You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मेक्सिकोत का होतात इतके जोरदार भूकंप?
मंगळवारी दुपारी मेक्सिकोच्या मध्य प्रांतात रिश्टर स्केलवर 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला. या क्षेत्रात इतके मोठा भूकंप का होतात?
अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार मंगळवारच्या भूकंपाचा केंद्रबिंदू प्युबेला शहराच्या दक्षिणेला एक्सोकियापन परिसरात 51 किलोमीटर भूगर्भाखाली होता.
या घटनेनं मेक्सिकोवासियांच्या 32 वर्षांपूर्वीच्या कटू आठवणी जागृत झाल्या. 1985 मध्ये याच दिवशी मेक्सिको सिटीत आलेल्या भूकंपानं दोन कोटी लोकांना हादरवलं होतं. अगदी मागच्याच आठवड्यात दक्षिणपूर्व मेक्सिकोत 8.2 क्षमतेचा भूकंप झाला होता.
मेक्सिकोला इतक्या तीव्र क्षमतेच्या भूकंपाचे धक्के का बसत आहेत? याचं उत्तर या देशाच्या भौगौलिक स्थानात दडलं आहे.
रिंग ऑफ फायर
घोड्याच्या नालेसारख्या अतिभूकंपप्रवण 'पॅसिफिक रिंग ऑफ फायर' क्षेत्रात मेक्सिको आहे. आशियाच्या पूर्व किनाऱ्यापासून सुरू होणारं हे क्षेत्र अमेरिकेच्या किनाऱ्यापर्यंत पसरलं आहे.
"जगात होणारे 90 टक्के भूकंप 'पॅसिफिक रिंग ऑफ फायर' प्रदेशातच होतात. यापैकी 80 टक्के भूकंप तीव्र क्षमतेचे असतात," असं पेरूच्या जिओफिजिकल इन्स्टिट्यूटमधील भूकंपशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हर्नांडो तव्हेरा यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना सांगितलं.
मेक्सिकोच्या बरोबरीने 'पॅसिफिक रिंग ऑफ फायर' क्षेत्रात जपान, इक्वेडोर, चिली, पेरू, बोलिव्हिआ, कोलंबिया, पनामा, कोस्टा रिका, निकारागुआ, एल सॅल्व्हाडोर, होंडूरास, ग्वातेमाला आणि कॅनडाच्या काही भागांचा समावेश होतो.
पॅसिफिकच्या उत्तरेला असलेल्या अॅल्युटिअन बेटांपासून भूकंपप्रवण क्षेत्र सुरू होतं. अलास्का आणि कामचटका द्विपकल्पात भूकंपांची तीव्रता जाणवते. रशिया, तैवान, फिलीपाइन्स, पापुआ न्यु गिनी तसंच न्यूझीलंडच्या किनाऱ्याकडच्या प्रदेशापर्यंत भूकंपाची तीव्रता असते.
पॅसिफिक प्रदेशात टेक्टॉनिक प्लेट्समध्ये होणाऱ्या घर्षणातून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा मग भूकंपाच्या माध्यमातून बाहेर पडते, असं डॉ. तव्हेरा यांनी सांगितलं.
रिंग ऑफ फायर प्रदेशात जगातले 75 टक्के निद्रिस्त आणि उसळते ज्वालामुखी आहेत.
किआपास
दोन आठवड्यांपूर्वी मेक्सिकोत झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू किआपास राज्यातील टोनाला परिसरात होता. मेक्सिकोच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र सर्वेक्षणानुसार चिआपास प्रदेश सगळ्यात भूकंपप्रवण आहे.
'पॅसिफिक रिंग ऑफ फायर' मधल्या कोकोस आणि कॅरेबियन प्लेट्स जिथे एकत्र येतात ते ठिकाण पॅसिफिकच्या किनाऱ्यानजीक आहे. तिथे घर्षण होतं आणि त्यातून ऊर्जा निर्माण होऊन या प्लेट्समध्ये घडामोडी होतात.
1970 पासून किआपास प्रदेशात 7 रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचे तीन जोरदार भूकंप झाले आहेत.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)