काश्मीरच्या केशर शेतीला कमी पावसाचा फटका, 2 अब्ज रुपयांचं नुकसान?

    • Author, माजिद जहांगीर
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

काश्मीरच्या पंपोर भागात केशराची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी यावर्षी निराशा आहे. कमी पावसामुळे ही परिस्थिती ओढवल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

काश्मीरच्या पंपोर भागात अंदाजे 20,000 लोक केशराच्या शेतीवर अवंलबून आहेत. दरवर्षी नाजूक फुंलांमधून मिळणाऱ्या या दुर्मिळ आणि महाग पदार्थाचा रंग यंदा कमी पावसानं फिका पडला आहे.

केशराच्या शेतात दूर-दूरपर्यंत फुलं दिसेनाशी झाली आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून इथं पाऊसच पडलेला नाही. म्हणून यावर्षी केशरचं उत्पादन फक्त पाच टक्केच झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात केशर तयार होतं. आम्ही शेतात गेलो तेव्हा तिथं काही मुली ही फुलं शोधत होत्या. पण त्यांनाही काहीच हाती आलं नाही.

सईद खुर्शीद अहमद हे केशराचे पिढीजात शेतकरी. याबद्दल बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती.

"दरवर्षी केशराचं उत्पन्न घटत चाललं आहे. 2013 मध्ये माझ्या जमिनीतून 200 तोळे केशर निघालं होतं. 2014 मध्ये उत्पन्न 60 तोळ्यांनी घटलं. 2015 मध्ये 90 तोळे उत्पन्न झालं. 2016 मध्ये 60 तोळे उत्पन्न झालं तर 2017 मध्ये त्याहून कमी उत्पन्न झालं."

"ज्या व्यक्तीकडे 100 तोळे केशर उगवायचं, आता त्याच्याकडे दोन-चार तोळ्यांचं उत्पन्न होतं. याचं मुख्य कारण पाणी आहे. आता तर अल्लाहनं पाऊस पाडणं पण बंद केलं आहे."

"माझं कुटुंब केशरावरच अवलंबून आहे. घरातले सर्वजण हाच व्यवसाय करतात. सरकारनं काहीतरी भरपाई दिली पाहिजे," असं खुर्शीद म्हणतात.

शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

"2017 हे वर्ष केशरसाठी खूप खराब होतं. गेल्या चार महिन्यांपासून भयंकर दुष्काळ पडल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे," असं जम्मू आणि काश्मीर केशर संघाचे अध्यक्ष अब्दुल माजिद म्हणतात.

"पाऊस नसल्यामुळे केशर पूर्णपणे संपलं आहे. काही ठिकाणी पाण्यासाठी ट्युबवेल लावण्यात आले होते. पण त्यानं काही फायदा झाला नाही. केशर उत्पन्नासाठी सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असणं आवश्यक आहे," असं माजिद म्हणतात.

ते पुढे सांगतात, "केशराचं उत्पादन वाढावं म्हणून सरकारनं 2010 साली 400 कोटी रुपये गुंतवून 'नॅशनल सॅफ्रन' योजना सुरू केली होती. डबघाईला आलेल्या केशर उद्योगाला चालना देणं हे 'नॅशनल सॅफ्रन' मिशनचं उद्दिष्ट होतं. पण सात वर्षं झाली तरी या योजनेच्या उद्दिष्टांची पूर्तता झाली नाही."

"एकट्या पंपोर भागात अंदाजे 17 मेट्रिक टन केशरचं उत्पादन व्हायचं. पण या वर्षी तर फक्त दोन-चार टक्केच उत्पादन झालं."

"काही ठिकाणी तर शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलं नाही. या दुष्काळामुळं जवळपास दोन अब्ज रुपयांचं नुकसान झालं आहे," असं माजिद म्हणतात.

"शेतकऱ्यांची स्थिती फारचं हलाखीची आहे. शेतकऱ्यांनी लावलेली गुंतवणूक परत देखील आली नाही."

माजिद म्हणतात, "एक काळ असा होता की कोणी नोकरीचा विचारही करत नव्हतं. पण आता उत्पादन कमी झाल्यामुळं नवी पिढी हा व्यवसाय सोडून जात आहे."

ते पुढे सांगतात, "अफगाणिस्तानातला केशर उद्योग काश्मीरपेक्षा जास्त तेजीत आहे. अफगाणिस्तानमध्ये सिंचनाच्या जास्त सुविधा उपलब्ध आहेत. जर त्यांच्याप्रमाणे आपल्याकडे सुविधा उपलब्ध झाल्या तर आम्ही पण मागं राहणार नाहीत."

आकडेवारी अजून पूर्ण नाही

काश्मीर विभागाचे कृषी संचालक अल्ताफ अजाज अंद्राबी सांगतात, "या वर्षी नेमकं किती नुकसान झालं, याबाबतची आकडेवारी आमच्याकडे अजून उपलब्ध नाही. ही आकडेवारी गोळा करण्याचं काम सुरू आहे."

"पण या वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे उत्पादन कमी होईल, असा माझा अंदाज आहे."

"केशराच्या चांगल्या उत्पादनासाठी पाऊस चांगला पडून जमिनीत ओल राहणं अत्यावश्यक आहे. जर जमीन ओली असेल तरच फुलं निघतात अन्यथा निघत नाहीत. यावर्षी तर पावसाचा एक थेंबही पडला नाही," असं अंद्राबी म्हणाले.

सरकारी आकड्यांनुसार गेल्या वर्षी काश्मीरमध्ये केशराचं उत्पादन 17.64 टन झालं होतं.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)