सोशल - 'आता मन की बात नाही चालणार, चर्चा तर झालीच पाहिजे'

एरवी प्रत्येक गोष्टीवर ट्वीट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल काहीच बोलत नाहीत. त्यांचं मौन हेच पुरेसे बोलके आहे. विचारवंतांच्या हत्या, गोमांस-गोरक्षणाचा मुद्दा असो किंवा चित्रपटांना विरोध, अशा असहिष्णुतेला पंतप्रधानांची मूकसंमती तर नाही ना? असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केला.

याच विषयावर बीबीसी मराठीनं सोशल मीडियावर वाचकांना आपलं मत विचारलं होतं.

त्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. त्यात काहींनी पृर्थ्वीराज चव्हाण बरोबर बोलत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत, आम्हाला काँग्रेस नको असं म्हटलं आहे.

अॅड. संजय रणपिसे म्हणतात, "आता मन की बात नाही चालणार, चर्चा तर झालीच पाहिजे."

तर मोदी फक्त बोलत नाही, ते प्रश्न सोडवून देतात, असं मत मोहित कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे.

हेमंत बोरकर म्हणतात, "मौनम् सर्वार्थं साधनम्" हा मोदींचा गुरू मंत्र असावा.

"काँग्रेसच्या काळात अनेक असहिष्णुतेच्या घटना घडल्या. पण त्यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मौन सोडले नव्हतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहिष्णुतेला बाधा आणणाऱ्या घटनेचा एका आवाजात विरोध केला पाहिजे. पण दुर्दैवानं तसं होत नाही." असं मत लक्ष्मीकांत मुळे यांनी मांडलं आहे.

हर्षल नाईक म्हणतात, असं असलं तरी आमचा मोदींनाच पाठिंबा आहे आणि आम्हाला मोदीच हवेत.

पारस प्रभात यांनी सविस्तरपणे त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात,"जनतेच्या मनातील 'मन की बात' ऐकायला वेळ नाही. देशात जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा त्या घटनेच्या दोन बाजू असतात. पहिली बाजू त्या घटनेच्या समर्थनाची आणि दूसरी बाजू विरोधाची. जर देशातील काही मूठभर लोक संस्कृती रक्षणाच्या नावाखाली विशिष्ट लोकांना वेठीस धरत असतील तर ते चुकीचे आहे हे सांगण्याची हिम्मत त्यांनी दाखवली पाहिजे."

आशिष सोनावणे यांनी तर पंतप्रधान मोदींना नाटकी म्हटलं आहे. त्या उलट अमित कुलकर्णी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधत मोदींची पाठराखण केली आहे.

तर दादाराव पंजाबराव म्हणतात, "मोदी खोटे आकडेवारी देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. म्हणून तर आता गुगलवर 'फेकू' म्हटलं की त्यांचंच नाव दिसतं."

हे वाचलं का ?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)