You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दृष्टिकोन : गुजरात निवडणुकीत काँग्रेसच्या तंबूत काय आहे वातावरण?
- Author, झुबैर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
यावर्षीच्या एप्रिल महिन्यात मी काही विशेष बातम्यांसाठी गुजरातच्या वेगवेगळ्या भागाचा दौरा केला. डिसेंबरमध्ये गुजरातच्या विधानसभा निवडणुका आहेत हे सगळ्यांच्याच मनात होतं, पण तरीही प्रत्यक्ष निवडणुकीचं वातावरण तयार व्हायला अवकाश होता.
असं असतानाही भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या सभा घेऊन निवडणुकांचा बिगुल वाजवला होता. जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या नेत्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याचे संदेश दिले जात होते. त्यांच्यापैकी काही जणांनी तर मला सांगितलं की, ते विधानसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहेत.
याउलट भाजपचा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र इथे जडत्व आल्यासारखी स्थिती होती. एकीकडे कमालीची उत्सुकता आणि दुसरीकडे कमालीचा सन्नाटा हा या दोन छावण्यांमधला विरोधाभास तेव्हा मला प्रकर्षाने जाणवला होता.
मी काही काँग्रेस आमदारांना भेटलो. त्यांच्या मते निवडणुकांच्या तयारीला भरपूर वेळ होता. पण भाजपचे आमदार मात्र निवडणुका अगदी तोंडावर आल्याची भाषा करत होते. असं वाटत होतं की ते आपापल्या मतदारसंघात जाऊन लगेच तंबू ठोकतील.
आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, 182 जागांसाठीची ही लढाई खरंच जवळ येऊन ठेपलीय. सरकार बनवण्यासाठी 92 जागांचा आकडा गाठण्याची गरज आहे.
ही निवडणूक गेल्या कित्येक वर्षांतली अटीतटीची निवडणूक असणार आहे यात काही शंका नाही आणि तरीही काँग्रेसला मागे टाकून भाजप गुजरातमध्ये जादुई आकडा गाठेल, अशी भावना सगळ्यांच्या मनात आहे.
कार्यकर्त्यांची फौज
भाजपने एप्रिल महिन्यातच निवडणुकीची जी तयारी सुरू केली आहे त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. पूर्ण राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांची फौज पसरली आहे. याउलट काँग्रेस अजून इथल्या ग्रामीण भागात त्यांची कार्यालयं उभारत आहे.
गुजरातमध्ये भाजप 1995 पासून स्वबळावर सत्तेमध्ये आहे. त्याआधी 1990 पासून ते जनता पक्षासोबत भागीदारीमध्ये सत्तेत होते. त्यामुळे भाजपला सत्तेवरून खाली खेचायचं असेल तर विरोधकांना खूप मोठी ताकद लावावी लागेल.
काँग्रेस, त्यांचे मित्रपक्ष आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी, ओबीसी नेते अल्पेश ठाकोर हे सगळे एकत्र आले तरीही हे कमीच आहे.
मोदी भाजपचं ट्रम्पकार्ड
नरेंद्र मोदी हे गुजरातच्या राज्याच्या राजकारणात एवढे सक्रिय नाहीत पण ते या निवडणुकीसाठी भाजपचं ट्रम्प कार्ड आहेत. ते गुजरातमध्ये अजूनही लोकप्रिय नेते आहेत. एका राष्ट्रीय पातळीवरच्या प्रसारमाध्यमाने केलेल्या सर्व्हेनुसार, गुजरातमध्ये 66 टक्के मतदारांनी त्यांना पसंती दिली आहे.
भाजपने गुजरातमध्ये 150 जागा मिळवण्याचं उद्दिष्ट ठरवलं आहे. पण एवढ्या लवकर तयारीला सुरवात करूनही भाजपसाठी हे उद्दिष्ट मोठं वाटतं.
निरीक्षकांच्या मतानुसार, भाजप गेल्या वेळच्या निवडणुकांमध्ये मिळवलेल्या 116 जागा राखू शकेल. पण आताच्या राजकीय वातावरणात एवढ्या जागा मिळवणंही भाजपसाठी मोठं यश म्हणावं लागेल.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)