अनुपम खेर यांची FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती

अभिनेता अनुपम खेर यांची फिल्म अॅण्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (FTII) च्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. गजेंद्र चौहान यांच्या छोट्या आणि वादग्रस्त कारकिर्दीनंतर झालेल्या या नेमणुकीची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.

अनुपम खेर यांनी त्यांच्या नियुक्तीवर twitter वर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, या पदावर काम करायला मिळणं हा मी माझा सन्मान समजतो. मी निष्ठेनं काम करण्याचा प्रयत्न करेन.

याआधीचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना त्यांच्या कारकिर्दीत विद्यार्थांकडून विरोधाचा सामना करावा लागला होता. गजेंद्र चौहान यांची नियुक्ती रद्द करावी यासाठी 139 दिवस विद्यार्थ्यांचा संप आणि आंदोलन सुरू होतं.

FTII अध्यक्षांचा कार्यकाल खरं तरं तीन वर्षांचा असतो पण चौहान मात्र तेरा महिनेच पदावर राहिले.

त्यांची नियुक्ती 9 जून 2015 ला झाली होती आणि जानेवारी 2016 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ मार्च 2017 मध्ये पूर्ण झाला.

यानंतर एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की, "FTII चेअरमनचा कार्यकाळ तीन वर्षासाठी ब्लॉक असतो. आणि तो कार्यकाळ मागच्या अध्यक्षाने पदभार सोडल्यापासून धरला जातो."

"माझी नियुक्ती जरी जून 2015 ला झाली तरी माझा कार्यकाळ मार्च 2014 पासून धरला गेला."

आपल्याला पद सोडावं लागल्याचं गजेंद्र चौहान यांनी नाकारलं होतं.

सरकारला FTII चं खाजगीकरण करायचं आहे ?

द अॅडव्हेंचर्स ऑफ इंट्रेपिड फिल्म क्रिटिक या पुस्तकाच्या लेखिका अॅना एमएम वेट्टीकाड बीबीसीसाठी लिहिलेल्या लेखात म्हणतात की, 'कदाचित खाजगीकरणाचा हेतू गृहीत धरूनच सरकारने गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केली होती.'

'प्रथितयश कलाकारची नेमणूक केली तर तो सरकारच्या दबावाखाली येणार नाही. पण विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारला सध्याच्या काळात असं करता येणं अवघड आहे,' असंही त्या पुढे म्हणतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)