चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद दोषी यांना पाच वर्षांची शिक्षा

चारा घोटाळ्याच्या तिसऱ्या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना CBIच्या एका विशेष न्यायालयानं पाच वर्षांची शिक्षा आणि पाच लाख रुपये दंड सुनावण्यात आला आहे.

आज रांचीच्या न्यायालयाने सुनावलेल्या या निकालात बिहारचे आणखी एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा सुद्धा दोषी आढळले आहेत. त्यांनाही पाच वर्षांची शिक्षा आणि पाच लाख रुपये दंड सुनावण्यात आला आहे.

राष्ट्रीय जनता दल अध्यक्ष असलेले लालू प्रसाद यांना या चारा घोटाळ्याप्रकरणी आधीच 6 जानेवारीला CBIच्या एका विशेष कोर्टाने साडे तीन वर्षांची शिक्षा आणि पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला होती.

त्या प्रकरणात लालू प्रसाद यांच्यावर 1991 ते 1994 दरम्यान देवघर कोषागारातून 85 लाख रुपये परस्पर वळवण्याचा आरोप होता. लालू यादव यांना या भ्रष्टाचाराविषयी माहिती होती, मात्र त्यांनी तो गैरव्यवहार रोखला नाही, असा आरोप CBIनं केला होता.

6 जानेवारीच्या निकालाआधी लालू यादव यांच्यासह 34 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी कोर्टाने 15 जणांना दोषी ठरवलं होतं, मात्र जगन्नाथ मिश्रा यांच्यासह सहा जणांना दोषमुक्त करण्यात आलं होतं. 11 आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला होता.

याआधीही ऑक्टोबर 2013 मध्ये लालू यादव यांना दुसऱ्या एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. ते 38 कोटी रुपयांच्या हेराफेरीचं प्रकरण होतं.

कोर्टाच्या त्या निर्णयामुळे लालू यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली. सुप्रीम कोर्टानं त्यांना जामीन दिला होता. मात्र त्यापूर्वी त्यांना दोन महिने तुरुंगात काढावे लागले होते.

झारखंड हायकोर्टानं 2014 मध्ये लालू प्रसाद यादव आणि इतरांना या प्रकरणात दिलासा देत गुन्हेगारी कटाचा आरोप काढून टाकला होता.

लालू प्रसाद यांच्यावर आणखी काही प्रकरणात आरोपी करण्यात आलं आहे. त्यात 900 कोटींचा चारा आणि बनावट औषधांच्या घोटाळ्याचा समावेश आहे. CBIनं 1996मध्ये या प्रकरणांची चौकशी सुरू केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)