You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा व्हीडिओ : विशाखा धर्मपाल डबले - नागपूरच्या महिला हमाल कशा खेचत आहेत संसाराचं गाडं
- Author, गजानन उमाटे
- Role, बीबीसी मराठीसाठी, नागपूर
संसाराची जबाबदारी ही एखाद्या ओझ्यापेक्षा काही कमी नसते असं म्हटलं जातं. पण आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी नागपूरच्या या महिलेनं अक्षरशः ओझं उचललं.
पतीच्या मृत्यूनंतर खचून न जाता जिद्दीनं आपल्या कुटुंबाला सावरणाऱ्या विशाखा धर्मपाल डबले यांची कथा खूप अनोखी आहे. प्रेरणादायी आहे.
विशाखा आणि धर्मपाल यांचा संसार सुखानं सुरू होता. त्यांना तीन मुलं झाली. सर्व काही सुरळीत सुरू असताना धर्मपाल यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
धर्मपाल हे रेल्वे स्टेशनवर हमालीचं काम करत होते. प्रवाशांचं ओझं वाहत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि नियतीनं डबले कुटुंबीयांकडून सर्व काही हिरावून नेलं.
तीन मुलांसह संपूर्ण कुटुंब उघड्यावर आलं, मुलांवर उपासमारीची वेळ आली. काही काळ चार-चार दिवस मुलं उपाशी राहिली पण विशाखा खचल्या नाहीत.
मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी त्यांनी हमाल होण्याचा निर्णय घेतला. रेल्वेच्या ज्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या पतीचा मृत्यू झाला, त्याच नागपूर रेल्वे स्टेशनवर विशाखा यांनी हमाल म्हणून कामाला सुरुवात केली.
पण, हे काम काही एवढं सोपं नव्हतं. एक महिला म्हणून हमालीचं काम करताना त्यांना सुरुवातीला संघर्ष करावा लागला. पतीच्या नावावर असलेला हमालीचा बिल्ला स्वतःच्या नावावर करण्यासाठी त्यांना एक वर्ष झगडावं लागलं.
सुरुवातीला महिला हमाल म्हणून प्रवासी त्यांना काम देत नव्हते. कारण एखाद्या महिलेनं नागपूर स्टेशनवर हमाल म्हणून काम करण्याची ही पहिलीच वेळ होती.
इतर पुरुष सहकाऱ्यांच्या मदतीनं मात्र त्यांना काम मिळायला लागलं. हे काम सुरू करेपर्यंत कधी दळणही न आणणाऱ्या विशाखा डबले प्रवाशांच्या चार-चार बॅग डोक्यावर नेऊ लागल्या.
मुलांच्या उपासापुढे हा भार कमीच होता, असं त्या सांगतात. रोज मिळणाऱ्या २००-३०० रुपयांत त्यांनी काटकसर करून कुटुंब सावरायला सुरुवात केली.
"पतीच्या निधनानंतर काय करावं हे सुचत नव्हतं. पण मी ठरवलं की पतीच्या जागी आपण कामावर जायचं आणि मुलांचं शिक्षण पूर्ण करून पतीचं स्वप्न पूर्ण करायचं," असं विशाखा डबले सांगतात.
सचिन, समीर आणि सुमित ही त्यांची तीन मुलं, त्यातली दोन मुलं इंजिनिअर झाली, तर एक मुलगा मेकॅनीक आहे. आईच्या संघर्षाची मुलांना सुद्धा जाणीव आहे.
त्यांचा एक मुलगा सरकारी नोकरीत आहे. संसाराची घडी नीट बसली आहे. पण, त्यांनी आपलं काम सोडलं नाही. आजही नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर विशाखा हमाल म्हणून काम करतात.
१५ वर्षांच्या त्यांच्या या संघर्षांत सहकाऱ्यांनी त्यांना बहिणीप्रमाणं वागवलं. संघटनेच्या अध्यक्षांनी त्यांची कधीही नाईट शिफ्ट लावली नाही. त्यांना जास्तीत जास्त काम कसं मिळेल यासाठी रेल्वे स्टेशनवरचे सर्व हमाल त्यांची मदत करतात.
"विशाखाताईंचं आम्हाला सगळ्यांना फार कौतुक वाटतं. पती गेल्यावर त्या तुटल्या नाहीत. तर त्यांनी कुली होऊन काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी खूप मोठा संघर्ष केला आहे," असं हमाल संघटनेचे अध्यक्ष अब्दुल माजिद सांगतात.
"त्या महिला आहेत म्हणून कुणी त्यांच्याकडे ओझं देत नव्हतं. पण आम्ही लोकांना सांगत असू, ओझं दिलं तरी काही हरकत नाही. त्या काम करू शकतात. असा विश्वास दिल्यानंतर लोक त्याचं ओझं विशाखाताईंकडे सोपवत असत," माजिद सांगतात.
"जर घरातल्या कर्त्या व्यक्तीचं निधन झालं तर घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो हे खरं आहे. मी पण पेपरमध्ये वाचते की अचानक घरातल्या पुरुषाचं निधन झाल्यावर त्या कुटुंबाची परिस्थिती पूर्णपणे बदलते."
"त्यांना कुणी मदत करत नाही. तेव्हा अशा महिलांना माझं असं सांगणं आहे की तुम्ही खचून जाऊ नका आणि हिमतीनं परिस्थितीचा सामना करा," असा संदेश विशाखा इतर महिलांना देतात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)