You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : 'महाराष्ट्र काय बर्थडे केक आहे का? कोणीही येईल आणि विदर्भ कापून जाईल!'
विदर्भ आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय वेगळं राज्य घेणं योग्य होणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं.
निवडणुकीपूर्वी भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्याचं आश्वासन दिलं होतं. पण जवळपास तीन वर्षं झाल्यानंतरही भाजप सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबद्दल कोणतंही पाऊल उचललेलं नाही. त्यामुळे फडणवीस सरकारच्या भूमिकेबाबत विदर्भवाद्यांमध्ये संभ्रम आहे.
स्वतंत्र विदर्भाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी म्हणाले, "विदर्भातील शेतकरी सक्षम झाला पाहिजे. विदर्भात अनेक प्रकल्प सुरू आहेत. विदर्भ सक्षम झाल्याशिवाय वेगळं राज्य घेणं योग्य होणार नाही."
दरम्यान, बीबीसी मराठीने या विषयावर सोशल मीडियावर वाचकांच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या.
यावर अनेक वाचकांनी अखंड महाराष्ट्राचा नारा देत, पुढची निवडणूक तुम्हाला महागात पडेल, असा इशारा दिला आहे. तर काही वाचकांनी, "स्वतंत्र विदर्भासाठी 2019 ही डेडलाईन" असल्याचं म्हटलं आहे.
बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर आलेल्या अशाच काही निवडक प्रतिक्रिया:
अभीराम साठे म्हणतात, आपली राजधानी जर नागपूरला हलवली तर विदर्भ आपोआप सक्षम होईल. तर तुषार भगत म्हणतात, यांचा विकास खरच वेडा झाला आहे.
"आमचा महाराष्ट्र हा काय बर्थडे केक आहे का? कोणी पण येईल आणि कापून जाईल. हे कधीच होऊ दिलं जाणार नाही," अशी प्रतिक्रिया अमित काजबजे यांनी दिली आहे.
दादाराव अरुणाबाई पंजाबराव यांनी गडकरींना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत - "तुमचं महाराष्ट्राच्या विकासाशी काहीच घेणं देणं नाही. त्यामुळं कुठंतरी तुमचंच सक्षमीकरण आड येतंय, असं वाटतं. स्वतःची झोळी भरता भरता विदर्भ अन् महाराष्ट्राचा विसर पडलेले मंत्री म्हणून आपली अजरामर ख्याती राहील," असं ते म्हणतात.
"महाराष्ट्राच्या जीवावर हे सक्षम होणार आणि नंतर महाराष्ट्राची नाळ तोडणार. गरज सरो आणि वैद्य मरो. या लाभार्थ्यांना 2019 मध्ये नामशेष करायची वेळ आली आहे," अशी प्रतिक्रिया हेमंत बोरकर यांनी दिली आहे.
संदीप रायपुरे म्हणतात, "निवडणुकीपूर्वी पक्षाच्या जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भाचा विषय होता. तेव्हा विदर्भ सक्षम होता. आता द्यायची वेळ आली तर असक्षम. ही नीती बरी नव्हे. आधीच देशभरात पंतप्रधानासंदर्भात "फेकू" चर्चा सुरू आहे."
"आधीपासूनच भाजप विदर्भवादी राहिला आहे. त्यात नागपूर केंद्रस्थानी. हिंदी भाषिक सुद्धा भरपूर, त्यामुळे हा १०५ हुतात्म्यांचा अपमान वाटत नसावा त्यांना," अशी प्रतिक्रिया प्रथमेश पाटील यांनी दिली आहे.
"महाराष्ट्राची स्थापना होऊन 57 वर्षं झाली तरी अजून विदर्भ सक्षम झाला नाही, हे राजकीय नेते मंडळीचे अपयश आहे," असं मत पारस प्रभात यांनी व्यक्त केलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)