कुंदन शाह : 'वागले की दुनिया' ते 'पी से पीएम तक'

फोटो स्रोत, Wagle ki duniya/YouTube
- Author, अरुंधती रानडे-जोशी आणि तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
कुंदन शाह यांच्या जाण्यानं चित्रपट सृष्टीत पोकळी निर्माण झाल्याचं ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर आणि अभिनेते भरत जाधव यांनी बीबीसीला सांगितलं. या दोघांनी या कलाकाराच्या जागवलेल्या आठवणी
कुंदर शाह यांची वागले की दुनिया ही मालिका दूरदर्शनवर प्रचंड गाजली होती. त्यामध्ये भारती आचरेकरांनी साकारलेली राधिका वागळे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
कुंदन शाह यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट 'पी से पीएम तक' हा ठरला. भरत जाधव यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती.
भारती आचरेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना कुंदन शाह यांच्या आठवणी सांगितल्या. वागले की दुनिया एवढी लोकप्रिय होऊ शकली कारण त्यामागे कुंदन शाह यांची साधेपणाची शैली होती, असं त्या म्हणाल्या.
'वागले की दुनिया'च्या वेळच्या आठवणी भारती आचरेकर यांच्या शब्दांत...
...आणि वागले की दुनियाची भट्टी जमली
"वागले की दुनिया' या मालिकेला पुढच्या वर्षी 30 वर्षं होतील. अजूनही मला देशभरातले प्रेक्षक 'राधिका वागले' म्हणून ओळखतात. कुंदन शाह यांच्या या मालिकेचे फक्त 19 एपिसोड झाले होते आणि तरीही एवढी लोकप्रियता मिळाली होती. आजच्या पिढीला हे लोकप्रियतेचं गणित उलगडणारच नाही.

कुंदन शाह यांचं वैशिष्ट्य त्यांच्या सादरीकरणाच्या साधेपणात होतं आणि तेच लोकांना भावलं. त्यांच्या चित्रपट आणि मालिकांमधली पात्र लोकांना आपली वाटली. ती खरी वाटली, हे त्यांच्या दिग्दर्शनाचं कौशल्य होतं.
मराठी नाटकांवर प्रेम
कुंदन शाह सच्चा कलाकार होता. ते तसे इंट्रोव्हर्ट होते. पण त्यांचं निरीक्षण अगदी बारिक असे. त्यांचं रंगभूमीच्या कलाकारांवरही प्रेम होतं. ते नेहमी मराठी नाटकं बघायला येत असत. मराठीही चांगलं बोलायचे ते.
'वागले की दुनिया'ची भट्टी जमली याची अनेक कारणं आहेत. आर. के. लक्ष्मण यांची लेखणी, कुंदन शाह यांचं दिग्दर्शन आणि दुर्गा खोटेंचं प्रॉडक्शन अशी विलक्षण टीम होती. वागले की दुनिया करायची ठरवल्यावर अंजन श्रीवास्तवचं नाव वागळे म्हणून निश्चित झालं, पायलट एपिसोडही झाला आणि मग मला कुंदनजींनी काँटॅक्ट केला. पायलट एपिसोडमध्ये मी नव्हतेच.
वेगळी शैली
कुंदनजींना राधिका वागळे ही अगदी साधी- सरळ गृहिणी अपेक्षित होती. त्यांची दिग्दर्शनाची शैली वेगळी होती. प्रत्येक एपिसोडसाठी आमच्या 4- 5 मीटिंग व्हायच्या. आर. के. लक्ष्मण स्वतः प्रत्येक कॅरॅक्टर अगदी अॅक्टिंग करून समजावायचे.
त्यानंतर असंच एका एपिसोडचं 4- 5 दिवस शूटिंग व्हायचं. आजच्या टीव्ही मालिकांच्या जगात हे आश्चर्यकारक वाटेल.
साधेपणावर कुंदन शाह यांचं प्रेम होतं. मराठी आणि बंगाली लोक वेगळे असतात. त्यांची सिंपलीसिटी मला भावते, असं ते नेहमी म्हणत. हा साधेपणा त्यांना दक्षिण भारतीय आर. के. लक्ष्मण यांच्या लेखणीत सापडला, असं मला वाटतं.
मध्यमवर्गीय साधेपणा
बऱ्याचदा रिहर्सलदरम्यान राधिका वागळे म्हणून वावरताना आवाजाची पट्टी खाली ठेवायला सांगायचे. कमरेवर हात ठेवून बोलू नको, असंही सुचवायचे. मध्यमवर्गीय साधेपणाकडे नेणाऱ्या अशा छोट्या- छोट्या बारकाव्यांकडे त्यांची नजर असायची.
त्यांच्या 'जाने भी दो यारों'सारख्या चित्रपटांमधून किंवा इतर मालिकांमधूनही हेच बारकावे दिसतात आणि प्रेक्षकांनाही तेच भावतात.

फोटो स्रोत, Bharti achrekar
आपल्या वेगळ्या नजरेतून राजकीय परिस्थितीकडे पाहून भाष्य करणारा दिग्दर्शक आपण गमावला असला, असं भरत जाधव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
पी से पीएम तक
"सही रे सही नाटकातील माझी भूमिका शाह यांना आवडली होती. त्यामुळंच त्यांनी 'पी से पीएम तक'साठी माझी निवड केली," असं भरत जाधव म्हणाले.
भरत जाधव यांनी या चित्रपटाच्या सांगितलेल्या आठवणी त्यांच्याच शब्दांत....
छोट्या भूमिकांकडेही लक्ष
शाह यांची काम करण्याची पद्धत इतर दिग्दर्शकांपेक्षा खूप वेगळी होती. कलाकारांच्या निवडीनंतर त्यांनी सर्वांचा एक आठवड्यासाठी वर्कशॉप घेतला.
फक्त प्रमुख कलाकारच नव्हे तर छोट्या भूमिका असलेल्या कलाकारांनाही त्यांनी या वर्कशॉपमध्ये सहभागी करून घेतलं होतं.

फोटो स्रोत, P Se PM tak/YouTube
त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. ते सर्वार्थानं दिलदार व्यक्ती होते. आपलं काम जास्तीत जास्त चांगलं कसं होईल याकडं त्यांचं सतत लक्ष असे.
दिग्दर्शन करताना ते इतरांचं मत लक्षात घेत. हे चांगलं आहे का? याला आणखी कसं सुधारता येईल? अशी विचारणा ते आपल्या सहकाऱ्यांना आणि कलाकारांना करत असत.
प्रेक्षकांशी नातं
त्यांची निरीक्षण क्षमता कमालीची होती. आपण जे पाहिलं आणि अनुभवलं ते सामान्यांच्या भाषेत कसं व्यक्त करता येईल याचाही ते विचार करत असत. त्यामुळंच त्यांच्या चित्रपटाशी प्रेक्षकांचं एक नातं निर्माण होत असे.
दिग्दर्शन करताना ते पूर्ण तयारीनिशी उतरत असत. पण ऐनवेळी त्यांना काही उस्फूर्तपणे सुचलं तर त्याचादेखील समावेश ते चित्रपटात करण्यास कचरत नसत.
आपल्या वेगळ्या नजरेतून राजकीय परिस्थितीकडे पाहून भाष्य करणारा दिग्दर्शक आपण गमावला असल्याचं भरत जाधव म्हणाले.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








