महिला आरोग्य : गर्भनिरोधक गोळ्यांमुळे असं बदललं जग

फोटो स्रोत, Getty Images
- Author, टीम हारफोर्ड
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
गर्भनिरोधक गोळ्यांनी आपल्या समाजावर मोठा परिणाम केला, एक प्रकारची सामाजिक क्रांती झाली. या वाक्यावर कोणाचाच आक्षेप नसेल.
असा परिणाम व्हावा, याच हेतूने कुटुंब नियोजन कार्यकर्त्या मार्गारेट सॅंगर यांनी संशोधकांना गर्भनिरोधक गोळ्या विकसित करायची विनंती केली होती.
स्त्रियांनी लैंगिकदृष्ट्या तसंच सामाजिकदृष्ट्या स्वतंत्र असावं हा त्यामागचा हेतू होता. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीला आणायचं होतं.
पण गर्भनिरोधक गोळ्यांनी फक्त सामाजिक क्रांती आणली असं नाही तर आर्थिक क्रांतीदेखील घडवून आणली. गर्भनिरोधक गोळ्यांनी कदाचित विसाव्या शतकातील सगळ्यात मोठा आर्थिक बदल घडवून आणला. कारण या गोळ्या प्रभावी होत्या.
शतकानुशतकं प्रेमी युगुलांनी नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी सगळ्या प्रकारच्या गोष्टी करून पाहिल्या.
यात प्राचीन इजिप्तमध्ये वापरली जाणारी मगरीची विष्ठा होती, अॅरिस्टॉटलने सांगितलेलं देवदार वृक्षाचं तेल होतं आणि कॅसानोव्हाची अर्धं लिंबू गर्भाशयाच्या मुखाशी ठेवण्याची पद्धतही होती.
पण यातून गर्भधारणा शंभर टक्के रोखू शकेल असं ठोस काहीच हाती आलं नाही.
गर्भनिरोधकाचा सगळ्यात आधुनिक अवतार - काँडमदेखील कधीकधी दगा देतं.

फोटो स्रोत, Getty Images
कारण ते ज्याप्रकारे वापरायला हवं त्याप्रकारे लोक वापरत नाहीत. कधी कधी काँडम फाटतात तर कधी निसटतात.
त्यामुळे वर्षभरात 100 काँडम वापरणाऱ्या स्त्रियांपैकी 18 स्त्रियांना नको असणाऱ्या गर्भधारणेला सामोरं जावं लागतं. गर्भनिरोधक स्पंज आणि डायफ्रॅम अपयशी ठरण्याचा दरही जास्त आहे.
पण गर्भनिरोधक गोळीचा अयशस्वी ठरण्याचा दर 6 टक्के आहे. म्हणजेच त्या काँडमपेक्षा तिप्पटीनं जास्त सुरक्षित आहेत. जर गर्भनिरोधक गोळ्या नीट वापरल्या तर हाच दर एक बारांशानं कमी होतो.
आर्थिक क्रांती
काँडम वापरणं म्हणजे आपल्या पार्टनरशी वाटाघाटी करणं आलं. गर्भनिरोधक स्पंज आणि डायफ्रॅमचा उपयोग कमी आणि त्रासच जास्त होता.
पण गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा निर्णय हा सर्वस्वी स्त्रीचा होता, तो खासगी होता आणि यात कोणाचा हस्तक्षेप नव्हता. स्त्रियांना या गोळ्या जवळच्या वाटल्या नसत्या तरच नवल!
1960 मध्ये गर्भनिरोधक गोळ्यांना सर्वप्रथम अमेरिकेत मान्यता मिळाली. त्यानंतरच्या पाच वर्षांत जवळपास अर्ध्याअधिक विवाहित स्त्रिया ज्यांना संतती नियमनाची साधनं वापरायची आहेत, त्या या गोळ्या वापरायला लागल्या.
खरी क्रांती घडली ती अविवाहित स्त्रियांना ओरल काँट्रासेप्टिव्ह वापरता येऊ लागली तेव्हा. अर्थात हे घडायला पुढची दहा वर्षं जावी लागली. 1970 च्या सुमारास अमेरिकन सरकारने अविवाहित स्त्रियांना गर्भनिरोधक गोळ्या मिळवणं सोपं करून दिलं.
विद्यापीठांमध्ये कुटुंब नियोजन केंद्रं सुरू झाली. सत्तरच्या दशकाच्या मध्यापर्यंत गर्भनिरोधक गोळ्या तिथल्या 18-19 वर्षांच्या मुलींमध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
तेव्हाच खरी आर्थिक क्रांती सुरू झाली.
अमेरिकेतल्या स्त्रियांनी, आधी पुरुषांचं क्षेत्र समजल्या जाणाऱ्या कायदा, वैद्यकीय, दंतवैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रांतल्या पदव्या मिळवायला सुरुवात केली. सत्तरच्या दशकात वैद्यकीय पदव्या घेणाऱ्यांपैकी 90 टक्के पुरुष होते.
कायदा आणि व्यवस्थापनच्या पदव्या घेणाऱ्यांपैकी 95 टक्के पुरुष होते. सत्तरच्या दशकातच या अभ्यासक्रमांना स्त्रियांनी प्रवेश घ्यायला सुरुवात केली.
सुरुवातीला वर्गात एक पंचमांश स्त्रिया होत्या, नंतर एक चतुर्थांश. ऐशीच्या दशकाच्या सुरुवातीला पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारी दर तिसरी व्यक्ती ही स्त्री होती.
हे फक्त स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध करुन दिल्या गेल्या म्हणून घडत नव्हतं.
व्यावसायिक प्रगती
ज्या स्त्रियांनी उच्च शिक्षण घ्यायचं ठरवलं होती त्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायला लागल्या.
कायदा, वैद्यकीय, दंतवैद्यकीय आणि व्यवस्थापन अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या स्त्रियांचा टक्का वाढला. त्यामुळे अर्थातच या व्यवसायातही स्त्रिया दिसायला लागल्या.
पण याचा गर्भनिरोधक गोळ्यांशी काय संबंध होता?

