पद्मावती प्रदर्शित केलात तर दीपिका पदुकोणचं नाक कापू : राजपूत कर्णी सेनेचा इशारा

"पद्मावती चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तर आम्ही दीपिका पदुकोणचं नाक कापू," असा इशारा राजपूत कर्णी सेनेनं दिल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

'पद्मावती'मध्ये दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात दीपिकाचं नृत्य देखील आहे. त्या नृत्यावरही कर्णी सेनेनं हरकत घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

याआधी संजय लीला भन्साळी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न देखील झाला आहे. जर राजपूतांच्या महिलांचा योग्य सन्मान ठेवला नाही तर शूर्पणखेप्रमाणं आम्ही दीपिका पदुकोणचं नाक कापू असं कर्णी सेनेच्या महिपाल सिंह मकराना यांनी म्हटलं आहे.

राज्य प्लास्टिकमुक्त करण्याच्या दिशेनं महाराष्ट्र शासनाचं पाऊल

पर्यावरणाची हानी थांबावी म्हणून राज्य प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं एका बैठकीत घेतल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, कप, प्लेट्स, बाटल्या इत्यादींच्या उत्पादनांवर तसेच वापरावर पूर्णपणे बंदी आणण्याचा निर्णय पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायद्यातील नियमांमध्ये सुधारणा करून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

50 मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिक पिशव्यावर बंदी घालण्याच्या निर्णयावर तातडीनं अंमलबजावणी करण्यात यावी, असं बैठकीत म्हटलं आहे.

त्यापुढच्या टप्प्यात सर्व प्रकारच्या प्लास्टिक वस्तूंच्या उत्पादनावर व वापरावर बंदी आणली जाणार आहे. मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमधून पाण्याच्या बाटल्या वापरण्यावर बंदी येणार असल्याचं लोकसत्तानं म्हटलं आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळं मुंबई पाण्याखाली येईल : नासाचा इशारा

ग्लोबल वॉर्मिंगमुळं हिमनग वितळून मुंबई, न्यूयॉर्क आणि इतर मोठी शहरं पुढील 100 वर्षांत पाण्याखाली येतील, असा इशारा नासानं दिला आहे.

पुढील 100 वर्षांमध्ये मुंबईच्या समुद्राची पातळी 15.26 सेमीनं वाढेल, असं नासानं म्हटल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं म्हटलं आहे.

त्याचबरोबर कर्नाटकातील मंगलोर आणि आंध्र प्रदेशातील काकीनाडा या शहरांना देखील ग्लोबल वॉर्मिंगमुळं धोका निर्माण होणार आहे, असं नासानं म्हटलं आहे. मंगलोरच्या समुद्राची पातळी 15.98 सेंमीनं वाढेल असा धोक्याचा इशारा नासानं दिला आहे.

ग्रेडियंट फिंगरप्रिट मॅपिंग या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं हा अभ्यास करण्यात आला आहे. जगातील 293 शहरांना हा धोका आहे, असं या अभ्यासात म्हटलं आहे.

हर हर महादेव! : पॉर्नला आळा घालण्यासाठी BHUचं नवं अॅप

इंटरनेटवर ब्राउजिंग करताना स्पॅम आणि जाहिरातीच्या माध्यमातून पॉर्न वेबसाइट उघडल्या जातात. यामुळं अनेकदा लोकांवर लाजिरवाणा प्रसंग ओढवतो.

हा धोका लक्षात घेऊन बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) च्या न्यूरॉलॉजी विभागानं एक अॅप्लिकेशन तयार केलं आहे, असं वृत्त नवभारत टाइम्सनं दिलं आहे.

सर्फिंग करताना एखादी अनावश्यक वेबसाइट उघडली तर भजन सुरू होऊन तुम्हाला सूचना मिळते. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्या सिस्टीमवर पॉर्न, हिंसेचा संदेश देणाऱ्या वेबसाइट उघडणार नाहीतस असं या अॅपच्या निर्मात्यांचं म्हणणं आहे.

अॅप निर्मात्यांनी 3800 वेबसाइट्सची यादी केली आहे. यापैकी एखादी साइट उघडण्याचा प्रयत्न केल्यास किंवा गुगल सर्च करताना जर काही विशिष्ट कीवर्ड टाकले तर भजन सुरू होईल.

न्यूरॉलॉजी विभागाच्या डॉ. विजयनाथ मिश्रा आणि त्यांच्या टीमनं हे अॅप तयार केलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)