You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रेस रिव्ह्यू - राजकीय व्यवस्था कधीच धर्मनिरपेक्ष असू शकत नाही : योगी आदित्यनाथ
धर्मनिरपेक्षता ही दांभिकता असल्याचं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
"स्वातंत्र्यानंतर सांगण्यात आलेला सर्वांत मोठं असत्य काय असेल तर ते म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे," असं ते म्हणाल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.
"धर्मनिरपेक्षतेमुळं देशाचं मोठं नुकसान झालं आहे. चुकीचा इतिहास लिहिणं हा देशद्रोह आहे," असं ते रायपूरमध्ये एका कार्यक्रमात म्हणाले.
"धर्मनिरपेक्षता या शब्दामुळं भारताच्या लोकांची फसवणूक झाली आहे. ज्या लोकांनी हा शब्द तयार केला आणि भारतात वापरला त्यांनी देशाची माफी मागायला हवी."
"राजकीय व्यवस्था कधीच धर्मनिरपेक्ष असू शकत नाही. ती पंथनिरपेक्ष असू शकते. जर कुणी असं म्हटलं की या एकाच उपासना पद्धतीनुसार प्रशासन चालायला हवं, तर त्यास माझा विरोध राहील. पण राजकीय व्यवस्था धर्मनिरपेक्ष असते असं मी म्हणणार नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं.
"उत्तर प्रदेशमध्ये 22 कोटी लोक आहेत. त्या सर्वांच्या भावनांचा आदर ठेवावा लागेल. पण कुणा एका पंथावर अन्याय झालेलं देखील मला चालणार नाही," असं ते म्हणाले.
2028 पर्यंत भारत तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था
"2028 पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल," असं बॅंक ऑफ अमेरिका-मेरिल लिंच या संस्थेनी एका अहवालात म्हटलं आहे.
द इकोनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, भारत जपानला मागं टाकून 2028 मध्ये तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. 2019 पर्यंत भारत फ्रान्स आणि ब्रिटनला मागं टाकेल असंही भाकीत 'इंडिया २०२८ : द लास्ट ब्रिक इन द वॉल' या अहवालात करण्यात आलं आहे.
नवी मुंबईत फिल्मी स्टाईल दरोडा
नवी मुंबईच्या जुईनगर भागात बॅंक ऑफ बडोदाच्या शाखेत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं पडलेल्या एका दरोड्यानं शहरात खळबळ उडाली आहे.
या बॅंकेशेजारील दुकानांपासून बॅंकेच्या लॉकर रूमपर्यंत एक भूयार खोदण्यात आलं होतं. मग 30 लॉकर्स तोडून त्यातून दागिने चोरण्यात आले, असं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.
शनिवार-रविवारी सुट्टी होती. या काळात हे भूयार खंदण्यात आलं आणि हा दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.
रायन इंटरनॅशनल मर्डर प्रकरणाला आणखी एक वळण
गुडगावच्या रायन इंटरनॅशनल शाळेमध्ये लहान मुलाच्या हत्येप्रकरणाला सोमवारी आणखी एक वळण मिळालं.
हरियाणा पोलिसांनी आधी स्कूल बस कंडक्टरला या चिमुकल्याच्या हत्येसाठी अटक केली होती. त्याने हत्या केल्याची कबूलीही दिली होती.
पण नंतर CBIने म्हटलं होतं की हत्या त्यानं केली नसून त्याच शाळेतल्या एका 11वीच्या मुलानं केली होती.
पण आता याही विद्यार्थ्याने ही हत्या आपण केल्याची कबूली दबावाखाली केल्याचं म्हटलं आहे.
सीबीआयचे अधिकारी आणि अल्पवयीन न्याय मंडळानं नियुक्त केलेल्या समितीसमोर त्या मुलानं हे वक्तव्य केलं आहे. "हा गुन्हा कबूल करण्यासाठी मला मारहाण करण्यात आली होती," असं त्यानं या समितीसमोर म्हटलं आहे.
त्याच्या या वक्तव्यावर सीबीआयने प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)