You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'त्या व्हीडिओमधला माणूस हार्दिक पटेल असला तरी काय झालं?'
- Author, रॉक्सी गागदेकर छारा
- Role, बीबीसी गुजराती
गुजरात निवडणुकांच्या प्रचाराचं वारं जोरात वाहत असताना एक व्हीडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हीडिओमध्ये एका महिलेसोबत दिसणारी व्यक्ती म्हणजे पाटीदार समाज आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे.
पाटीदार समाज आंदोलनातील भाग घेतलेल्या अश्विन पटेल यांनी सोशल मीडियाच्या या मताला दुजोरा दिला आहे. पण हार्दिक पटेल यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. तसंच निवडणुकीसाठी महिलेचा वापर करणं निंदनीय असल्याचं हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे.
व्हीडिओतील व्यक्ती हार्दिक पटेल आहे की नाही यावर गदारोळ सुरू असतानाच काही लोक असंही म्हणत आहेत, की हे त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे. राजकीय फायद्यासाठी कथित सेक्स टेप प्रकरण उजेडात आणण्याची पद्धत जुनीच आहे असं देखील म्हटलं जात आहे.
"ही बातमी चर्चेत आल्यावर मला काही आश्चर्य वाटलं नाही. प्रादेशिक राजकारणात कथित सेक्स टेप प्रकरणाचा याआधीही वापर करण्यात आला आहे," असं मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक घनश्याम शहा यांनी मांडलं आहे.
"या व्हीडिओमुळं हार्दिक पटेल यांच्यावर काही परिणाम होण्याऐवजी त्या महिलेचा अनादर झाला आहे," असंही शहा यांनी म्हटलं.
महिलांनी केला निषेध
बीबीसी गुजरातीनं काही महिला नेत्यांशी आणि समाजशास्त्रज्ञांशी चर्चा केली. एका महिलेशी नातं असणं हा राजकीय चर्चेचा विषय आणि निवडणुकीचा मुद्दा ठरू शकतो का, असा प्रश्न महिला विचारत आहेत. सर्वच पक्षातील महिलांनी या कथित सीडीला राजकीय मुद्दा बनवण्याचा निषेध केला आहे.
आम्ही महिलांचं रक्षण करतो असं म्हणण्याचा नैतिक अधिकार कोणत्याही पक्षाला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अशा व्हीडिओमुळं कोणत्याही राजकीय पक्षाला दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही असं त्या म्हणाल्या.
"अशा व्हीडिओंमुळं महिलांचं मनौधैर्य कमी होईल आणि त्यांना राजकीय प्रवेशासाठी अडचणी निर्माण होऊ शकतील," असं मत गुजरात विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख आनंदीबेन पटेल यांनी मांडलं आहे.
"या व्हीडिओमुळं महिलांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला आहे. हा व्हीडिओ म्हणजे महिलांचा अपमान आहे," असं गुजरात महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सोनल पटेल दत्ता यांनी म्हटलं.
"जर कथित व्हीडिओमध्ये असणारी व्यक्ती जरी हार्दिक पटेल असेल तर काय झालं? हार्दिक पटेलांचा विरोधच करायचा असेल तर त्यांनी काही ठोस मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी," असं दत्ता यांचं म्हणणं आहे.
"जर त्यांनी भ्रष्टाचार केला असेल किंवा काही बेकायदा कृत्य केलं असेल तर ते विरोधकांनी शोधावं. पण महिलेचा वापर करून राजकारण करणं अयोग्य आहे," असं दत्ता यांनी म्हटलं आहे.
महिला भाजप नेत्याही वैतागल्या
हा व्हीडिओ म्हणजे भाजपचं षड्यंत्र आहे असा आरोप हार्दिक पटेल यांनी केला आहे.
पण राजकीय स्वार्थासाठी एखाद्याचं नाव महिलेसोबत जोडून भांडवल करणं अयोग्य आहे, असं भाजप नेत्या जसूबेन कोराट यांनाही वाटतं.
"एखाद्या महिलेशी संबंध असल्यामुळं एखाद्या व्यक्तीला लक्ष करणं अयोग्य आहे असं त्या म्हणाल्या. पक्ष कोणताही असो अशा गैरमार्गाचा अवलंब करणं स्वीकारलं जाणार नाही," असं त्यांनी म्हटलं.
"संबंधित व्हीडिओवर मे 2016 ही तारीख दिसत आहे. मग या व्हीडिओची चर्चा आताच का होत आहे?" असा सवाल त्यांनी केला.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)