सोशल - 'आपण अजूनही जातीतच माती खातोय आणि महासत्ता होण्याची स्वप्नं बघतोय'

फोटो स्रोत, BBC
संजय लिला भन्साळी यांच्या 'पद्मावती' या बिग बजेट हिंदी चित्रपटाला कडाकडून विरोध होत असताना आता 'न्यूड' आणि 'दशक्रिया' या मराठी चित्रपटांनाही विरोध होऊ लागला आहे.
हिंदू धर्मातील रूढी परंपरेबाबत या चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. नुकतच या चित्रपटाचं ट्रेलर रिलीज झालं आहे. त्यामुळे वादळ उठलं आहे.
'दशक्रिया' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटाविरोधात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ उभा ठाकला आहे. हा चित्रपट ब्राह्मणांची आणि हिंदू प्रथा-परंपरांची बदनामी करणारा असून त्याच्या प्रदर्शनाला मनाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.
हा चित्रपट राज्य सरकारच्या साहित्य आणि संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष आणि लेखक बाबा भांड यांच्या "दशक्रिया' या कादंबरीवर आधारित आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि मनोज जोशी यामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. तर दिग्दर्शक संदीप पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
दरम्यान, याच विषयावर बीबीसी मराठीनं सोशल मीडियावर वाचकांना आपलं मत विचारलं होतं.
त्यावरून सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेचा हा आढावा. यामध्ये अनेकांनी चित्रपटाला पाठिंबा देत जातीय समूहाची सेन्सॉरशीप अत्यंत चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तसंच, अनेकांनी #Support_दशक्रिया हा हॅशटॅगही वापरला आहे.

फोटो स्रोत, Samruddha
विवेक दिवे यांनी तर थेट सरकारवर निशाणा साधला आहे. "पद्मावती जातीबंधनात अडकला आहे. गुजरात निवडणूक नसती तर थोडा विरोध झाला असता पण चित्रपट तर प्रदर्शित झाला असता. दशक्रिया चित्रपटाला फक्त ब्राह्मणांचा विरोध आहे, हिंदूचा नाही. सरकार ब्राह्मणशाहीचं नसतं तर हा चित्रपट मोठ्या प्रमाणात रिलीज झाला असता.", असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK
उमेश इतराज म्हणतात, "चित्रपट हा फक्त मनोरंजनासाठी असतो, त्याला इतकं गंभीर्याने घेण्याची गरज नाही. आणि चित्रपटाच्या सुरूवातीला 'Disclaimer' (सूचना) दिल्या असतात की." त्यावर संकेत पाटणकर यांनी विरोध करणाऱ्यांवर खरमरीत टीका केली आहे. ते म्हणतात, "विरोध करणाऱ्यांना जर लिहिता वाचता आलं असतं तर आपण त्यांच्याकडून या सूचना वाचण्याची किमान अपेक्षा केली असती."

फोटो स्रोत, FACEBOOK
"चित्रपट प्रदर्शित व्हावा की नाही याचे अधिकार फक्त सेन्सर बोर्डकडे आहे. त्यांचा निर्णय मान्य करावा, नाहीतर ही लोकशाही नसून हुकूमशाही आहे, असे म्हणावे लागेल", असं मत संकेत पाटील यांनी मांडलं आहे.
तर समीर लाड यांनी चित्रपटावर बंदी घालण्याऐवजी त्यातला चुकीचा भाग वगळून तो रिलीज केला पाहिजे का? असा प्रश्न विचारला आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK
डॉ.विशाल पाटील म्हणतात, "आता यांच्याच विचारांची दशक्रिया करायची वेळ आली आहे, विरोध कुठेतरी वैचारिक हवा."

फोटो स्रोत, FACEBOOK
भारतीयांना चित्रपट माध्यमाविषयी अधिक प्रगल्भ करण्याची गरज असल्यांच मत पराग बुताला यांनी व्यक्त केलं आहे. तर सुनील शेवरे यांनी, "जे खरं आहे ते बाहेर आलच पाहिजे", असं म्हटलं आहे.
महिंद्र बनसोडे यांनी मेधा खोले प्रकरणाचा दाखला देत विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. ते म्हणतात, "खोले बाईंच्या स्वयंपाकाच्या वेळी आम्ही मराठा-बहुजन असतो. अन दशक्रिया चित्रपटावेळी आम्ही हिंदू होतो, वा रे भटनीती."

फोटो स्रोत, Facebook
मयुर अग्नीहोत्री यांनी मात्र "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून संपूर्ण समाजाच्या भावना दुखावणं चुकीचं आहे." असं म्हंटलं आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK
"आपण अजूनही जातीतच माती खातोय. आणि महासत्ता होण्याची स्वप्नं बघतोय," अशी प्रतिक्रिया प्रथमेश पाटली यांनी दिली आहे. तर मोहित कुलकर्णी म्हणतात, "फिल्म रिलीज होण्याधीच विरोध करणं चुकीचं आहे."
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








