीभाव दिला जाईल, असं एकीकडे सांगितलं जात असलं तरी दुसरीकडे उत्पादन खर्च कमी दाखवण्यात येत आहे. हा प्रकार म्हणजे लबाडाच्या घरचं आवताण आहे. जोपर्यंत पैसे खिशात पडत नाही तोपर्यंत काहीही खरं नाही, अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली.

3. राज्यातील 11,000 सरकारी कर्मचारी बडतर्फ होणार

आदिवासींच्या बनावट जमात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकऱ्या बळकावणाऱ्या 11,770 सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर राज्य सरकार कायमस्वरूपी बडतर्फीची कारवाई करणार आहे.

सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेचे प्रतिकूल परिणाम होऊ नयेत यासाठी टप्प्याटप्प्यानं या निर्णयाची अमंलबजावणी करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. याबाबतचा सरकारी आदेश लवकरच विभागाकडून काढला जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश देऊनही निर्णयाचे पालन न केल्यानं मुख्य सचिवांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर मुख्य सचिवांनी सामान्य प्रशासन विभागाला या निर्णयाची अमंलबजावणी कऱण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करण्यात येणार असल्याचे मुख्य सचिव सुमीत मलिक यांनी म्हटलं आहे.

4. चंद्राबाबू आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

तेलगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचं वृत्त दिव्य मराठीनं दिलं आहे.

भाजप प्रत्येक राज्यात प्रादेशिक पक्षाशी युती करतो आणि सत्ता आल्यानंतर प्रादेशिक पक्ष संपवण्याचं काम करतो, असा आरोप चंद्राबाबूंनी काही दिवसांपूर्वी केला होता.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यात चंद्राबाबू नायडू यांच्या मागण्या मान्य न झाल्यानं आणि त्यांच्या राज्याला विशेष काही दिलं न गेल्यानं ते नाराज झालेत.

त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याच मुद्द्यावर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती शिवसेनेतल्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेत कोणीही अधिकृतरीत्या या चर्चेची पुष्टी करत नसलं तरी खासगीत मात्र या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं मान्य करत आहेत, असं या वृत्तात म्हटलं आहे.

5. मला महाराज म्हणून नका - उदयनराजे

महाराज एकच फक्त छत्रपती शिवाजी महाराज. मला महाराज म्हणू नका, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, साताऱ्यात छत्रपती शिवाजीराजे भोसले संग्रहालयाच्या सुरु असलेल्या बांधकामाची पहाणी करताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादामुळे जगत आहोत. देशाला फक्त शिवाजी महाराजांचेच विचार तारतील.

शिवाजी महाराजांनी इतक्या कमी कालावधीत साडेतीनशेहून अधिक गडकिल्ले बांधले, ही अशक्य गोष्ट महाराजांनी शक्य केली. त्यामुळे या किल्ल्यांचं जतन केलं पाहिजे असंही उदयनराजेंनी म्हटलं.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)