फोटो स्रोत, Getty Images
या गोळ्यांनी स्त्रियांना मुलं कधी व्हावीत आणि कधी नाही हे ठरवण्याची क्षमता दिली. यामुळे त्यांना व्यावसायिक प्रगती करणं शक्य झालं.
गर्भनिरोधक गोळ्यांच्या आधी पाच किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष उच्च शिक्षणात घालवणं स्त्रियांना पैशाच्या आणि वेळेच्या दृष्टीनेही परवडण्यासारखं नव्हतं.
उच्च शिक्षण पूर्ण करून व्यावसायिकदृष्ट्या जम बसायला त्यांची तिशी उलटणार, तोवर मातृत्व पुढे ढकलण्यासाठी काही साधन त्यांच्या हाताशी असेल तरच त्यांना त्यांच्या उच्च शिक्षणाचा फायदा होणार होता.
चुकीच्या वेळी गर्भधारणा राहिली तर स्त्रियांचं पुढचं शिक्षण तसंच करिअरही धोक्यात यायचं.
लैंगिकदृष्ट्या सक्रिय असणाऱ्या स्त्रीने डॉक्टर किंवा वकील बनण्याचा प्रयत्न करणं म्हणजे भूकंपप्रवण क्षेत्रात कारखाना काढण्यासारखं होतं. दुर्दैवाचा जरासा जरी फटका बसला तरी सगळी मेहनत पाण्यात जाणार.
लग्न लांबणीवर
उच्च शिक्षण घेत असणाऱ्या स्त्रियांना सेक्सपासून लांब राहणं हा एक पर्याय होता. पण बऱ्याच स्त्रियांना ते शक्य नव्हतं. फक्त मजा म्हणून नाही, तर लवकर लग्न झालं म्हणूनही स्त्रियांना लैंगिकदृष्ट्या सक्रिय असणं गरजेचं होतं.
गर्भनिरोधक गोळ्यांच्या संशोधनाआधी लोक लवकर लग्न करत. आपल्या करिअरसाठी एखादीने लग्न लांबणीवर टाकायचं ठरवलं तर तिशीनंतर तिला चांगला मुलगा मिळणं अवघड होतं.
गर्भनिरोधक गोळ्यांनी मात्र सगळी समीकरणं बदलली. एकतर अविवाहीत स्त्रियांना लैंगिकदृष्ट्या सक्रिय राहाणं सोपं झालं. त्यांना असणाऱ्या गर्भधारणेचा धोका बराच कमी झाला होता.
इतकंच नाही तर गर्भनिरोधक गोळ्यांनी लोकांचा लग्नाकडे पाहायचा दृष्टीकोनही बदलला. सगळेच उशीरा लग्न करायला लागले. अगदी त्या स्त्रियाही ज्या गर्भनिरोधक गोळ्या वापरत नव्हत्या.

