You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मुंबईने अनेकांना महान बनवलं आहे, पण मुंबईला कोणीच नाही!'
वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, असं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केलं.
एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतल्या घाटकोपरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "मुंबईतील उत्तर भारतीय तसेच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक हे मुंबईला महान बनवतात. त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला आहे."
"भाषा हे संपर्काचं साधन आहे. कारण भाषा माणसाला जोडते. त्यामुळं भाषा विवादाचं माध्यम होऊ शकत नाही. हा वाद निर्माण करणं चुकीचं आहे. मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये."
या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना विचारलं होतं की मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटत. या चर्चेला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यातल्याच काही या निवडक प्रतिक्रिया.
ललीत पाटील म्हणतात की, "तुम्ही असं म्हणताय कारण महाराष्ट्राला महान करण्याची क्षमता तुमच्यात नाहीये, म्हणूनच तुम्ही असं बोलताय."
"मराठी माणूस सध्या सुस्त अजगरासारखा पडला आहे. हा सुस्तपणाच महाग पडणार हे नक्की," असं मत व्यक्त केलं आहे शशांक मंडलिक यांनी.
निहार तांबडे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहीतात, "तुम्ही परप्रांतीयांनी फक्त परप्रांतीय बनून राहण्यात धन्यता मानली. महाराष्ट्राने तुम्हाला संधी दिली. बाकी काही नाही किमान प्रामाणिक धन्यवाद जरी दिले असते, तरी तुम्ही खाल्ल्या मिठाला जागलात अशी भावना आमच्या मनात तयार झाली असती, पण तसं झालंच नाही. महाराष्ट्राच्या मातीत वाढलात पण तुम्ही महाराष्ट्र कधी स्वतःमध्ये रुजूच दिला नाही."
"मुंबईला कोणी महान बनवलेलं नाही पण मुंबईने मात्र अनेकांना महान बनवलं आहे. मुंबई सर्वांना समान लेखते व सर्वांनाच समान संधी देते, हे मुंबईचं मोठेपण. मराठी मन मोठे आहे म्हणूनच मुंबईत सर्वप्रांतीय लोक सुखाने नांदत आहेत," असं मत मांडलं आहे राजू तुलालवार यांनी.
पराग बुटाला लिहितात, "मुख्यमंत्रीसाहेब आपली प्रतिमा स्वच्छ, सुशिक्षित, सुसंस्कृत अशी आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य आपल्याला शोभत नाहीत. आपण असे विधान करून मराठी मनाला दुखावले आहे."
खुशल बडगुजर विचारतात, हे नक्की महाराष्ट्राचेच मुख्यमंत्री आहेत ना?
शुभम भारत यांचं मतं मात्र थोडं वेगळं आहे. "महाराष्ट्राचं सामाजिक, राजकीय, आणि सांस्कृतिक वातावरण नेहमीच पुरोगामी राहिलेलं आहे. महाराष्ट्रातलं वातावरण सहनशील आहे आणि त्यामुळे इतर भाषिक लोकांना महाराष्ट्रात स्थलांतर करायला सोपं जातं. हीच गोष्ट महाराष्ट्राला गुजरात किंवा बंगलोरपेक्षा वेगळं बनवते," अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे.
शशांक एच यांनी ट्वीट केलं आहे की, "हे लोक अजूनपर्यंत यांचा राज्याला महान का नाही बनवू शकले? का ती महान राज्ये अजून 'बिमारू' म्हणून ओळखली जातात? त्या महान लोकांचा राज्यात पोटापाण्याची चांगला व्यवस्था नाही?"
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)