You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इंग्लंड आणि आयर्लंडला ओफेलिया चक्रीवादळाचा तडाखा?
इंग्लंड आणि उत्तर आयर्लंडला ओफेलिया चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं धोक्याचा इशारा दिल्यानं उत्तर आयर्लंडमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
आयर्लंड सरकारच्या हवामान खात्यानं देशभरात रेड विंड अर्थात अतिधोक्याचा इशारा दिला आहे. हे चक्रीवादळ सोमवारी इंग्लंडच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता असून, तोपर्यंत त्याची तीव्रता कमी होणार आहे.
1987 मध्ये आलेल्या चक्रीवादळानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्वरुपाचं वादळ इंग्लंडच्या दिशेनं सरकत आहे.
अटलांटिक महासागरात एझोरस या ठिकाणी या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू असून ताशी 90 किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ मार्गक्रमण करत आहे.
चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असलेल्या वेक्सफोर्ड, गलावे, मायो, क्लेअर, कॉर्क, केरी, लिमरिक आणि वॉटरफोर्ड या भागांमधील लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे असं आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी सांगितलं.
अमेरिकेच्या राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्रानं या वादळाची कमी धोक्यासाठीच्या पहिल्या गटात नोंद केली आहे.
उत्तर आयर्लंडमध्ये वादळामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. जोरदार वारे वाहणार असून यामुळे मालमत्तेचं नुकसान होऊ शकते.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)