आधुनिक सीतेचं काय म्हणणं आहे?

    • Author, दिव्या आर्य
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आदर्श स्त्री म्हटल्यावर आजही सीतेचं नाव घेतलं जातं. पण आजच्या आधुनिक सीतेचं म्हणणं काय हे कोणी लक्षात घेईल का?

माझ्या मैत्रिणीचं नाव सीता आहे. या नावानंच तिला जखडलं आहे.

केवळ मी नाही, तर तिला ओळखणारा प्रत्येकजण त्या सीतेच्या गुणवैशिष्ट्यांची आठवण करून देतो.

तिची एक झलक पाहायला मिळाली तर दिवस पुण्यवान होतो असं दररोज घरी येणाऱ्या दूधवाल्याला वाटतं. ती दिवसभर आणि रात्रीही काय करते याकडे तिच्या पालकांचं बारीक लक्ष असतं. आणि ते सतत तिची काळजी करतात. पुरुषाबरोबरच्या प्रत्येक संभाषणाकडे तिचे सहकारी संशयाने पाहतात.

माझंही तिच्याकडे लक्ष असतं. पण मी हे सगळं चेष्टामस्करी म्हणून करते. पण बाकी सगळे हे गांभीर्यानं घेतात.

काहीदृष्टीनं ते योग्यही आहे. पुराणांचा संदर्भ महत्वाचा आहे कारण त्यामुळे इतिहास, संस्कृतीशी नव्यानं नाळ जोडली जाते आणि आपलेपणा वाटतो.

आपलं मूळ काय, आपण कुठून आलो आहोत, आपले आदर्श काय असावेत आणि आपण कसं असावं यासाठी तो उत्तम संदर्भ असतो.

आज्ञाधारक आणि पतिव्रता

खरं सांगायचं तर सीतेला रामाची सीता अजिबात आवडत नाही असं नाही. त्या सीतेला ही सीता एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते.

आपल्या पिढीपैकी बहुतेकांनी रामायण वाचलेलं असतं. पण तिने ते वाचलेलं नाही. दूरदर्शनवरची 'रामायण' मालिका हाच तिच्यासाठी सर्वोत्तम संदर्भ.

तिनं त्या मालिकेत पाहिलेली सीता जिद्दी आणि कणखर होती. अडथळ्यांवर मात करत तिनं वाटचाल केली आणि एकट्यानं तिनं धैर्यानं दोन्ही मुलांचं संगोपन केलं.

मात्र लोकांच्या स्मरणात असलेली सीता त्याग, नम्रता आणि स्वत्वतेचं प्रतीक मानली जाते.

माझ्या मनातली सीता अशा कर्मठ बंधनांमध्ये अडकलेली असावी असं मला वाटत नाही.

तिच्यासाठी स्वयंवराचा घाट घालण्यात यावा असं तिला वाटत नाही. तिच्याकडे कायम कटाक्ष असावेत असं तिला वाटत नाही. तिची सहजपणे फसवणूक होऊ शकत नाही असं तिला वाटतं. तिची काळजी घेण्यासाठी माणसं असावीत असंही तिला वाटत नाही. आणि शुद्धता अर्थात स्वत्व वगैरे संकल्पनांशी तिचं नाव जोडलं जाणं योग्य वाटत नाही.

सीतेचं स्वातंत्र्य

जेव्हा ती प्रेमात पडते. तो माणूस शांत प्रवृत्तीचा आहे. स्वत:च्या कामासंदर्भात त्याच्याकडे भन्नाट कल्पना आहेत. पण दर महिन्याला ठोस उत्पनाचा स्त्रोत त्याच्याकडे नाही.

तो आदर्शवत गुणी मुलगा नाही. कदाचित म्हणूनच तिला तो आवडतो. त्याचा कुठेही दबदबा नाही. पुरुषी सौष्ठव नाही. वर्चस्ववादी आक्रमक स्वभाव नाही.

घरी परत यायला तिला उशीर झाला तर तो अस्वस्थ होत नाही. उशीर का झाला म्हणून तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करत नाही.

ती जशी आहे तसंच तो तिला स्वीकारतो. त्याचा तिच्यावर विश्वास आहे. त्याचं असणं त्याला मुक्त करतं, तिची घुसमट होत नाही.

सगळ्यात महत्वाचं म्हणजं तिचं म्हणणं काय आहे हे तो विचारतो. तिचं म्हणणं ऐकून घेतो. आणि तिच्या मताचा तो आदर करतो.

तिचे बाबा असं कधीच वागत नसत. तिला जे मोहक आणि आकर्षक वाटत असे ते त्याला सर्वसाधारण वाटतं.

कोण्या सोम्यागोम्याशी सीता लग्न करणार नाही.

तिला काय माहिती आहे? तिची आवडनिवड खरंच महत्वाची आहे?

आदर्श महिला

तिच्यासाठी चांगला नवरा कोण हे वडील ठरवतील.

देखणा, उच्चशिक्षित आणि मजबूत पगार असणारा मुलगा तिच्यासाठी निवडला जाईल.

जो तिची काळजी घेईल, तिला संरक्षण पुरवेल आणि कोणी तिला त्रास दिला तर त्याला धडा शिकवेल.

या बदल्यात ती स्वत:चा स्वभाव बदलेल आणि परिस्थितीशी जुळवून घेईल.

आता जुलूमी प्रशासन राबवणाऱ्या राजाचं राज्य नाही. समाज बदलू लागला आहे. पण समाजाच्या सीतेकडूनच्या अर्थात महिलेकडूनच्या अपेक्षा तशाच कायम आहेत.

यामुळे सीताला राग येतो. कदाचित तसं व्हायला नको. रामायणातल्या आदर्श स्त्रीची गुणवैशिष्ट्यांची आठवण करून देणे यापेक्षा वाईट काय असणार?

पण तसं आहे. यामुळेच अपेक्षा वाढून नियम तयार होतात.

माझी सीता आणि पूर्वीची सीता यांच्यात द्वंद पेटतं. कोणाचा अनादर करण्याचा तिचा हेतू नाही. पण, समोरच्यानं आदर द्यावा एवढीच तिची अपेक्षा आहे.

परिस्थिती समजून घेऊन मी वागावं आणि विश्वास ठेवावा असं वाटत असेल तर समोरच्यानंही तसंच वागावं अशी तिची अपेक्षा आहे.

मी माझी काळजी घेण्यास समर्थ आहे. मला साथ देईल असा साथीदार हवा आहे, माझ्यावर लक्ष ठेऊन वर्चस्व गाजवेल असा पहारेदार नको.

माझ्यावर शंका न घेता किंवा प्रश्नांची सरबत्ती न करता मोकळेपणा देणारा साथीदार हवा आहे.

मला मित्रमैत्रिणी हवे आहेत. पुरुष, महिला, गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर कोणीही.

फक्त विश्वास ठेवा...

माझ्यासाठी सुरक्षाकवच असू नये. माझ्यावर विश्वास ठेवावा.

मी आणि माझा साथीदार एकत्र आहोत असं सांगू तेव्हा आम्ही अन्य कोणाबद्दल बोलणार नाही कारण आम्ही एकमेकांशी एकरूप असू.

मी एकटी निखाऱ्यांवरून चालणार नाही. आम्ही एकत्र वाटचाल करू.

प्रश्नांच्या तोफा आमच्यावर झाडण्यात येतील तेव्हा आम्ही एकत्र सामोरे जाऊ.

आमच्यासमोर कोणतंही आव्हान उभं ठाकलं तरी आम्ही एकत्रच असू.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)