You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्मृती इराणी गुजरातच्या मुख्यमंत्री होतील का?
- Author, अभिमन्यू कुमार साहा
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
गुजरात निवडणुका संपल्या. भाजपनं 99 जागांवर विजय नोंदवला आहे. भाजपनं निवडणुकीचं युद्ध जिंकलं आहे. पण सिंहासनावर कोण बसणार यासाठी मात्र अंतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे.
मुख्यमंत्रिपदी कोण बसणार या चर्चेला उधाण आलं आहे. कोण मुख्यमंत्री होईल याचे अंदाज बांधले जात आहे. राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल हे दोन जण ठरवतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हेच ठरवतील की, गुजरातचा मुख्यमंत्री कोण होईल.
विजय रुपाणी हेच गुजरातचे मुख्यमंत्री होतील असं अमित शहा यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केलं होतं. पण आता परिस्थिती बदलली आहे.
"भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. या गोष्टीची किंमत भाजपला चुकवावी लागू शकते. मुख्यमंत्र्याची निवड होण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार भाजपला करावा लागणार आहे," असं गुजरातमधले ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दयाल यांचं म्हणणं आहे.
दयाल यांचं म्हणणं आहे की, "रुपाणी हे जैन समाजाचे आहेत. गुजरातमध्ये जैन समाजाचं संख्याबळ हे केवळ दोन टक्के आहे. दुसरी गोष्ट अशी की सौराष्ट्रात भाजपची कामगिरी खूपच निराशाजनक झाली आहे."
"पुढचं नुकसान टाळण्यासाठी मुख्यमंत्री सौराष्ट्राचा आणि पाटीदार समाजाचा व्हावा असा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो," असं दयाल म्हणतात.
"भाजपच्या वर्तुळात स्मृती इराणी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे," असं देखील प्रशांत दयाल यांचं म्हणणं आहे.
"ज्यावेळी भाजपला कोणत्याच जातीच्या नेतृत्वाकडं मुख्यमंत्रीपद सोपवण्याची इच्छा नसेल त्यावेळी ते स्मृती इराणींच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकतात असं भाजपच्या आतील सूत्रांनी आपल्याला म्हटलं आहे," असं दयाल यांनी सांगितलं.
गुजरातमध्ये असं नेहमी होतं. पाटीदार समाजाला त्यांच्याच समाजाचा नेता हवा असतो तर ठाकोर समाजाला त्यांच्या समाजाचा नेता मुख्यमंत्री म्हणून हवा असतो.
"एका गटाचा नेता मुख्यमंत्री झाला तर दुसरा गट नाराज होऊ शकतो. हे टाळायचं असेल तर स्मृती इराणींच्या नावाचा विचार होऊ शकतो," असं दयाल म्हणतात.
व्होट बॅंकेच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर हे दोन्ही समाज महत्त्वाचे आहे. जर स्मृती इराणींना मुख्यमंत्री केलं तर हे समाज नाराज होणार नाहीत. जेव्हा आनंदीबेन यांना बाजूला करून विजय रुपाणी यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं होतं तेव्हा हाच विचार करण्यात आला होता.
रुपाणी यांच्या नावाआधी नितीन पटेलांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. पण आनंदीबेन पटेला यांच्यानंतर पुन्हा पटेल समाजाचाच मुख्यमंत्री झाला असता तर इतर समाजाची नाराजी ओढवून घ्यावी लागली असती. ते भाजपला नको होतं म्हणूनच त्यांनी विजय रुपाणी यांना मुख्यमंत्री केलं होतं.
स्मृती इराणीच का?
पण अचानकच स्मृती इराणींच्या नावाची चर्चा का? असं विचारलं असता प्रशांत दयाल सांगतात, "गुजरात विधानसभेमध्ये विरोधकांची संख्या वाढली आहे."
"अशा परिस्थितीत राज्य करणं ही तारेवरची कसरत ठरणार आहे. दुसरी गोष्ट अशी की काँग्रेसकडे आता 15 नवे चेहरे आले आहेत. तसंच अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणींसारखे फायरब्रॅंड नेते देखील आता विरोधी बाकांवर बसतील," असं दयाल सांगतात.
"अशा स्थितीमध्ये विरोधकांना सभागृहात आणि सभागृहाबाहेर टक्कर देणारा पॉवरफुल नेता हवा. स्मृती इराणी या एक चांगला पर्याय ठरू शकतील असं म्हटलं जात आहे." असा दयाल यांचा अंदाज आहे.
मोदी यांच्याकडून संकेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्मृती इराणींच्या नावाला दुजोरा मिळेल का? असं विचारलं असता दयाल म्हणाले, "मोदींना मुख्यमंत्रिपदावर अशी व्यक्ती हवी आहे जिचं पक्ष आणि प्रशासन दोन्हीवर नियंत्रण राहील."
स्मृती इराणी या गुजरात्यांमध्ये लोकप्रिय आहेत का? असं विचारल्यावर दयाल म्हणाले, "इराणींना पाहण्यासाठी गर्दी तर होते पण त्या गुजराती नाहीत."
"गेल्या काही दिवसांपासून त्या गुजरातीमध्ये ट्वीट करत आहेत. मला वाटतं त्यांना मोदी आणि शहा यांच्याकडून काही संकेत मिळाले असावेत. त्यामुळे हा बदल झाला असावा," असं दयाल यांचं म्हणणं आहे.
2019 मध्ये भाजपाचं स्वप्न साकार करण्यासाठी स्मृती इराणी आपल्या जीवाचं रान करू शकतात.
अजून कोण आहे या स्पर्धेत?
या स्पर्धेत आनंदीबेन पटेल देखील आहेत. त्यांनी निवडणूक लढवली नाही पण त्या या स्पर्धेत आहे. रुपाणी यांच्या कारकीर्दीत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत घसरण झाली आहे.
जर पटेल नेत्याची निवड करायची असेल तर आनंदीबेन पटेल आणि नितीन पटेल यांचा विचार केला जाऊ शकतो. जर ओबीसी नेता मुख्यमंत्रिपदी बसवायचा असेल तर सध्या कर्नाटकचे राज्यपाल असलेले रुदाभाई वाला यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असं दयाल म्हणतात.
रुदाभाई वाला यांचं ओबीसी समाजात वजन आहे. तसंच ते सौराष्ट्र प्रांतातील आहे. या दोन्ही घटकांचा विचार केल्यास मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडू शकते.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)