फोटो स्रोत, Getty Images
मुलं उशीरा आणि मुख्य म्हणजे स्त्रियांची इच्छा असेल तेव्हा जन्माला यायला लागली. याचाच अर्थ हा होता की, स्त्रियांना आपलं करिअर करायला लागणारा वेळ मिळायला लागला होता. अर्थात 1970 पर्यंत अमेरिकेतल्या स्त्रियांसाठी बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या.
कमाईला चालना
गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाली होती, लैंगिक भेदभावाविरुद्ध कायदे संमत झाले होते, स्त्रीवादी चळवळींचा जन्म झाला होता आणि व्हिएतनाम युद्धात तरुण पुरुष लढत असल्याने त्यांच्या माघारी स्त्रियांना नोकरीवर घेणं गरजेचं झालं.
हार्वर्ड विद्यापीठाच्या अर्थतज्ज्ञ क्लॉडिया गोल्डिंग आणि लॉरेन्स काट्झ यांनी प्रसिद्ध केलेल्या सांख्यिकी अभ्यासात गर्भनिरोधक गोळ्यांचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे.
त्यांच्या मते गर्भनिरोधक गोळ्यांनी स्त्रियांना लग्न आणि बाळंतपण लांबणीवर टाकण्यात तसंच आपल्या करिअरकडे लक्ष देण्यास खूप मदत केली.
गोल्डिंग आणि काट्झ यांनी गर्भनिरोधक गोळ्यांची स्त्रियांना असणारी उपलब्धता अमेरिकेतल्या प्रत्येक राज्यानुसार तपासली.
त्यांनी हे दाखवून दिलं की, जसं जसं अमेरिकेतल्या राज्यांनी स्त्रियांना गर्भनिरोधकं उपलब्ध करून द्यायला सुरूवात केली तसं तसं स्त्रियांचा व्यावसायिक अभ्यासक्रमांमधला प्रवेशाचा टक्का वाढला. याच सुमारास त्यांचे पगारही वाढत गेले.
काही वर्षांपूर्वी अर्थतज्ज्ञ अमालिया मिलर यांनी बऱ्याच वेगवेगळ्या सांख्यिकी पद्धती वापरून हे दाखवून दिलं की, जर विशीतल्या एका स्त्रीने आपलं मातृत्व फक्त एक वर्ष पुढे ढकललं तर तिच्या आयुष्यभराच्या कमाईमध्ये दहा टक्क्यांची वाढ होते.
आपलं शिक्षण आणि करिअर पूर्ण केल्यावर मूल होऊ देणं हे स्त्रियांसाठी किती फायदेशीर असू शकतं, याचं हा अभ्यास एक सार्थ उदाहरण होता.
दुसऱ्या बाजूच्या जगात
सत्तरच्या दशकातल्या अमेरिकन स्त्रियांनी अमालिया मिलर यांचा रिसर्च नक्कीच वाचला नव्हता. पण तो तंतोतंत खरा आहे हे त्यांना आधीच माहित होतं. अमेरिकन स्त्रियांना गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळी शिखरं पादाक्रांत केली.

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या बाजूच्या जगात मात्र चित्र एवढं आश्वासक नाही. जगातल्या सर्वात विकसित असणाऱ्या देशांपैकी एक असलेल्या जपानमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांना 1999 पर्यंत मान्यता नव्हती. जपानी स्त्रियांना अमेरिकन स्त्रियांच्या तुलनेत 39 वर्ष वाट पाहावी लागली.
याविरुद्ध लिंगाला ताठरपणा आणणाऱ्या व्हायग्रासारख्या औषधांना जेव्हा अमेरिकेत मान्यता मिळाली, त्यानंतर काही महिन्यांतच जपाननेसुद्धा ही औषधं आपलीशी केली. जपानमध्ये इतर विकसित देशांच्या तुलनेत सर्वात जास्त लिंग असमानता आहे. तिथल्या स्त्रियांना कामाच्या ठिकाणी समान हक्क मिळवण्यासाठी अजूनही झगडावं लागत आहे.
गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध होण्याचा आणि या असमानतेचा काही संबंध आहे की नाही हे सांगणं अवघड आहे. पण अमेरिकेतल्या घटनांवर नजर टाकली तर असं लक्षात येतं की, जपानमधली आजची परिस्थिती फक्त योगायोग असू शकत नाही.
गर्भनिरोधक गोळ्या दोन पिढ्यांनंतर या स्त्रियांना उपलब्ध झाल्या. त्याचा स्त्रियांच्या आर्थिक स्वायतत्तेवर मोठा परिणाम झालेला आहे.
ही छोटीशी गोळी अजूनही जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणते आहेच.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








