You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रेस रिव्ह्यू : शिवसेनेनं डिपॉझिट वाचवण्याचे मशिन घ्यावं : शेलार
गुजरात विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. भविष्यात कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावे लागेल, अशी टीका त्यांनी केली आहे.
गुजरातमध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. काँग्रेसला मतं मिळाली म्हणून ज्यांना आनंद होतो, त्यांचा अंत काँग्रेसच्याच रस्त्यावर होईल, अशी टीकाही त्यांनी केली आहे. 'एबीपी माझा'नं हे वृत्त दिलं आहे.
'गुजरात मॉडेल डळमळले'
तर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या अग्रलेखात भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. 'गुजरात मॉडेल डळमळले' असं या अग्रलेखाचं शीर्षक आहे.
"भारतीय जनता पक्षाचा विजय होणार होता, पण बेभान होऊन नाचावे, इतका देदीप्यमान विजय खरोखरच मिळाला आहे का? हम करे सो कायदावाल्यांसाठी हा निर्वाणीचा इशारा आहे." अशी टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.
"गुजरात मॉडेल डळमळले आहे. ते 2019ला कोसळून पडू नये, हीच सदिच्छा," असं सुद्धा त्यात म्हटलं आहे.
विमान तिकीट रद्द करण्याचा दंड कमी होणार
प्रवासी विमान कंपन्यांनी तिकीट रद्द करण्याच्या नियमांत बदल करण्याची तयारी दर्शवली असल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे.
विमान कंपन्यांकडून तिकीट रद्द करताना मोठ्या प्रमाणावर शुल्क कापलं जातं, अशा तक्रारी आल्यानं नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं प्रवासी विमान कंपन्यांची कानउघाडणी केली होती, असंही या बातमीत म्हटलं आहे.
'दक्षिण आशियात अण्विक युद्धाचा धोका'
दक्षिण आशियात अण्विक युद्धाचा खरा धोका आहे, असं मत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासिर खान जांजुआ यांनी व्यक्त केलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे. इस्लामाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
"भारत मोठ्या प्रमाणावर धोकादायक शस्त्रास्त्र जमवत असून पाकिस्तानला पारंपरिक युद्धाची धमकी दिली जात आहे," असंही त्यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)