प्रेस रिव्ह्यू : जामिया निझामिया विद्यालयाचा फतवा

शंभर वर्षांहून जुन्या असलेल्या हैदराबादमधल्या जामिया निझामिया विद्यालयानं कोलंबी हा माशांचा प्रकार नसल्यानं तो खाऊ नये असा फतवा काढला आहे.

द हिंदूनं दिलेल्या वृत्तानुसार, हैदराबादमधल्या या जुन्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या मुस्लीम संस्थेनं हा फतवा काढला आहे. काही अन्नपदार्थ हे प्रतिबंधित यादीत आहेत, तर काही अन्न पदार्थ हे टाळण्याच्या यादीत आहेत. कोलंबीचा समावेश हा टाळण्याच्या गटात येतो, असं जामिया निझामियाचं म्हणणं आहे.

पत्रकारावर गुन्हा दाखल

आधारचा डाटा विकत मिळते अशी बातमी देणाऱ्या रचना खैरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. UIDAI च्या उपसंचालकांनी ट्रीब्यून या वर्तमानपत्राच्या या वार्ताहराची तक्रार केली आहे. त्यानुसार नवी दिल्ली पोलिसांनी रचना खैरा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

व्हॉट्स अॅपवर अज्ञात व्यक्तींनी आधारचा डाटा विक्रीला काढल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याची बातमी केली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी द इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे.

ट्रीब्यूननं आधारची माहिती विकत घेतल्यानं ही तक्रार करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू झाली आहे.

11 जणांचा हिमस्खलनात मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या तंगधार क्षेत्रात शनिवारी झालेलं हिमस्खलन जीवघेणं ठरलं. या बर्फाखाली गाडले जाऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अकरावर पोहोचली आहे.

या ठिकाणी मदतकार्य सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना घडली त्या वेळी ८ जण गाडले गेले होते, त्यानंतर हा आकडा वाढला, असं काश्मीरचे विभागीय आयुक्त बसीर अहमद खान यांनी सांगितल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.

सिनेविस्टा स्टुडिओला आग

मुंबईतल्या कांजूरमार्ग जवळच्या गांधीनगर भागातल्या सिनेविस्टा स्टुडिओला भीषण आग लागली होती. या आगीत स्टुडिओचं नुकसान झालं असून कोणाला दुखापत झालेली नाही.

लोकसत्तानं दिलेल्या बातमीनुसार, सिनेविस्टा स्टुडिओत टिव्ही मालिकांचं शूटिंग केलं जातं. सध्या या ठिकाणी बेपनाह या हिंदी मालिकेचं शूटिंग सुरू होतं. त्याचदरम्यान आग भडकली.

आग कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. शूटिंगदरम्यान स्टुडिओत १५० कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं.

11 वर्षांनी महाराष्ट्राला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं जेतेपद

महाराष्ट्राच्या पुरुष संघानं तब्बल अकरा वर्षांनी राष्ट्रीय कबड्डीचं विजेतेपद पटकावलं आहे. महाराष्ट्राच्या कबड्डी संघानं सेनादलाचा 34-29 असा निसटता पराभव करून यावर्षीच्या राष्ट्रीय कबड्डीच्या चषकावर आपलं नाव कोरलं आहे.

महाराष्ट्रानं 2006 साली अमरावतीत झालेल्या राष्ट्रीय कबड्डीत पुरुषांचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राला विजेतेपदानं कायम हुलकावणी दिली.

अखेर यंदा हैदराबादमध्ये झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघानं विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. रिशांक देवाडिगाच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्रानं उपांत्य फेरीत कर्नाटकवर मत केली होती. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)