प्रेस रिव्ह्यू : अण्णा हजारे म्हणतात 'पंतप्रधान झालो तर देश दारूमुक्त करेन'

"भारतीय संविधानानं किंवा इतर कोणत्या कायद्यानं दिल्लीला देशाची राजधानी म्हणून दर्जा दिला आहे का?" असा प्रश्न अरविंद केजरीवाल सरकारने मंगळवारी सुप्रीम कोर्टात उपस्थित केला.

'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारची बाजू ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, ए. के. सिक्री, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि अशोक भूतान, या पाच न्यायामूर्तींच्या बेंचसमोर मांडली.

"दिल्ली ही भारताची राजधानी असल्याचा कोणताही संदर्भ संविधानात किंवा इतर कायद्यात नाही. 'नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अॅक्ट' अस्तित्वात आहे. पण त्यातही दिल्लीला राजधानीचा दर्जा देण्यात आलेला नाही. त्यामुळं पुढे चालून केंद्र सरकार देशाची राजधानी इतर कुठेही हलवू शकतं," असं जयसिंग म्हणाल्या.

जयसिंग म्हणाल्या की, "हा प्रश्न मोठा आहे कारण दिल्लीवर नेमका कोणाचा हुकूम चालावा - दिल्ली सरकारचा की केंद्र सरकारचा, हे यावरूनच स्पष्ट होईल. दिल्ली आणि केंद्र सरकारमध्ये कार्यकारी अधिकारांची विभागणी झाली पाहिजे, जेणेकरुन दिल्ली सरकारला व्यवस्थितपणे काम करता येईल."

त्यांच्या या भूमिकेवर न्यायामूर्तींच्या बेंचनं प्रतिक्रिया देण्याचं टाळलं.

यावर संविधानात अधिकारांची विभागणी ही केंद्र, राज्य आणि सामायिक पातळीवर करण्यात आली आहे. त्यानुसार कायदे करण्याचा आणि अंमलबजावणीचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकारला आहे.

तसंच काही ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकार दोघांची भूमिकाही लक्षात घ्यावी लागते, अशी सर्वोच्च न्यायालयाने प्रतिक्रिया दिल्याचा बातमीत उल्लेख करण्यात आला आहे.

'पंतप्रधान झालो तर देश दारूमुक्त करेन'

मंगळवारी भावी पत्रकारांच्या बालचमूने ज्येष्ठ समाजसेवक आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेते अण्णा हजारे यांना सवाल केला - 'तुम्ही पंतप्रधान होणार की नाही?'

त्यावर उत्तर देताना अण्णा म्हणाले, "मी पंतप्रधान होणार नाही. फकिराला कोण पंतप्रधान करणार? पण झालोच तर देश भ्रष्टाचार आणि दारूमुक्त करेल."

'लोकमत'ने या संदर्भात बातमी दिली आहे..

"मला आयुष्यात कोणाचीही भीती वाटली नाही. अगदी सीमेवर गोळीची सुद्धा. पण आईला जाम घाबरायचो. चुकलो तर आई काय म्हणेल, याची चिंता असायची," असंही त्यांनी या बालचमूला सांगितल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

रसगुल्लाबंगालचाच!

अनेक वर्षांपासून दोन राज्यांमध्ये चालत आलेला एक 'गोड' वाद अखेर मंगळवारी संपुष्टात आला. रसगुल्ला हा पश्चिम बंगालचाच, असं भौगोलिक ओळखीचं मानांकन (जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग किंवा GI टॅग) मिळालं आहे.

एखाद्या वस्तूची किंवा पदार्थाची भौगोलिक ओळख, तिचा उगम किंवा तिचं सर्वांत महत्त्वाचं ठिकाण कोणतं, हे GI टॅग सांगतो.

यामुळे रसगुल्ल्याचा जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला की ओडिशा या वादावर पडदा पडल्याची बातमीची 'दिव्य मराठी'ने दिलं आहे.

रसगुल्ल्याचा जन्म ओडिशात झाल्याचे सांगत त्या राज्याने 2015 मध्ये GI टॅगसाठी दावा दाखल केला होता.

मात्र पश्चिम बंगालने यावर आक्षेप नोंदवत रसगुल्ला बंगालचा असल्याचं म्हटलं होतं. नंतर दोन्ही राज्यांनी आपापली समिती स्थापन करून इतिहास शोधण्याचं काम केलं.

GI टॅगसंबंधी निकाल देणाऱ्या चेन्नईतल्या समितीने दोन्ही राज्यातील समित्यांचं म्हणणं ऐकून पश्चिम बंगालच्या बाजूने निकाल दिला, असं बातमीत नमूद करण्यात आलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)